सर्वांचा सन्मान करा(भाग दोन)


 सर्वांचा सन्मान करा(भाग दोन)

लहान मोठ्या प्राण्यांचा सिंह महाराज समान सन्मान करायचे.मात्र कोल्होबा,वाघोबा,लांडगोबा अशा सारख्या दरबाऱ्यांना ते मान्य नव्हते. आपला महाराज मूर्ख असल्याची त्यांची समजूत झाली होती.त्यामुळे ते सर्व महाराजांच्या विरुध्द कटकारस्थाने करत असत. पुढे...

०००

वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा, अस्वलराव यांना आश्चर्य वाटलं. वाघोबा हे आश्चर्य व्यक्त करत म्हणाले,

महाराज आपण काहीच कसं बोलला नाहीत. संकट दारात येऊन ठेपलं असताना असं शांत राहणं बरोबर नाही. कोल्होबा, लांडगोबा, अस्वलराव याचं आशयाचं बोलून गेले. त्यांनी वाघोबांची री ओढली.

महाराज आपला राग दाबून शांतपणे म्हणाले,

वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा, अस्वलराव तुम्हा सर्वांचं म्हणणे मी ऐकलं आहे.त्यावर मला विचार करायला थोडा वेळ द्या. आज यावर मी विचार करतो नि उद्या सारं काही स्पष्ट करतो. चालेल ना.

वाघोबा, कोल्होबा,लांडगोबा, अस्वलराव आणि इतर दरबाऱ्यांनी होकार दर्शवला. त्यांच्या चेहऱ्यावर कुत्सित हसू पसरले.

०००

महाराजांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा दरबार भरवला. त्यांनी एका लखोट्यातून कागद बाहेर काढला. तो एक आदेश होता. सर्व दरबाऱ्यांसमोर त्यांनी एक आदेश वाचून दाखवला. या आदेशात असं नमूद होतं की, वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा, अस्वलराव,रानडुकरे यांच्यासारख्या सर्व मोठ्या प्राण्यांनी उंदिर,मुंगी,माकोडे अशा सारख्या सर्व छोट्या प्राण्यांना प्रेमाणे वागणूक सर्वांनी दिली पाहिजे. त्यांचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. त्यांचा इवलासा आकार, छोटीशी असलेली किंवा नसलेली शक्ती यांचा कधीही अपमान होणार नाही असं वागलं बोललं पाहिजे. असं जे कोणी वागणार नाहीत, मग ते कोणत्याही पदावर असतो वा शक्तीशाली असतो त्यांना राज्यातून हाकलून दिलं जाईल.

हा आदेश वाचून दाखवल्याबरोबरच महाराजांनी दरबार बरखास्त केला नि ते अंत:पुरात निघून गेले.

०००

या आदेशाचा वाघोबांना प्रचंड राग आला. आपल्या सारख्या शक्तीशाली प्राण्यांपेक्षा आणि वननगरीच्या इतर महत्वाच्या प्राण्यांपेक्षा उंदिर, मुंग्या महाराजांना अधिक प्रिय वाटतात हे त्यांना समजून चुकले. अशा पुळचट महाराजांना वननगरीतून हाकलून लावायला हवं, असं वाघोबांना वाटू लागलं.

कोल्हा, अस्वल, लांडगा, रानडुक्कर यांना विश्वासात घेऊन सिंह महाराजांना पदच्युत करुन दूर हाकलून लावण्याची आपली इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासाठी त्यांनी कोल्होबा, लांडगोबा अस्वलराव यांची मदत अपेक्षित असल्याचं सांगितलं.

कोल्होबा, लांडगोबा, अस्वलराव, रानडुक्कर यानांही महाराजांचा राग आला असला तरी त्यांनी हाकलून दिलं तर आपली स्थिती ना घरका ना घाटका अशी होईल, अशी या सर्वांना मनोमन भीती वाटत होती. ही भीती त्यांनी एकमेकांना बोलून दाखवली. त्यामुळे त्यांनी वाघोबांना सरसकट पाठिंबा काही दिला नाही.

इच्छा उत्तमच असल्याचं कोल्हा, अस्वल, लांडगा, रानडुक्कर म्हणाले.

पण वाघोबा, माझी एक अट आहे, लांडोगाबा म्हणाले.

कोणती अट लांडगोबा..

वाघोबा, आधी तुम्ही सिंह महाराजांची गादी हिसकवा,आम्हा सर्वांना मोठी पदे द्या मग तुम्हाला समस्त लांडगे समुहाचा पाठिंबा राहील.

अस्वल, कोल्हा, रानडुक्करही असंच म्हणाले. वाघोबांना  भयंकर राग आला. आपले राज्य आले की सर्वप्रथम अशा कुटील प्राण्यांचा खातमा करु असं मनात ठरवून वाघोबांनी त्यांची बोळवण केली. आता शेजारील गेंडा-श्री महाराजांची मदत घेतली पाहिजे असं वाघोबांना वाटू लागलं.

०००

गेंडा-श्री महाराजांसोबत संधान बांधण्याचा दुष्ट हेतू घेऊन पंतप्रधान वाघोबांनी शेजारी राज्यात एकेदिवशी गुपचूप भेट दिली. आपले सिंहमहाराज कसे गुळाचा गणपती आणि साखरेचा महादेव झाले असून त्यांना मुंग्या उंदिर आवडायला लागल्याचं गेंडा-श्रींना सांगितलं. गेंडा-श्रींनी जर सिंहमहाराजांना हटवण्यास मदत केली तर वननगरीच्या गादीवर बसल्यावर अर्धे राज्य देऊ सा प्रस्तावच त्यांनी गेंडा-श्री महाराजांपुढे ठेवला.

गेंडा-श्री यांच्यासाठी ही सुवर्णसंधी होती. एकदा का सिंहमहाराजाला हटवले की मग सगळेच राज्य ताब्यात घेऊन या वाघोबास हाकलून लावू असा विचार करुन गेंडा-श्रींनी वाघोंबाकडे मैत्रीचा हात पुढे केला.

ठरल्याप्रमाणे एके दिवशी वाघोबा आणि गेंडा-श्री यांनी वननगरीवर आक्रमण केले. वाघोबांना सर्व खाचाखोचा माहीत असल्याने ते थेट सिंह महाराजाच्या दरबारात पोहचले. महाराज त्यावेळी न्यायनिवाडा देत होते. दरबारात इतर प्राण्यांसमवेत उंदिर आणि मुंग्याही होत्या.

वाघोबा आणि गेंडा-श्रीने सैन्यासह दरबारात प्रवेश केला. गेंडाश्रीच्या सैन्याने सिंह महाराजांना वेढा टाकला. लांडगा, कोल्हा, अस्वल, रानडुक्कर आंनदले. या सर्व घडामोडींकडे हुषार उंदराचे बारिक लक्ष होते. प्रसंगाचं गांभीर्य त्याला चटकन कळलं. त्याने झटदिशी गेंडा-श्रीच्या डोक्यावर उडी घेतली. झटपट कचदिशी चावा घेतला. गेंडा-श्री यांना काही कळण्याचा आत टुणकन उडी मारुन तो आपल्या सहकाऱ्यांना बोलावायला बाहेर पडला. त्याचे सहकारी दरबाराच्या आसपास वेगवेगळ्या बिळात होतेच. ते पटापट बाहेर पडले. आणि काही कळण्याचा आत उंदिर टोळी गेंडाश्रीच्या सैन्याला चावू लागली. त्यांच्या चपळाईपुढे गेंडा-श्री आणि त्याचे सैन्य हैरान झाले . या चाव्याच्या वेदेनेने गेंडा-श्री आरडाओरड करु लागला.

वाघोबाची दुष्टबुध्दी एव्हाना पिटुकल्या मुंगीच्याही लक्षात आलीच होती. अवतीभोवती शांतपणे काम करत असणाऱ्या आपल्या टोळीला तिने इशारा केला. मुंगीटोळी वाघोबांच्या चटकन त्यांच्या शरीराव पोहचून वाघोबास इकडे तिकडे चावू लागल्या. एकाच वेळी खूप साऱ्या मुंग्या चावू लागल्याने वाघोबांना काय करावे हेच कळेनासे झाले. त्यातच  उंदराने आता आपला मोर्चा वाघोबाकडे वळवला. त्याने वाघाच्या नाकपुडीला करकचून चावा घेतला नि मिशीचे केस ओढले. वाघ वेदेनेन तळमळू लागला. उंदिर झरदिशी वाघावरुन उडी मारुन पुन्हा गेंडा-श्रीवर चढून त्याला चावा घेऊ लागला. उंदराच्या तीक्ष्ण दातांनी गेंडा-श्री घायाळ होऊ लागला. मुंग्या आणि उंदिर आलटून पालटून वाघोबा, गेंडा-श्री त्याच्या सैनिकांवर चालून जात राहिले.

त्यामुळे ते हैरान झाले. या दोघा लहानग्या प्राण्यांना कसं पकडायचं हे कुणालाच कळेना. पुन्हा एकदा उंदिर आणि मुंगी आपल्या मदतीला धावून आल्याचं सिंह महाराजांच्या लक्षात आलं.

काहीक्षण गडबडून गेलेले महाराज आता सावध झाले. त्यांनी मोठी डरकाळी दिली. आपला पंजा उगारुन त्यांना वाघोबाला उचलले नि त्याला खाली आपटले. हा गोंधळ आणि उंदिर मुंग्यांच्या चाव्याने गोंधळून गेलेल्या गेंडा-श्रीला सिंहमहाराजांच्या सैन्याने पकडले.

फंदीफितुरीने सिंह महाराजांवरील झालेला हा हल्ला उंदिर आणि मुंग्यामुळे अयशस्वी ठरला.

यापुढे तरी कुणीही कुणाला लहान समजू नका. प्रत्येकाचा सन्मान करायला शिका. अशी तंबी देऊन महाराज कोल्हेरावांकडे बघत म्हणाले बरोबर ना कोल्होबा

कोल्होबा ततपप करु लागले. लांडगा ,अस्वल आणि रानडुकराने महाराजांच्या पायी लोटांगण घालून त्यांची क्षमा मागितली.

सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!