राघवची जादू?
राघवची जादू?
घाबरतोस कशाला दादा, मी आहे
ना...असं राघव, ऋषिकेशला नेहमी सांगायचा. राघव चार वर्षाचा तर ऋषिकेश वय आठ वर्षाचा.
हा राघव छोटूपेक्षा चार वर्षांनी लहान. पण छोटूच, मोठूला सांगतोय की घाबरतोस कशाला? मी आहे
ना.गंमतच न्यारी!
बघ, बघ, त्याच्याकडे
नि शहाणा हो, शिक जरा! असं ऋषीचे बाबा त्याला अधूनमधून सांगत.
ऋषी बाबा आणि राघवचे बाबा दोघेही सख्खे भाऊ. ऋषी मुंबईला राहतो तर राघव जळगाव जिल्ह्यात
मूडी यागावी राहतो.
मुंबईत राहणारा ऋषी अभ्यासात फार
हुषार! पण घरकोंबडा. शाळा ते घर आणि घर ते शाळा. बस्स, हेच त्याचं जग. शाळेतही
एकटचं राहणं त्याला आवडतं. एकदोन मित्र सोडले तर त्याच्याशीही कुणी फारसं बोलत
नाहीत.
ऋषी, नाकासमोर चालणारा, एकदम सरळमार्गी.
कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. साध्या साध्या गोष्टीनेही भिणारा.
एकदा सरांच्या हातातून फळा पुसता-पुसता
डस्टर खाली पडलं. तर त्या आवाजाने ऋषी घाबरल्याचं सगळया वर्गानं बघितलं. डस्टरला
घाबरणारं कार्टून किंवा "डघका-डघक्या" असं त्याचं टोपन नाव मुलांनी ठेवलं. अरे, तो बघ डघका आलाय, डघक्या
निघालाय, असं त्याला मुलं चिडवीत. त्यामुळे ऋषी आणखीच स्वत:मध्ये आक्रसत गेला.
घरीसुध्दा, छोट्या-छोट्या आवाजाने
तो दचकायचा. पाल दिसली की तोंड लपवायचा. झुरळ दिसला की अंथरुणात जाऊन लपायचा.
याउलट राघव. त्याला कशाचीही भीती
वाटायची नाही. ऋषी, मूडीला गेला की राघव त्याला बाबांच्या शेतात घेऊन जाई. आंब्याच्या
झडावर माकडासारखा सरसर चढून आंबे तोडी. बोरं तोडी.
तो कोणत्याही मोठ्या झाडावर झपाझप
चढत असे. खाली पडायची त्याला भीतीच वाटत नसे. एकदोनदा तो पाय घसरुन पडला. पायाला
जखमही झाली. पण त्याने शेतातलं कसलं तरी बारकं बारकं पिवळ फुल तोडलं. त्याला
कुस्करुन जखमेला लावलं. काही क्षणात स्वारी पुन्हा या झाडावरुन त्या झाडावर.
ऋषिला याचं फार आश्चर्य वाटायचं.
राघवकडे काहीतरी जादूच असली पाहिजे असही त्याला बरेचदा वाटायचं.
अरे दादा, यात कसली आलीय जादू. भ्यायचच
नाही, असं पक्क मनात ठरवलं की काहीच होत नाही बघ.
एकदा झाडांच्या फांद्यावर राघव दंगामस्ती
करत असताना तिथे दोन मोठी माकडं आणि त्यांची पिल्लं आलीत. त्यांना बघून ऋषीचे पाय
लटपटायला लागले. तो दुसरीकडे पळाला. राघव मात्र माकडांकडेच दात विचकावून बघू
लागला. ते बघून माकडाचे पिल्लही दात विचकावू लागले. हा आपल्याला घाबरुन पळत नाही,
हे मोठ्या माकडांच्या लक्षात आल्यावर त्यांनी राघवकडे लक्ष देणं सोडून दिलं.
पिल्लं मात्र त्याच्यासोबत दात विचकावण्याचा खेळात खेळण्यात दंग झाली. थोड्याच
वेळात त्यांचीही भीती गेली. ते धीटपणे राघव जवळ आले. राघवने एका पिल्लाच्या शेपटास
हलकेच हात लावला. दुसऱ्याच्या डोक्यावरुन हलकेच हात फिरवला. दुरून श्वास रोखून ऋषी
देवाची प्रार्थना करत त्यांच्याकडे बघू लागला.
राघवच्या त्या प्रेमळ स्पर्शाने
आनंदून एक पिल्लू त्याच्या खांद्यावर जाऊन बसलं. दुसऱ्याने आवाज करुन मोठ्या
माकडांचं लक्ष वेधलं. मोठ्या माकडांनी झाडावरचे आंबे तोडून त्यांच्याकडे भिरकावले.
ऋषिचा तर विश्वासच बसेना. राघवकडे जादूच
असली पाहिजे याची त्याला पुन्हा खात्री पटली.
राघव, ऋषिला आंबे खाण्यासाठी बोलावू
लागला. पण त्याची काही हिम्मत झाली नाही.
थोडावेळ राघवसोबत खेळून ती पिल्लं
मोठ्या माकडांकडे निघून गेली. त्यांच्या पोटाला बिलगल्यावर ती दोन्ही माकडं या
फांदीवरुन त्या फांदीवर उड्या मारत दूरवर निघून गेली. ऋषिने आतापर्यंत रोखून
धरलेला श्वास सोडला. राघव फांदीवरुन खाली उतरुन त्याच्याकडे धावला. तेव्हा ऋषी
थरथर कापायला लागला.
अरे, दादा आता काय झालं? ती
माकडं गेलीत ना...
राघव, तू तू, माझा
भाऊ नाहीस तू जादूगार आहेस. किंवा भूत आहेस...ऋषी त त प प करत म्हणू लागला. लगेच घराकडे
पळाला. राघवसुध्दा त्याच्यापाठीमागे पळू लागला.
पळत-पळत घरी आल्याने दोघांनांही धाप
लागली.
अरे, असे वाघ पाठीमागे लागल्यासारखे
कां पळता तुम्ही? ऋषिच्या बाबांनी विचारलं.
बाबा, हा राघव नाही,हा भूत
आहे...जादूगार आहे. आपल्या बाबाला बिलगून ऋषी म्हणाल. तो अजूनही घाबरला होता. थरथर
कापत होता.
अरे काय झालं, इतकं घाबरायला? राघवच्या
बाबांनी विचारलं. तेव्हा त्याने शेतात घडलेला प्रसंग सांगितला. तो ऐकल्यावर ऋषी
आणि राघवचे बाबा खो-खो हसू लागले. राघवच्या बाबाने त्याला जवळ घेतलं. त्याच्या
डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवत म्हणाले.
दादा, हा राघव काही
भूत नाहीय, भूत तुझ्याच डोक्यात आहे.
क s कs काय...ऋषी आणखी घाबरुन जोराने ओरडला.
हो राज्या, अरे भीतीचं भूत तुझ्या
डोक्यावर स्वार झालय, त्याबद्दल काका म्हणतोय. ऋषिचे बाबा त्याला म्हणाले.
पण बाबा, माकडं कशी काय आपल्याशी
खेळू शकतात?
तुझ्या, या छोट्या भावाने
सिध्द केलय की ते! तो सुरुवातीला त्यांना भ्यायला नाही. तिथून
पळाला नाही. त्यामुळे त्यांना खात्री पटली, हा आपणाला काही करणार नाही. मग ते हळूच
आले त्याच्यासोबत खेळायला. तू तुझ्या डोळयांनी बघितलस ना सारं, की तेव्हा डोळे
मिटून बसला होतास.
बघितलं काका पण...
पण भीती! तुला
सारखी कशाची ना कशाची भीती वाटते. या राघवास कशाचीही भीती वाटत नाही. त्यामुळे
मस्त मजेत इकडे तिकडे उंडारतो, खेळतो, खूप मित्र करतो. नदीत पोहतो, झाडावर झपाझप
चढतो. झाडावरुन उड्या मारतो, माकडांशी खेळतो. कुणाशी मारामारी करायची वेळ आली तरी
दोन खातो नि दोन देतो सुध्दा.
आजच्या जगात असं भिऊन राहीलं की
आपला निभाव लागत नाही राज्या. ऋषिचे बाबा त्याला जवळ घेत म्हणाले..
काका आणि बाबांचं
म्हणनं ऋषिला पटलं. यापुढे आपणही राघवसारखं कशालाच भ्यायचं नाही आणि, दादा, भितोस
कशाला मी आहे ना, असं राघवने म्हणण्याऐवजी आपणच अरे, राघवा भितोस कशाला मी आहे ना,
असं म्हणन्याचा निर्धार करुन त्याने राघवकडे हात पुढे केला. दोन्ही भावांनी
एकमेकांना घट्ट मिठी मारली.
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment