आईची लेक
आईची लेक
एका
खारुताईचं घर मला ठाऊकाय. ते आहे आमच्या घरी. आमच्या घराच्या बाल्कनित आइनं खूप झाडं लावली आहेत. कुंडितल्या
या झाडांमुळे मस्तपैकी बगिचा तयार झालाय. काही झाडांना रंगिबेरंगी फुले येतात. बाल्कनितल्या
बागेत पोपट, कावळा, टिटवी, फुलपाखरं चिमणी ,कबूतर, वेगवेगळे छोटे-छोटे रंगीबेरंगी
पक्षी अधूनमधून येतात. या झाडावरुन त्या झाडावर जातात. चिवचिव- कावकाव करतात. फुलं
खातात. पान खातात. थोडक्यात काय तर, थोडीशी दंगामस्तीच करतात म्हणा ना.
गेल्या
काही दिवसांपासून या टोळीत सामील झालीय एक खारुताई. एके दिवशी ती कुठून आली. कशी
आली. ते काही आम्हास कळलं नाही. ती आली पण, इतर पक्षांसारखी काही लगेच निघून गेली
नाही. बराच वेळ बाल्कनित इकडून तिकडे, तिकडून इकडे जात येत राहिली. खूप वेळानं ती निघून
गेली. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा आली. अशीच इकडून तिकडे, तिकडून इकडे जात राहिली. खूप
वेळ बागडत राहिली. तिसऱ्या दिवशीही तिने असचं केलं. आणि एके दिवशी एका मोठ्या
कुंडीच्या पाठिमागे तिने तिचं घर केलं. कुठून तरी गवत आणि असाच कचरा घेउुन यायची.
कुंडीच्या पाठिमागच्या जागेत टाकायची. खरं तर ते टाकणं नव्हतं. वरखाली असं काही
तरी ती करायची. त्यातून अर्धगोलाकार आकार तयार झाला नि तेच तिचं घर झालं. खारुताई
आता तिथेच राहू लागली. आम्हाला तिचा असा शेजार मिळाला.
ही
शेजारीणबाई मात्र, आईला काही आवडली नाही. कारण खारुताई सकाळी उठल्यापासून या
झाडावरुन त्या झाडावर बागडत असायची. त्यामुळे फांद्या तुटायच्या. फुले गळून
पडायची. भूक लागली की खारुताई झाडाची पानही खायची. एकदा तिने तुळस खाल्ली. तेव्हा
मात्र आईचा राग अनावर झाला. ती, या शेजारीणबाईच्या पाठीमागे धावली. पण खारुताई
फारच चपळ. शेपटी हलवत सुर्रदिशी पळून गेली. आई आणखीच चरफडली. मोठ्या कुंडीच्या
पाठिमागे असलेलं खारुताईचं घरच फेकून देते, असं काहीस बडबडत आईनं कुंडी जराशी
हलवली. कुंडीच्या आतून घर बाहेर काढण्यासाठी तिचा हात जाता जाता थबकला. कारण तिला
तिथं दिसले दोन-तीन छोटे छोटे अंडे. एकिकडे खारुताईचा राग आणि दुसरीकडे अंडी.
याचा
अर्थ खारुताई इथ आलीय ती आई होण्यासाठीच असं आईला वाटलं. मग तिने काय करावं? तिने पुन्हा कुंडी हळूहळू सरकवली. खारुताईचं घर वाचलं. खारुताई
संध्याकाळी तिच्या घरी परतली. दुसऱ्या दिवशी तिचा खेळ पुन्हा सुरु झाला. पण आज आई रागावली
नाही. तिच्या पाठीमागे धावली नाही. खारुताईकडे कौतुकानं बघत राहिली. आज खारुताईनं
कोणत्या झाडाची फांदी मोडली. कोणत्या झाडाची फुलं तोडली. कोणतं झाडं मोडलं हे
काहीच तिनं बघितलं नाही. खारुताईची मौजमस्ती ती दिवसभर बघत राहिली.
दुसऱ्या
दिवशी तिने नवी तुळस आणली. तुळशीची पानं खारुताईस खूप आवडायची, असं आईच्या लक्षात
आलं. त्यामुळे दोन-तीन तुळस तीन आणूनच ठेऊ लागली. एक तुळसं संपली, त्या जागेवर ती
दुसरी तुळस ठेवायची. आता खारुताईला कळलं होतं की आपल्या घरातून आणि या बागेतून
कुणीही पळवणार नाही. ती निर्धास्त झाली.
एके
दिवशी खारुताई हळूच गॅलरितून घरात आली. इकडे तिकडे बागडली. आई तिच्याकडे कौतुकाने
बघत राहिली. तिला तिने हाकललं नाही की हाटहूट केलं नाही. काही दिवसांनी ती
स्वयंपाकघराच्या खिडकीत जाऊन बसू लागली. आईच्या कौतुकात भर पडली. ती आता
खारुताईसाठी खिडकीमध्ये वरणभात किंवा असच काहीसं ठेऊ लागली. इटकत-मिटकत खारुताई
आनंदानं खाऊ लागली. आई तिला दुपारचं नि संध्याकाळचं काही ना काही खायला द्यायची.
खारुताईच्या
बागडण्यानं आईची बाग विस्कटली. पण आईस वाईट वाटायचं नाही. खारुताई जेव्हा बाहेर
जायची, तेव्हा आई बाग पुन्हा पूर्वीसारखी करायची. माझ्यासाठी हे सारचं वेगळं नि
आनंद देणारं होतं. मध्ये दोन-तीन दिवस खारुताई बागेत बागडली नाही आणि स्वयंपाकाच्या
खोलितही आली नाही. आईला काळजी वाटू लागली. दोन दिवस आई माझ्याशी नीट बोललीही नाही.
दोन-तीन दिवसांनी चमत्कार घडला. खारुताईच्या घरी आईस दोन तीन छोटी पिल्लं दिसली. म्हणजेच
खारुताई आई झाली होती. तिला बाळ झाले होते.
कित्येक
दिवसांनी आई खूप खूप आनंदी झाल्याचं मी बघितलं. माझा जन्म झाला तेव्हा आई अशीच
आनंदी झाल्याचे बाबा म्हणाला.
आईनं
त्यादिवशी पेढे आणले. आजूबाजूला वाटलं.
कशासाठी
हो. बाजूच्या काकूनं विचारलं.
अहो, मी
आजी झालीय ना. त्याचे हे पेढे.
माझ्या
कानावर हे पडलं नि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आईच्या लेकिला मुलं झाली होती
त्याचा तिला अपार आनंद झाला होता.

Comments
Post a Comment