रस्तेवाले जोशी! (भाग दोन)
रस्तेवाले जोशी! (भाग दोन)
(पूर्वसूत्र-पोलाद निर्मितीतून निर्माण
होणाऱ्या कचऱ्यातून ऑस्ट्रेलियाच्या विमानताळाची धावपट्टी बांधण्याचे कार्य स्वत:च्या
बळावर रस्तेवाले जोशी यांनी घ्यावे व त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनीच उचलावी,अशी
अट कंपनीने घातली...ही अट श्री जोशींनी मान्य केली का?पुढे काय
झालं?)
भाग दोन
जोशींना हायसं वाटलं.कारण गुहा अलिबाबाचीच असणार हे त्यांना पक्क ठाऊक
होतं. त्यांनी कंपनीचे आभार माणून स्लॅगपासून धावपट्टी बांधण्याच्या कामास सुरुवात
केली.ठरलेल्या वेळेत धावपट्टी तयार झाली.
विमानतळ अधिकाऱ्यांनी आता नवा प्रश्न त्यांच्या समोर टाकला. ही
धावपट्टी टिकावू असल्याचं हे तूच सिध्द कर?
जोशींचा आत्मविश्वास इतका दांडगा की ते संबंधित अधिकाऱ्यास म्हणाले,
सर, तुमही जगातील कोणत्याही यंत्रणेला आणा आणि धावपट्टीच परीक्षण करा.
उगाच तुम्हाला शंका नको नि पुढे डोकेदुखी नको.
या गृहस्थाचा हा आत्मविश्वास आत्मघातकी तर ठरणार नाही ना, असं त्या
अधिकाऱ्यांना वाटलं. मात्र त्याने अमेरिकेतील धावपट्टी परीक्षण आणि निरीक्षणात
तज्ज्ञ आणि सर्वोत्कृष्ठ कंपनीला पाचारण केलं. कंपनीने अनेक पध्दतीनं या
धावपट्टीचं परीक्षण केलं. शेकडो टन साहित्य असलेली मोठमोठी बोईंग विमान उतरवण्यात
आली. ही धावपट्टी जगातील इतर धावपट्टींपेक्षा अधिक सरस आणि सक्षम असल्याचा कंपनीने
निर्वाळा दिला. विमानतळ अधिकाऱ्यांची तर वाचा जाता जाता राहिली. कारण स्लॅगच्या
निर्मितीपासून बांधलेल्या धावपट्टीमुळे आठशे कोटी रुपयांची बचत झाली.
आठशे कोटी रुपये वाचवणारा स्लॅग आणि विजय जोशी यांचं नाव सर्वोतोमुखी
झालं. या अदभूत पराक्रमानं त्याची दखल ऑस्ट्रेलियन सरकार दरबारी घेतली गेली.
आपल्या देशात, फादर ऑफ स्लॅग इनोव्हेशन असल्याचा सार्थ अभिमान ऑस्ट्रेलियन सरकारला
झाला, आणि सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया देऊन
सन्मानित केले.
०००
आत्मविश्वास आणि अथक नाविन्याचा शोध घेण्यासाठी परीश्रम करण्याची
तयारी असेल तर अशक्यप्राय गोष्टी साध्य करता येतात हे जोशी यांनी स्वत:च्या
उदाहरणानं आणखी एकदा सिध्द केलं.
त्यांचं शिक्षण झालंय ते स्थापत्य अभियांत्रिकी पण संशोधन मात्र केलेय
त्यांनी स्लॅग म्हणजे लोखंड अथवा पोलादापासूनच्या कचराच्या सदुपोग या विषयात. हा
विषय आहे खनिजशास्त्राचा. म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी आणि खनिजशास्त्र दोन्ही
परस्पर विरोधी बिंदू.
पण एकदा ठरवलं की करायचंच, हा बाणा असल्याने जोशी यांनी, वोलोंगगॉन
विद्यापीठात या संशोधनासाठी रितसर अर्ज केला. हा अर्ज बघितल्यावर विद्यापीठ चकित
झाले. कारण आजपर्यंत या विषयावर कुणीही संशोधन केलं नव्हतं. त्यामुळे या
विद्यापीठात या संशोधनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी कुणीही तज्ज्ञच नव्हता. त्यामुळे
जोशींचा अर्ज त्यांनी नामंजूर केला. पण पुन्हा चिकाटीचा गुण त्यांच्या कामी आला.
ते पुन्हा पुन्हा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना भेटत राहिले. त्यांचं एकच सांगणं
असायचं, नसेना का तुमच्याकडे या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक, पण मी जे काही संशोधन
करेल, त्याची दिशा,प्रकिया,पध्दती,योग्य आहे ना यावर लक्ष ठेवणारा आणि मार्गदर्शन
करणारा खनिज शास्त्रातील अधिकारी व्यक्ती मार्गदर्शक म्हणून द्या.
जोशींच्या चिकाटीला अखेर फळ
आलं. विद्यापीठानं त्यांना या विषयात संशोधानासाठी प्रवेश दिला. त्यांना एक तज्ज्ञ
मार्गदर्शकही दिला. आपलं संशोधन हे आपण ज्या कंपनीत काम करतो, त्या कामाशीच मिळतं
जुळतं असल्यानं आपणास पूर्णवेळ नोकरी आणि पूर्णवेळ संशोधन अशा दोनही संधी
द्याव्यात ही विनंती जोशी यांनी केली. ती विद्यापीठानं मान्य केली. मात्र
त्यांच्या संशोधनाचं परीक्षण हे इतर देशातील तज्ज्ञ करतील हे त्यांच्याकडून कबूल
करुन घेतलं. यासाठी जोशी एका क्षणात तयार झाले. कंपनीने त्यांना संशोधन करण्यासाठी
परवानगी दिली असली तरी बऱ्याच अटीही टाकल्या होत्या. महत्वाचं म्हणजे पीएचडी
केल्यावर जोशींना वेतनवाढ वगैरे दिलं जाणार नव्हतं.कामाच्या वेळेत अजिबात कपात
केली जाणार नव्हतं.सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही संशोधन होईल,त्यावरचा मालकी
हक्क कंपनीचा राहील, असं जोशींकडून कबूल करुन घेण्यात आलं.
आपल्याला संशोधनाची संधी मिळतेय ही अशक्यप्राय गोष्ट असताना जोशींना
इतर बाबी फारच शुल्लक वाटल्या. त्यांनी सगळया अटी मान्य केला. वेळेवर संशोधन पूर्ण
केलं.हे संशोधन या क्षेत्रासाठी क्रांतीकारक असच होतं.
अभियंते विजय जोशी आता डॉ विजय जोशी झाले.त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियात शेकडो किलोमीटरचे रस्ते
बांधले.जपान व इतर देशांसाठी सल्लागार म्हणून काम केलं.
०००
जोशी यांचं मातृभूमिवर अतिशय प्रेम. या भूमिचं आपण देणं लागतो ही
भावना त्यांच्या मनात सदैव जागृत असते. त्यामुळे जेव्हा भारत सरकारच्या रस्ते
विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यांना भारतातील रस्त्यांच्या
निर्मितीसाठी सल्लागार म्हणून काम कराल का, असं विचारलं तेव्हा त्यांची एकही
क्षणाचा विलंब न लावता होकार दिला. त्यांची एकच अट होती,ती म्हणजे ते याकामासाठी
एकही पैसा मानधन घेणार नाहीत.
आजच्या काळात हा गुण सर्वात दुर्मिळच. पण हा दागिनाच जोशी यांचे खरे
वैभव. भारत सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सल्लागार झाल्यानंतर गेली पाच
सहा वर्षे ते प्रत्येक दोन महिन्यानंतर
भारतात येतात. याचा कोणताही खर्च ते भारत सरकारकडून ते घेत नाहीत. मातृभूमिचे ऋण
ते त्यांच्या परिने असं फेडत असतात...
०००००
डॉ विजय जोशी यांची विजय पताका ऑस्ट्रेलियात अशी फडकत असतानाचा,
भारताचा सचिन तेंडूलकर एकामागोमाग एक असे विक्रमांचे पर्वतच रचू लागला होता.
ऑस्ट्रेलियाचे दैवत असलेल्या डॉन ब्रॅडमन यांनी, मला माझं प्रतिबंब सचिनमध्ये
दिसतय अशी भावना व्यक्त करुन सचिनचा पराक्रम अव्दितीय असल्याचे अधोरखितच केलं.
ऑस्ट्रेलियात सचिन तेंडुलकरचं मोठं गारुड आहे. सचिनचे किक्रेटच्या क्षेत्रातील प्रचंड
योगदान लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांना, ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा
पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाला तुम्ही सन्मानीय अतिथी म्हणून
आमंत्रित आहात असा मेल, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधांनी डॉ विजय जोशी यांना केली. हे
खर तर अविश्वसनीयच होतं. डॉ विजय यांनी स्वत:ला चिमटा घेतला. द ग्रेट सचिन
तेंडुलकराच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी असल्याचं खुद्द
पंतप्रधान सांगताहेत म्हंटल्यावर कुणालाही तसच वाटणार...
अतिशय मोजक्या निंमत्रीतांच्या उपस्थित झालेल्या, ऑर्डर ऑफ
ऑस्ट्रेलिया, या पुरस्कार सोहळयात डॉ विजय जोशींची सचिन तेंडूलकर यांच्यासोबत
पहिल्यांदा भेट झाली. पुढे दोघांची बऱ्यापैकी मैत्री झाली. पुढे सचिन नव्या नव्या
विक्रमांच्या रस्त्यावरुन सुसाट निघाला. डॉ विजयही आधुनिक पध्दतीच्या रस्ते
निर्मितीच्या कामात गढून गेले.
एकदा सिडनीमध्ये क्रिकेट सामन्यासाठी आलेल्या सचिन तेंडुलकरला भेटून,
मुलाने लिहिलेले क्रिकेटवरील पुस्तक त्यांना सचिनला द्यायचे होते...
सचिन ज्या ठिकाणी थांबला होता त्या ठिकाणी डॉ विजय जोशी गेले.हजारो
चाहते,सुरक्षा रक्षक यांच्या गराड्यातून डॉ विजय जोशी तुम्हाला भेटायला आले आहेत
असा निरोप सचिनपर्यंत गेल्यावर, रस्तेवाले जोशी का?हे
उत्स्फुर्त उद्गार त्यांच्या मुखातून निघाले....
क्रिकेटच्या देवाने दिलेली ही उपाधी डॉ.जोशींना सर्वश्रेष्ठ आणि
अभिमानाची वाटते...
सुरेश वांदिले
००००
.jpg)
Comments
Post a Comment