मूर्ख कोण?
मूर्ख कोण?
कोल्होबास नेहमीच वाटे त्याच्यासारखा हुषार कुणी
नाही. आपण आपल्या हुषारीच्या जोरावर काहीही करुन शकतो,
असा त्याला गर्व होता.
इतका गर्व बरा नाही, असं एकदा हत्ती त्याला
म्हणाला.
अरे जाड्या, तुला काय कळणार, माझ्या हुषारीची
किंमत? त्यामुळे तू फुकाचा सल्ला काही देऊ नकोस मला जा.
आपल्या वाटेनं.कोल्होबा हत्तीला तुच्छतेने म्हणाला.
या मूर्खाच्या वाटेला जाण्यात शहाणपणा नाही हे
हत्तीच्या लक्षात आल्याने तो तिथून निघून गेला. जाता-जाता त्याने आपल्या सोंडेचा
फटकारा कोल्होबास लगावला. त्या फटकाऱ्याने कोल्होबा दूर जाऊन पडला. त्याचे पेटकाडच
मोडले. वेदनेने तो तळमळू लागला.
जाड्या, तुला चांगलाच धडा शिकवतो म्हणून तो
हत्तीवर ओरडला.
पण मी तर
काहीच केलं नाही...हत्ती हसत म्हणाला.
जाड्या, हसतोस कशाला? आत्ता लगेच महाराजांकडे जाऊ तुझी तक्रार करतो.
हे बघ, मी काही केलेच नाही तर तू तक्रार कशाची
करणार? हत्ती डोळे मिचकावित म्हणाला.
महाराज जेव्हा शिक्षा करतील तेव्हा तुला कळेल ? असं बोलून कण्हत कण्हत कोल्होबा सिंह महाराजांकडे
गेला. हत्तीने त्याला कसे मारले याचे वर्णन तिखट मीठ लावून केलं.
पण कोल्होबा, हत्तीराव असं काही करेल हे मला पटत
नाही.
म्हणजे महाराज, मी खोटा बोलतोय असं तुम्हाला वाटतं
की काय? हत्तीच्या सोंडेचा हा वळ बघा, माझ्या शरीरावर कसा
उमटला ते...
कोल्होबाने रडत- रडत आपल्या शरीरावील वळ दाखवले.
अहो कोल्होबा, तुम्ही रडता कशाला? तुम्ही आपल्या प्राणी जगतात सर्वात हुषार प्राणी ना! मग जेव्हा हत्ती तुम्हाला मारु लागला तेव्हा
तुम्ही हुषारी दाखवून त्याच्यावरच डाव कां उलटवला नाही?
म्हणजे महाराज] मी
सगळ्या प्राण्यांमध्ये सर्वाधिक हुषार असल्याचं तुम्हालाही वाटतं! कोल्होबानं आश्चर्यचकित होऊन विचारलं..
असं मला वाटत होतं कोल्होबा...पण तुम्ही हत्तीरावांकडून
मार खाऊन आलात, ते बघून मला जरा शंका येऊ लागलीय...महाराज गालातल्या गालात हसत
म्हणाले.
महाराजांच्या या प्रतिक्रियेमुळे कोल्होबांची
मोठीच पंचायत झाली. आपणास हतीने मारलेच नाही असं म्हणण्याची आता सोय उरली नव्हती.
महाराज, महाराज, आपण गैरसमज करुन घेऊ नये.मी मनात
आणलं असतं तर त्या जाड्या हत्तीला गुंडाळून टाकलं असतं, माझ्या हुषार बुध्दीने
पण, तुम्ही ते केलं नाहीत. त्या जाड्या हत्तीचा
मार खाऊन रडत आलात माझ्याकडे...
महाराज, अहो आपल्या राज्यातील काही प्राणी कसे
स्वत:ला अतिशहाणे समजून इतरांना त्रास देतात ते तुम्हाला कळायला नको का? म्हणून मला तुमच्याकडे यावं लागलं.
अरे वा, छान! तुमच्यासारखे
नियमानुसार चालणारे नागरिक हीच वननगरीची खरी शक्ती आहे.
तर मग महाराज, तुम्ही हत्तीला शिक्षा करणार ना...
कशासाठी शिक्षा कोल्होबा?
अहो महाराज, त्याने मला मारलं,तीच
तक्रार घेऊन आलो होतो मी.
पण हत्तीरावाने गजराजाने तुम्हाला कां मारले? सिंह महाराजांनी विचारलं...आता या प्रश्नाचं
उत्तर काय द्यायचं हा प्रश्न कोल्होबास पडला. त्यामुळे तो काही क्षण शांत राहिला.त्याला
काही सूचेना. तो इकडे-तिकडे बघून लागला. त्याचे हे अवघडलेपण महाराजांच्या लक्षात
आलं.
कोल्होबा तुमच्यासारख्या सर्वाधिक हुषार
प्राण्यास उत्तर द्यायला इतका वेळ कां लागतो बॉ?
नाही म्हणजे महाराज...तसं काही नाही पण...
पण, तुम्हाला हत्तीरावाने
कां मारलं? हे सांगा की त्याला लगेच बोलावून मी शिक्षा करतो.
महाराज...कोल्होबा चाचरत
म्हणाला, आपल्या बुध्दीचा अंहकार बाळगू नये,गर्व करु नये,
असं मला तो जाड्या हत्ती म्हणाला.
कित्ती छान! उत्तम! त्याने तो चांगलं तेच सांगितलं. तुमच्याचच नव्हे
प्रत्येकाच्या हिताचं आहे.
पण महाराज...
तुम्हाला हत्तीरावांच्या बोलण्याचा राग आला.
तुम्हाला कसं कळलं महाराज?
नाही म्हणजे, तुमच्याइतकी नसली तरी आम्हालाही देवानं
थोडीफार बुध्दी दिलीय ना!
हॅ हॅ हॅ हॅ...कोल्होबा
ओशाळलागत हसला..
हत्तीरावाने तुम्हाला गर्व करु नकोस असं
सांगितलं. त्याचा तुम्हास राग आला.रागाच्या भरात तुम्ही त्याला वाट्टेल ते बोलेल
असाल.त्याचा वचपा त्याने सोंड फिरवून घेतला असणार...
आयला महाराज! तुम्ही जणू काही
प्रत्यक्षात जागेवर होतात या सारखं वर्णन केलत की हो. कोल्होबा आश्चर्य चकित होऊन म्हणाला.
काय करणार कोल्होबा, देवानं तुमच्या इतकी नाही पण थोडीफार बुध्दी
दिलीय ना आम्हाला सुध्दा. महाराज डोळे बारीक
करत म्हणाले..
महाराज, आता तुम्हाला कळलेच
आहे ना हत्तीने मला मारलेय ते, तर त्याला शिक्षा करा की.
पण कोल्होबा शिक्षा कोणाला करायची? जो आपल्या-असलेल्या नसलेल्या बुध्दीचा अहंकार
बाळगतो, फुशारकी मारतो, गर्व करतो की जो अशा फुशारकी मारणाऱ्यास चांगल्या हेतूने
सावध करतो त्यास...
सिंह महाराज आणि हत्ती हे दोघेही आपल्या बुध्दीवर
जळतात, असं मनात म्हणत कोल्होबा तिथून निघून जाऊ लागला.
मूर्ख कुठला? महाराज उठता उठता
म्हणाले. कोल्होबाने चमकून मागे बघितलं. महाराज आतल्या दालनात जाण्यासाठी वळले
होते. आता हे मूर्ख त्यांनी स्वत:ला म्हंटले की गजराजास म्हंटले हा प्रश्न
कोल्होबास पडला. सिंह महाराजांनी आधीच आपल्या बुध्दीचं कौतुक केल्याने ते आपणास
मूर्ख नक्कीच म्हणणार नाही.याची कोल्होबास खात्री पटली असल्याने त्याच्या चेहऱ्यावर
हसू आलं.
जाड्या हत्तीला, सिंह महाराजांनी मूर्ख म्हंटल्याचे,हे
त्याला कधी सांगतो नि कधी नाही असं झाल्याने तो हत्तीरावाकडे धावतच सुटला....
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment