आनंद वाटून घ्यावा...
आनंद वाटून घ्यावा...
तेजोमयीच्या घराजवळ काही दिवसांपूर्वी, शेपूटवाल्या मित्र-मैत्रिणींसाठी
स्पेशल दुकान लागलं. दुकान कसलं?तो त्यांच्यासाठीचा स्पेशल
मॉलच होता. काय नव्हतं या मॉलमध्ये? मनीमावशीसाठी आणि मोत्या
दादांसाठी प्रत्येक प्रकारची खेळणी. तीसुध्दा त्याच्या वयानुसार. म्हणजे असं की,
तो किंवा ती अगदीच लहान असेल तर वेगळी खेळणी, तो मोठा असेल तर वेगळी खेळणी. त्याच्याकडून
व्यायाम घडावा म्हणून असलेली खेळणी. शेकडो प्रकारची खेळणी बघून अक्षरश: डोळे
विस्फारून जात.
त्यांच्या खाण्यापिण्याचेही अनंत प्रकार. प्रोटिनयुक्त, व्हिटॅमिनयुक्त! त्यांना घालण्यासाठी रंगीबेरंगी कपडे, बूट, गॉगल,बो...सगळं
काही, अबबा म्हणायला लावणारं. त्यांच्यासाठीचा पाळणा, झोपायची गादी, डोक्याखाली
घालायला उशी. असा सगळा जामानिमा.
हा मॉल लागताच शेपटूवाल्या मित्र - मैत्रिणींच्या पालकांनी लगेच
दुसऱ्या-तिसऱ्या दिवसांपासून गर्दी केली. चारपायाच्या आपल्या लाडक्या लेक/लेकीसाठी,
काय घेऊ नि काय नाही, असं त्यांना झालं. त्यामुळे दोन-चार दिवसातच हा मॉल, पालक
आणि त्यांच्या चारपायांचे लेक/लेकीसह ओसंडून वाहू लागला.
या मॉलच्या आजूबाजूला फिरणाऱ्या डॉगीजसाठी हे काहीतरी वेगळचं होतं.
आपल्या भाऊ-बहिणीचे इतके लाड होताना त्यांनी कधी बघितलं नव्हतं. त्यामुळे ते बिचारे,
आशाळभूतपणे जिभ आणखी लांब करुन त्यांच्याकडे बघत असतं. सुरुवातीला सांभाळून
सांभाळून अंग चोरुन राहणाऱ्या या चार-पाच डॉगीजची भीती काही दिवसांनी ओसरली. त्यामुळे
मग त्यांनी मॉल समोरच्या मोकळ्या जागेत ठिय्या मांडला.
मॉलच्या मालकाने आणि मॉलमध्ये येणाऱ्या चारपायाच्या मित्रांच्या
पालकांनी त्यांना हाटहूट केलं नाही. त्यामुळे तेही निर्धास्तपणे त्या मोकळया जागेत वावरु लागले. बसू
लागले. मनास वाटेल तेव्हा झोपू लागले.
आपणसुध्दा या मॉलमध्ये अलेक्झांडरला घेऊन जाऊ, त्याच्यासाठी नवी खेळणी
घ्यायला, तेजोमयी एके दिवशी म्हणाली. बाबांनी होकार दिला. ठरल्याप्रमाणे सुटिच्या
दिवशी आई-बाबा,तेजोमयी आणि अलेक्झांडर या मॉलमध्ये गेले.
मॉलचा रंगीबेरंगी माहोल बघून अलेक्झांडर हरखून गेला. खेळणी बघून
आनंदाने उड्या मारु लागला. जी खेळणी बघून त्याने खूप उड्या मारल्या ती तीनचार
खेळणी आईबाबांनी घेतली. पठठ्याने तिथेच तोंडात धरुन खेळायला सुरुवात केली. त्याला
इतका आनंद झाला होता की तो तिथेच धावू लागला. गडबडा लोळू लागला. आनंदाच्या भरात
बिल काउंटवरच उडी मारुन त्याने तिथे कॉम्प्युटरवर बिल करणाऱ्या दादाला प्रेमाने
जिभ लावली. तो हाटहूट करण्याच्या आधीच काऊंटवरुन खाली उडी मारली. बाबांना बिलगला. बाबांना
थँक्यू म्हणण्याची त्याची ही पध्दत होती.
त्यानंतर आईने त्याच्यासाठी डॉगी खाऊ घेतला. खरेदी आटोपल्यावर सगळेजण
बाहेर पडले. अचानक अलेक्झांडरचं लक्ष तिथे लोळत असलेल्या डॉगीजकडे गेलं. त्याला
काय वाटलं कुणास ठाऊक तो बाबांच्या शर्टाला पकडून मॉलमध्ये चला असा, इशारा करु
लागला.
बाबांना कळेचना याला काय झालं ते?
आई रागावून म्हणाली, ठोंब्या, आजच्यापुरती खेळणी बस झाली आता. पुढच्या वेळेला आणखी
घेऊ.
आईचं सांगणं त्याला बरोबर कळायचं. त्यामुळे ती काही बोलली की तो चूप
बसायचा. पण आज त्याने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन बाबांना पुन्हा मॉलमध्ये चालण्याचा
इशारा करु लागला.
तेजोमयीचं त्याच्या या वागणुकीकडे लक्ष होतच. तो आधी मॉलच्या मोकळया
जागेत रेंगाळणाऱ्या डॉगीजकडे बघायचा आणि मग बाबांना मॉलच्या आत जाण्यासाठी इशारा
करायचा. हा असा कां करतो? याचा विचार तेजोमयी
करु लागली.
त्याच्या या वागणुकीला बाबा वैतागून गेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर
नापसंती दिसू लागली. ते बघून तेजोमयी म्हणाली,
बाबा, अलेक्झूला काहीतरी सांगायच, हे तुमच्या लक्षात येतय का?
काय सांगायचय गं? आईने विचारलं. तेजोमयीने
तिच्या हातात असलेली त्याची तीन खेळणी, मॉलसमोर बसलेल्या डॉगीजसमोर ठेवली.
आई ओरडली, अगं काय हा वेडेपणा, किती महागडी आहेत ती.
पण तेजोमयीची ही कृती बघून अलेक्झांडरने आनंदाने उडी मारली.
अगं आई, बघ त्याला किती आनंद झालाय.
त्याला काय कळतय डोंबल्याचं?
तू उगाच आगावूपणा केलास, आई पुन्हा तेजोमयीस रागावली.
अगं, तिला कां रागावतेस?
अलेक्झूला झालेला आनंद तर बघ. त्याला मघापासून तेच सांगायचं असेल.माझ्यासाठी खेळणी
घेतली,आता या बाहेरच्या मित्रांसाठी घ्या! ते आपल्याला कळलं
नाही. त्याला बोलता येत नसल्याने त्याला सांगता आला नाही. तो त्याच्या पध्दतीने
इशारा करत राहिला.
करेक्ट! मलासुध्दा
तेच वाटतेय बाबा...
आईला ते पटलं. दुसऱ्यांना सुध्दा आनंद देऊ पाहणा-या आपल्या लाडक्या
लेकाचं तिला कौतुक वाटलं. त्याला जवळ घेऊन त्याच्या पाठीवरुन आईन प्रेमाने हात
फिरवला.
बाबा-आई आणि तेजोमयी
अलेक्झांडरसह पुन्हा मॉलच्या आत गेले. बाहेर असलेल्या सर्व डॉगीजसाठी त्यांनी
खेळणी घेतली. अलेक्झांडरलाही नवी खेळणी घेऊन दिली.
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment