वाघोबाच्या कुशीत
वाघोबाच्या कुशीत
बाळ, तुला पुढे काय व्हायला आवडेल,असं आजोबांनी पिंकीला
विचारलं.
अहो बाबा ती
डॉक्टरच होणार, हो की नाही गं रश्मी. पिंकीच्या बाबांनी तिच्या आईला म्हणजेच रश्मीला विचारलं.
मी तुम्हाला
कुठे विचारलय, मी पिंकीला विचारलं ना..
तिला काय कळत त्यातलं.
तू तिच्याएवढा होतास, तेव्हा तुला काय कळत होतं. आजोबा बाबांकडे कटाक्ष टाकत
म्हणाले. यावर बाबा निरुत्तर झाले.
0000
पिंकी आठवीत
गेल्यापासून, ती पुढे काय होणार याची चर्चा तिच्या घरी सुरु झाली आणि ती डॉक्टरच होणार
यावर शिक्कामोर्तब होऊन थांबली. तिचे बाबा डॉक्टर होते, त्यामुळे
त्यांना ती डॉक्टरच व्हावी असं वाटायचं. आई बाबाचीच री ओढायची.
सध्या आपल्याला
खूप खेळायचं आहे. पुस्तक वाचायची आहेत ,फिरायचं आहे किंवा मस्त झोपायचच आहे, अशाच विचारात
गुंतलेल्या पिंकीस आपणास पुढे काय व्हायचंय, याची अजिबात
चिंता नव्हती वा पुढे काय करायचय याचा विचारही तिच्या मनात अद्याप आला नव्हता.
डॉक्टर
होण्याची चर्चा घरी सुरु झाली की ती, डोळे उघडे ठेऊन कान बंद करुन टाकी आणि शून्य
नजरेनं चर्चा ऐकत राही. तिला या चर्चेत मुळीच रस नव्हता. त्यामुळे डॉक्टर झालं की यूंव
होतं नि त्युंव होतं, मग सारी सुखे पायाशी लोळन घालतात,
मान सन्मान मिळतो, गाडी बंगला होतो वगैरे मुद्यांचा
काय अर्थ होतो, हे तिला काही कळायचं नाही. याबद्दल तिने आईबाबांना काहीही
विचारायची तसदीही घेतली नाही.
पण डॉक्टर
होण्यासाठी दहावीपासून खूप अभ्यास करावा लागतो, शिकवणी लावावी लागते, खूप
चाळणी परीक्षा द्याव्या लागतात, टीव्ही बघायचा नसतो. खूप
सराव करावा लागतो, अशा बाबी कानावर पडल्या की ती कान
टवकारायची. खूप अभ्यास किंवा रात्रंदिवस अभ्यास करणं, हे काही आपल्याला जमणारं
नाही, याची तिला खात्री होती, त्यामुळे
डॉक्टर होण्याची चर्चा सुरु झाली की ती शरीराने घरात पण मनाच्या फुलपाखरावर बसून कल्पनेच्या
आकाशात फिरत बसायची. हे तिच्या आईबाबांच्या लक्षात येत नव्हतं. पण आजोबांनी मात्र
ते बरोबर ओळखलं, म्हणूनच त्यांनी, आज
तू काय होणार आहेस हा विषय तिच्या आईबाबांसमोर छेडला.
खर सांगू का
आजोबा, मला जंगलात जाऊन वाघोबाच्या कुशित झोपावसं वाटतं. पिंकी आजोबांच्या नजरेला नजर
भिडवीत म्हणाली.
तिच्या
उत्तरानं सर्वजण हसले.
अग छबडे, वाघोबा म्हणजे आपला
टॉमी नव्हे. वाघोबा त्याच्या बाळांशिवाय कोणालाही आपल्या आसपास फिरकू देत नाही.
पण मी जाईन
म्हणते त्याच्याजवळ,
प्रयत्न केले की सारं काही जमतं असं कोण बरं म्हणालं होतं.
ते आधी
नेपालियननं म्हटंल होतं, त्यानंतर प्रत्येक मुलाचे आईबाबा, त्यांना
जमलं नाही तरी त्यांच्या मुलांना हेच सांगत असतात.
माझ्याही
मम्मी डॅडींनी हेच सांगितलं की नाही.,
होय...
मग वाघोबाच्या कुशीत झोपण्याची इच्छा मी ठेवली तर काय हरकत आहे.
पण
त्याच्याजवळ कशी जाशील तू..
चालत चालत जाईन की..
अगं, तो जंगलात तेही घनदाट जंगलात राहतो.
मग काय झालं,
तिथे जाईन ना..
अहो बाबा, ही काही तरी वेड्यासारखी बोलते आणि तुम्ही ते ऐकून घेता.नाराजीच्या सुरात
बाबा,आजोबांना म्हणाले.
अरे, बोलू ना दे ना तिला..
मारुती चितमपल्ली जात होते की नाही जंगलात चालत चालत.
ते फॉरेस्ट ऑफिसर होते बाळ..
वाव, अहो आजोबा, त्यांच्याबद्दल परवाच मी कुठेतरी वाचलं.
त्यांना जंगल वाचता येतं म्हणे. जंगलातल्या पशु, पक्षी आणि
प्राण्यांची भाषा कळते म्हणे. किती अदभूत आहे, नाही का.
म्हणजे तू जंगलात जाऊन राहयचं म्हणतेस...आई थोडीशी रागावून म्हणाली.
कां काय
झालं.. मंदाकिंनी आमटे आणि त्यांची मुले नाही का भाम्रागडच्या जंगलातच राहतात, आजोबा पिंकीच्या बाजूने बोलले.
अहो बाबा, काहीतरी वेडंवाकडं
तिच्या मनात टाकू नका.. माझा चांगला दवाखाना चाललाय. पुढे ती याच दवाखान्यात
प्रॅक्टिस करेल ना. तिने डॉक्टरच व्हायला हवं.
होय ना, तिने डॉक्टरच व्हायला
हवं, बाबांच्या म्हणण्याला होकार देत आई म्हणाली.
पण,तुम्हाला पिंकीवर अशी जबरदस्ती करता यायची
नाही.
तुम्ही तिला फितवू नका म्हणजे झालं. असं काहीसं आजोबांना म्हणावसं आईला
वाटलं. पण यामुळे उगाच वादंग निर्माण होईल म्हणून ती गप्प राहिली. बाबांच्या चेहऱ्यावरही नाराजीच्या छटा
उमटलल्या.
आजोबांच्या
सूक्ष्म नजरेतून या बाबी सुटल्या नाहीत.
हे बघा ,शेवटी ती तुमची मुलगी
आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं ते करालच. पण तिच्या मनाविरुध्द करु नका,इतकच
माझं सांगणं आहे. समाजाला जशा चांगल्या डॉक्टरांची गरज आहे, तसंच
चांगल्या वनाधिकाऱ्यांचीही गरज नाही का.. डॉक्टकीतच मोठ करिअर होत असं कुठे लिहिलय
का ? वनाधिकारी झाल्यावरही मोठमोठी पदे मिळतात. वनात राहायला
मिळतं. जंगलाच्या ज्या भागात सर्वसामान्यांना जायला मिळत नाही त्या ठिकाणी जायला
मिळतं. तुम्ही-आम्ही कधीही न बघितलेले पशू-पक्षी बघता येतात. वाघासोबतही राहता
येतं. यापेक्षा आणखी आनंद तरी काय, नाही का...
बाबा, तुमचं म्हणणं बरोबरच
आहे, पण पिंकीमध्ये जर गुणवत्ता आहे तर ती अशी कां बरं वाया
घालवायची.
डॉक्टर झाल्यानेच गुणवत्ता कामी येते आणि फॉरेस्ट ऑफिसर झाल्यानं नाही, असा काही सिध्दांत आहे
का.. उलट
डॉक्टर व्हायला जेवढे परिश्रम घ्यावे लागतात तेवढेच परिश्रम वनाधिकारी व्हायला
घ्यावे लागतात. कोणाही येरागबाळ्याचे काम नव्हे ना हे.
000
आता, यावर काय बोलावं हे
काही पिंकीच्या आईबाबांना कळेना. आजोबा आपल्या बाजूने जबरदस्त बॅटिंग करताहेत बघून
पिंकींचा आंनद गगनात मावेना. वाघाच्या कुशित झोपायचं असं तिला वाटायचं. किंवा ते
तिचं स्वप्न होतं. या स्वप्नपूर्तीचा मार्ग असा वनाधिकारी बनण्यातून जातो, हे तिला आज आजोबांच्यामुळे कळलं होतं.
यू आर ग्रेट, म्हणून तिने आजोबांना
मिठी मारली. त्यांना तिने हलकीशी पापी दिली.
मला काय
व्हायचय हे खरच काही कळत नव्हत किंवा समजतही नव्हतं. आता मी ठरवलय की व्हायचं ते
फॉरेस्ट ऑफिसरच. जंगलाची शान..पिंकी महान, असं ती उत्सुर्फतपणे बोलून गेली.
आईबाबांचे
चेहरे पाहण्यासारखे झाले.

Comments
Post a Comment