चालढकलीचा फटका


 

चालढकलीचा फटका

तेजोमयीच्या आजोळी असणाऱ्या वाघमारे आजोबांचं तेजोमयीवर खूप प्रेम. ती आजोळी गेली की अर्धा दिवस वाघमारे आजोबांच्या घरीच तिचा मुक्काम असे. हे आजोबा तिला धम्माल गोष्टी सांगत. वेगवेगळे बैठे खेळ शिकवत. शिकवलेल्या खेळांसोबत तिच्याशी खेळत. सुट्यांमधील ही धम्माल तेजोमयीसाठी खास होती.

मात्र, गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे काही तेजोमयीस आजोळी जाता आलं नाही. त्यामुळे प्रत्येक सण आला की, तेजोमयी वाघमारे आजोबांना आठवणीने फोन करुन शुभेच्छा देत असे. छानसा शुभसंदेश व्हॉटस्ॲप वरुन पाठवत असे. तिचा संदेश गेला की या आजोबांचा शुभेच्छा आणि आशीर्वाद देणारा संदेश लगेच येत असे.

यंदा मात्र दिवाळीच्या दिवशी तेजोमयीने वाघमारे काकांना शुभेच्छा संदेश पाठवला तेव्हा, वाघमारे काकांनी, चक्क तुझा संदेश नको म्हणून, व्हॉटसॲपवर लिहून पाठवलं.ते बघून तेजोमयीस धक्का बसला. दु:खही झालं. तिला रडू कोसळत होतं. पण तिने स्वत:ला सावरलं. हिम्मत करुन वाघमारे आजोबांना, आपलं काही चुकलं का? तसं असेल तर क्षमा मागते असा संदेश पाठवला.

काही वेळाने वाघमारे आजोबांचं प्रत्युत्तर आलं. तेजोमीयने मोठ्या उत्सुकतेनं आणि अधिरतेनं ते वाचलं. तेव्हा तिला आपल्या चुकिची जाणीव झाली.

०००

वाघमारे आजोबांना भविष्य बघण्याचा छंद होता. गंमत आणि अभ्यास म्हणूनही ते या छंदाकडे बघत. कुणी त्यांच्याकडे पत्रिका घेऊन गेलं तर त्याचं भविष्य ते तन्मयतेनं सांगत. लिहून सुध्दा देत. याच बरोबर ज्यांनी भविष्यासाठी विचारणा केली असेल त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा फोटो ते आपल्या खाजगी अल्बमसाठी मागवून ठेवत. त्या छायाचित्राखाली ते संबंधित व्यक्तिच्या भविष्याचं टिपण चिटकवून ठेवत.

सहा महिन्यांपूर्वी तेजोमयीच्या बाबांनी तेजोमयीची पत्रिका वाघमारे काकांकडून तयार करुन घेतली. तेजोमयी ही त्यांची लाडकी नात असल्याने वाघमारे काकांनी तिची पत्रिका मोठ्या प्रेमाने आणि आनंदाने तयार करुन दिली. पत्रिका पाठवल्यावर त्यांनी बाबांना तेजोमयी आणि कुटुंबाचा फोटो पाठवण्याची विनंती केली. बाबा हो म्हणाले. पण ते आपल्या कामाच्या गडबडीत फोटो पाठवण्याचं विसरुन गेले. दोन महिन्यांपूर्वी वाघमारे आजोबांनी याची आठवण तेजोमयीस करुन दिली. लगेच फोटो पाठवते म्हणून तिने आजोबांना सांगितलं. पण तिनेसुध्दा फोटो पाठवला नाही. असच दोन-तिनदा  काकांनी तिला फोटोविषयी व्हॉटस्ॲपवर आठवण करुन दिली. असा संदेश आला की लगेच पाठवते, असं ती म्हणायची. पण कृती मात्र करायची नाही. नंतर अभ्यास-खेळ-टीव्ही यात ही गोष्ट विसरुन जायची.

हे सारं काही वाघमारे आजोबांनी त्यांच्या व्हॉटसॲप संदेशात नमूद केलं. ते वाचल्यावर तेजोमयीने कपाळावर हात मारुन घेतला. किती छोटीशी गोष्ट. पण वेळेवर न केल्याने आजोबांची नाराजी ओढवून घेतली आपण, ती स्वत:लाच म्हणाली.तिने आजोबांना लगेच सॉरी म्हणणारा संदेश टाईप केला,तो पाठवण्याआधी तिने आईबाबांसोबतचा तिचा फोटो अपलोड केला. तो आधी पाठवला आणि लगेच सॉरीचा संदेश धाडला.वाघमारे आजोबांकडून लगेच हसरी इमोजी आली. ती बघून तेजोमयीस हसू आलं.तिच्या डोक्यावरचा ताण पळून गेला. तो जाताना, जेव्हाचं काम तेव्हाच करायचं असतं, टाळाटाळ करायची नसते,चालढकल टाळलीच पाहिजे हा धडा शिकवून गेला.

सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!