यशाचं रहस्य
यशाचं रहस्य
झपाझप पावलं टाकत, बापूजी चालले होते. त्याचवेळी
तिकडून चाललेल्या छत्रपती महाराजांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. त्यांनी बापूजींना
हाक मारली. बापूजींनी मागे वळून बघितलं. छत्रपती महाराजांना बघून बापूजींना
आश्चर्य वाटलं.
झरदिशी मागे वळून बापू महाराजांकडे गेले. त्यांनी
त्यांना वंदन केले.
अहो बापू, हे काय करता आपण?
मोठ्यांचा आदर करणं, हीच आपली संस्कृती नाही का
महाराज?
महाराज हसले.
चला बापू, आज आपण एकत्रच फिरायला जाऊया. महाराज
बापूंना म्हणाले.
महाराजांसमवेत जायला मिळतय या आनंदातच बापूंनी
त्यांच्यासोबत यायला होकार दिला.
महाराज, आपण कुठे बरं जाणार? बापूंनी
विचारलं.
चला तर माझ्यासोबत, असं म्हणून महाराजांनी बापूंना
एका नदीच्या किनारी आणलं.
नदीचं पाणी नितळ होतं. ते संथपणे वाहत होतं. पाण्यातील
मासे तळावर येऊन मान वर करुन लगेच खाली जात. ते बघून बापूंना गंमत वाटली. अचानक
तिथे एक पानपक्षी आला. होडीसारखा तरंगू लागला. काही अंतर गेल्यावर त्याने पाण्यात
मान टाकल. मग सर्व शरीरही टाकलं. क्षणात तो पाण्यात अदृष्यच झाला. पाण्यावर काही
काळ फक्त तरंगच तरंग दिसत राहिले.
महाराज हा पक्षी गेला तरी कुठे?
बापू, तो पाण्यातच गेल्याचं आपण बघितलं की?
पाण्यात गेला म्हणजे?पाण्याच्या
आत तो कसा काय श्वाच्छोश्वास घेत असेल बॉ? श्वास गुदमरुन त्याच्या जीवाचं बरं वाईट व्हायचं? बापूजींनी
काळजी व्यक्त केली.
तसं काही होणार नाही बापू. महाराज म्हणाले. खरोखरच
तसच घडलं. थोड्यावेळाने डुबूक असा पाण्यावर आवाज आला नि तो पाणपक्षी पुन्हा
होडीसारखा तरंगू लागला. त्याच्या चोचित एक मासा होता.थोड्यावेळापूर्वी हाच मासा
पाण्यावर डोकं काढून गेला असावा, असं बापूजींना वाटलं.
चमत्कारच म्हणायचा.
नाही बापू, हा चमत्कार नाही..
मग?
अहो, अचूक निरीक्षण आणि आपणास काय आणि कशासाठी नेमकं हवं,
हे त्या पाणपक्ष्यास ठाऊक असतं.
काय सांगता? बापूंनी आश्चर्यानं विचारलं.
यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही बापू. अहो, जेव्हा
तो मासा पाण्यावर येऊन तरंगू लागला, तेव्हाच या पाणपक्षाच्या नजरेच्या टप्प्यात तो
आला असणार. त्यावर त्याने बारीक लक्ष ठेवलं. मासा खूप खोल पाण्यात शिरण्यापूर्वी
किंवा दुसरीकडे जाण्यापूर्वी त्याला पकडण्यासाठी त्याने विलंब न लावता पाण्यात सूर
मारला. त्या माशाला पकडून पाण्याच्या वरही आला.
पण महाराज, तुम्हाला कसं ठाऊक ते?
बापू अहो, सततच्या
अभ्यासानेच माझ्या ते लक्षात आलं.
म्हणजे महाराज, तुम्ही अजूनही अभ्यास करता?
कां, अजूनही म्हणजे?
नाही म्हणजे महाराज, तुम्हाला त्याची गरज नाही ना...
असं कसं बापू? आपण कितीही ज्ञानप्राप्ती केली तरी ती अपुरीच असते. त्यामुळे
जिथून कुठून ज्ञानाचे कण मिळतात ते आपण वेचायला हवेत. तसं
केलं नाही तर आपल्या बुध्दीला गंज लागतो. एकदा
का बुध्दीला गंज लागला की मग प्रगतीच खुंटते. पराक्रम गाजवता येत नाही.
अच्छा तर सूक्ष्म निरीक्षण, नेमकं काय आणि काय
करायचं? याची स्पष्टता आणि सतत ज्ञानार्जन केल्यानेच तुम्ही साम्राज्य
स्थापन करु शकला ना महाराज, बापूजी हसत म्हणाले.
तुम्ही सुध्दा, याच
गुणांच्या बळावर, ब्रिटिशांचं साम्राज्य बुडवून आपल्या देशी माणसांचं राज्य आणलच
ना बापू! महाराजही हसून म्हणाले.दोघेही बराच वेळ हसत राहिले. हसता
हसता महाराजांच्या डोळयातून अश्रू ओघळले. बापूही
भावूक झाले.
महाराज तुमचा नुसता जयजकार केला जातो, पण
तुमच्या या गुणांची कुणी उजळणी करत नाहीत हो आजकाल. तसं
जर झालं तर आजच्या तरुण पिढीला त्यांना हवं ते साध्य करणं अजिबातच कठीण जायचं
नाही..
हं...महाराज दीर्घ श्वास घेऊन म्हणाले.
एक नवा पाणपक्षी पाण्यावर होडीसारखा तरंगू लागला.त्याची
जलक्रीडा बघण्यात दोघेही दंगून गेले.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment