वाघोबा रागावले (भाग दोन)


 

वाघोबा रागावले (भाग दोन)

ताडोबाच्या जंगलात रवी आणि त्याच्या मित्र-मैत्रणींचे आईबाबा गेले होते. आईबाबांना वाघ बघण्यातच रस होता. मुलं मात्र जंगलातील इतर पशू-पक्षी, झाडं-झुडपं बघून आनंदित झाली. वाघोबा दिसला नाही म्हणून निराश झालेल्या रविच्या बाबांना अखेर खुद्द वाघोबांनीच रागावलं..कां बरं..

मोर आणि त्याच्या पिसाऱ्याचा मनुराद आनंद मुलांनी घेतला. आईबाबांनी मोर बघताना वाघाची आठवण काढली नाही. पण मोराच्या पिसाऱ्या ऐवजी ते सर्व वाघ कधी दिसतो याचीच चिंता वाहत असल्याचं दिसत होतं.

वाघाला काय एवढ आईसक्रीम लागलं असतं रे, आपल्या आईबाबांचं काहीच कळत नाही बुवा. दिसला तर दिसला नाही तर गेला उडत. रवी सीमाच्या कानाजवळ जाऊन पुटपुटला. तिला हसू आलं. गाईडलाही ते ऐकू गेलं असावं, तोही हसला.

जास्त शहाणपणा करु नकोस हं, रवीची आई त्याच्याकडे डोळे मोठे करुन म्हणाली.

गाईडने गाडी पुढे तीन चार पानवठ्यावर नेली. या ठिकाणी पाणी पिण्यासाठी वाघ येतो. ही वाघाचं दर्शन घडवणारी हक्काची जागा. पण तीनचार ठिकाणीही दहा वीस मिनिटे थांबूनही वाघोबा काही आले नाही.

गाडी पुढे निघाली. दुसऱ्या बाजूने इतर पर्यटकांना घेऊन गाडी परतीला निघाली होती.त्यांच्या गाडीजवळ ही थांबली. गाडीतली सर्व मंडळी आंनदी दिसत होती. कारण त्यांना एका पाणवठ्यावर वाघ दिसला होता. सर्व प्रवाशी खुष होते.

तरी, आम्ही म्हणत होतो की वेळ दवडू नका.मोर काय ,हरीण काय नंतर कधही बघता येतील पण वाघोबा दिसणार नाही. रवीचे बाबा वैतागून म्हणाले. इतर आईबाबांनाही त्यास सहमती दर्शवली. ज्या ठिकाणी आज वाघाने दर्शन घडवले होते, त्या दिशेने गाडी निघाली. वाघोबा आता येतील, मग येतील असे करत बराच वेळ गेला पण वाघोबांना काही यांची दया आली नाही. आईबाबा मंडळी वाघोबाकडे डोळे लावून बसले असताना मुले मात्र त्या पानवठ्यातील मगरी आणि त्यांच्या खरबरीत पाठीवर शांतपणे बसलेले बगळे, पाण्यातील झाडांवर गोळा झालेले आणि डोळे लावून बसलेले बगळे आणि इतर काही पक्षी यांचे निरीक्षण करत होते. अर्ध्या तासानंतर आई बाबा मंडळींना कंटाळा आला. सकाळच्या सफरीची वेळ संपत आली होती. त्यामुळे गाईडने गाडी परतीच्या प्रवासाला घेतली.

पोपट, मोर, वानर, गवा, हरीण, बारशिंगे

मगर, बगळे असे पशुपक्षी दिसल्याने मुलं आनंदात होती, तर वाघ दिसला नाही म्हणून आई-बाबा मंडळी दु:खी कष्टी झाली होती. असं हिरमुसलेपण घेऊन सर्वजण हॉटेलमध्ये परतले. जेवण आणि थोडी विश्रांती घेऊन मंडळी दुपारच्या सफरीला निघाली.

०००

सकाळच्यापेक्षा दुपारचं जंगल वेगळं भासत होतं. सूर्य मावळतीला लागला होता. त्यामुळे उन्हाची किरणं आता कमी प्रमाणात येत होती. सकाळी दिसणारी झाडं आता थोडिशी गुढ वाटायला लागली होती. झाडाचं सळसळणं थांबलं होतं. निरव शांतता सर्वत्र भरुन राहिली होती. सकाळच्यापेक्षा दुसऱ्या मार्गाने गाइड गाडी नेत होता. त्यामुळे वेगळया प्रकारची झाडं-झुडपं -वेली बघायला मिळत होत्या. काही वेली तर अंगावर कोसळतात की काय इतक्या खाली आल्या होत्या. अशी वेगवेगळया प्रकारची झाडं बघण्याची मुलांची पहिलीच वेळ होती. त्यामुळे अस्ताव्यस्त पसरलेली झाडं बघून मुलांना आनंद होत होता. वाटेत येणाऱ्या पानथळयावर गाडी थांबायची. वाघोबा येण्याची वाट बघितली जायची. पण तीन - चार पानवठे होऊनही वाघोबा काही दिसले नाही. सहा वाजेच्या आत जंगलातून बाहेर पडायचं असल्यानं गाडी परतीला फिरली. अखेर वाघ दिसलाच नाही. आईबाबा मंडळी निराश झाली. मुलं मात्र खुष होती. वाघ नाही तर नाही, इतर प्राणी-पक्षी-चित्र-विचित्र झाडं झुडूप बघून त्यांचा आंनद गगनात मावेनास झाला होता.

अंधार दाटून आला होता. गाडी वेगाने निघाली. हॉटेलमध्ये मंडळी जेव्हा परतली, तेव्हा आईबाबांचे चेहरे पडले होते. वाघोबांनी त्यांना निराश केले होतं. रात्रीचं जेवण झालं. थोडावेळ गप्पा मारुन सर्व जण झोपी गेले.

००००

टक टक टक

रवी आणि त्याचे आईबाबा ज्या खोलित झोपले होते, त्या खोलिच्या दारावर कुणीतरी टक टक करत होते.

 

क क कोण, रवीचे बाबा घाबरुन उठले.

मी वाघोबा..

क क काय.. बाबा घाबरुन म्हणाले.

मघाशी मी तुम्हाला भेटलो नाही ना, आता स्वत: आलोय दर्शन द्यायला..

न न न नको.. बाबा ततपप करत म्हणाले..

अरे कां नको, मघा तर सारखा सारखा वाघोबा वाघोबा करत होता..

त त त प म्हणजे भीती वाटते.. बाबा कसे बसे बोलले.

माझी कशाची भीती वाटते.

न न न नाही म्हणजे हो म्हणजे...

आता दार उघड ना, बघून घे मला, जवळून. मी दिसतो कसा,माझ्या मिशा कशा, माझे ठिपके कसे,वाघनखं कशी , जबडा कसा...सारं काही जवळून दाखवतो की तुला...

न न नको..

अरे घाबरुटल्या...जरा जंगलाचा आनंद घ्यायला शिका ना...वाघ म्हणजेच काही जंगल नाही. जरा पोरांकडून शिका. कशी मजेत जंगल बघत होती.बघता बघता दंगली होती. आनंदून गेली होती. जरा मुलांसारखा आनंद घ्या. वाघ दिसला नाही म्हणून मुलं काही रडत बसली नाही तुमच्या सारखी..

हो हो बरोबर आहे...

चल मग दार उघड.

न न नको..

उघड म्हणतो ना..नाहीतर दरवाजा फोडून आत शिरेन आणि ...

 

न न नाही नाही,वाचवा वाचवा...

असं बाबा खूप जोरात ओरडले आणि गादीच्या खाली पडले. त्यांच्या आरडाओरडीमुळे आई आणि रवी उठला. त्यांनी दिवा लावला. बाजूच्या खोलितील आई बाबा आणि मुलं धावत आली. रवीच्या बाबांना दरदरुन घाम फुटला होता. रविने त्यांना पाणी दिलं. काय झालं ते आता सर्वांच्या लक्षात आलं होतं. बाबांना काही तरी भयानक स्वप्न पडलं होतं.

बाबांनी मग स्वप्नात आलेल्या वाघोबाची गोष्ट सांगितली. ती ऐकून सर्व मुलं हसली. आईबाबांना त्यांची चूक उमगली. वाघोबाच्या नादात जंगल सफारीचा खरा आंनद घालवून बसल्याचं त्या सर्वांच्या लक्षात आलं....

                                                        

 

 

 

 

                         

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!