स्पेस टुरिस्ट भाग तीन


 

स्पेस टुरिस्ट भाग तीन

पूर्वसूत्र-

वर्गशिक्षक मनोहरराव देशपांडे यांनी समीरला विचारलं की, तुझं स्वप्न काय किंवा तुला भविष्यात काय व्हायचय ? समीरने या प्रश्नाचं जे उत्तर दिलं ते ऐकून त्यांना महद्आश्चर्य वाटलं. जेव्हा समीरनं आणखी विस्तृतपणे आपल्या स्वप्नाचं वर्णन केलं, तेव्हा तर त्यांना धक्का बसता बसता राहिला.

समीरने चंद्रावर भविष्यात कोणत्या ठिकाणी पर्यटन करता येईल,याचं प्रेझेंटेशन आई-बाबा आणि सरांसमोर केलं...पुढे...

अशी बरीच स्थळ दाखवल्यावर तो तिघांना म्हणाला ...

    भविष्यात या प्रत्येक ठिकाणी पर्यटकांना घेऊन जाता येईल. त्यांचं दर्शन घडवता येईल. त्याबद्दल समजावून सांगता येईल. यासाठी टूर गाइडची गरज भासू शकते की नाही ,तुम्हीच सांगा सर..

    हा सवाल बिनतोड होता. त्याचं तसं उत्तर तिघांकडेही नव्हतं. पण त्यांना समीरचं सांगणं अशक्यप्रायच वाटत होतं. ते त्यांच्या जुन्या संकल्पनेतून बाहेर पडायला तयारच नव्हते.

    अरे समीर, पुस्तकात वाचून किंवा इंटरनेटवरुन खूप माहिती मिळवली म्हणजे काही स्वप्न सत्यात येत नाही. सरांनी त्यांची प्रतिक्रिया दिली.

    बरोबर आहे सर तुमचं. म्हणूनच तर चंद्रावर 1969 साली पहिला मानव निल आर्मस्ट्राँग चंद्रावर चालल्यावर गेल्या  47 वर्षात अवघी 12 माणसंच चंद्रावर प्रत्यक्ष पाऊल ठेऊ शकली.. आणि आमचा हिरो निघालाय टूर गाईड व्हायला. चमत्काराने माणसं नेणार की फक्त मांजरी-कुत्रे यांचीच सफर घडवून आणणार, बाबा उपहासाने म्हणाले.

    खरतर मोठ्यांच्या अशा चमत्कारिक प्रश्नांना काय उत्तर द्यावं, हे समीरला कळेना. आता आईबाबा रागावले तरी आपल्या मनात जे काही आहे सांगून टाकायचच असं त्याने ठरवलं. तो सांगू लागला---

    बाबा तुम्ही म्हणता ते खरं आहे. पण चंद्रावर माणूस जाऊ शकतो असं सुध्दा अवघड आणि अशक्यप्राय वाटत होतंच की नाही. पण 12 माणसं कां होईना जाऊन आली. विज्ञानाची प्रगती इतक्या गतिने होत आहे की ही संख्या भविष्यात 12शे किंवा 12 हजार किंवा 12 लाख कधी होईल असं सांगता येणार नाही..तेव्हा टूर गाईडची नक्कीच गरज भासेल. अंतराळ पर्यटन म्हणजे कोणत्यातरी पर्यटन कंपनीने आयोजित केलेला दोन आठवड्यांचा यूरोप टूर ठरणार नाही बाबा.

    अरे शहाण्या,   तुला आम्ही बोलू देतो याचा अर्थ तू काहीही सांगावस असं नाही ना..बाबा रागावून म्हणाले..

    अहो,शांत व्हा पाहू. त्याला काय म्हणायच ते एकदा आपण ऐकून तर घेऊ, देशपांडे सर म्हणाले. खरतर आता काही सांगावं असं समीरला वाटत नव्हतं. त्याने एक आवंढा गिळला आणि तो पुन्हा सांगू लागला,

    अंतराळ पर्यटकास पर्यटन उड्डाण भरण्याआधी प्रशिक्षण घ्यावं लागेल. त्याची मानसिक, शारीरिक क्षमता जोखली जाईल. सध्या सगळ्या प्रकारचे प्रवास अधिकाधिक सुरक्षित होत असले, तरी अंतराळातील धोके आणि संकटं अनपेक्षित कोणत्याही प्रकारची राहू शकतात. अंतराळ टूर गाइड या प्रवासातला मार्गदर्शक आणि मित्र राहील.

अरे बाळा, ही तुझी पोपटपंची थांबव बर जरा आता. मी चार दिवस इंटरनेटवर बसले तर यापेक्षा चांगलं सांगेन. तुझं वय तरी आहे का हे सगळं समजून घेण्याचं. अजून खूप  शिकायचय आणि मग वाटल्यास विचार कर ना चंद्रावर टूर न्यायची की मंगळावर न्यायची.  आई समजुतीच्या स्वरात म्हणाली.

    13 व्यावर्षी आपणास जर लहान म्हणून हिणवत असतील तर संपल सारं. एकिकडे हेच आई बाबा शिवबांचा आदर्श ठेवा, सचिन तेंडूलकरचा आदर्श ठेवा, सानिया मिर्झाचा आदर्श ठेवा, लता मंगेशकरांचा आदर्श ठेवा असं उठता बसता सांगतात. पण या सर्व श्रेष्ठ मंडळींनी 12व्या, 13व्या वर्षीच मोठी मोठी स्वप्न बघायला सुरुवात केली नि ती वास्तवात उतरवली.. हे मात्र सोईस्कररीत्या विसरतात ही. असं काहीसं समीरच्या मनात आलं. पण आता गप्प बसणं श्रेयस्कर वाटून तो चूप बसला.

    आपलं म्हणणं समीरला पटलं असावं असं सर आणि आईबाबांना वाटलं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित उमटलं.

   

  000

    समीरच्या डोक्यावर खरोखरच परिणाम झाला नसले ना हो. आई रात्री झोपताना बाबांना म्हणाली. आपण त्याला चांगल्या डॉक्टरकडे दाखवू या का..

    कां नाही..माझ्या ओळखीचे एक मानसोपचार तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडे आपण घेऊन जाऊ समीरला.  बाबांनी आईला आश्वस्त केले..

  000

    समीरला यातलं सध्या काहीच ठाऊक नाही. कुणी काहीही म्हंटलं तरी आपण स्पेस टूर गाईड व्हायचच याचा त्याचा निर्धार पक्काच आहे.  त्याने आता स्पेस सायंटिस्ट होण्यासाठी काय करावं लागतं याची इंटरनेटवरुन माहिती घेणं सुरु केलीय...

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!