वाघाची मावशी(भाग दोन)
वाघाची मावशी(भाग दोन)
(प्रिय वाचक काल या कथेचा
पहिला भाग प्रकाशित झाला.आजच्या दुसऱ्या भागाची गंमत अनुभवन्यासाठी पहिला भाग वाचायलाच
हवा.)
रात्र झाली. मालकीनबाई झोपी गेल्या. टिटूही
तिच्या मऊशार अंथरुणात जाऊन पडली. पण तिला काही झोप येईना. या कुशिवरुन त्या
कुशिवर ती वळू लागली. सारखा तिच्या डोक्यात वाघोबाचाच विचार येऊ लागला. वाघोबाची
आपण मावशी कशी ? हा कोण वाघोबा ? राहतो कुठे ? एवढ्या वर्षात आपल्याला कुत्रा दिसला, बोका
दिसला, उंदिर दिसला, मालकीनबाईच्या घरात काचेच्या भांड्यातील मासा दिसला. कासव
दिसला. मग वाघोबा कां दिसला नाही ? आपण जर वाघोबाची मावशी असू तर त्याची आई आपली बहीण झाली.
ती सुध्दा कधीच दिसली नाही. तिनं आपल्याला कधी बोलावलं सुध्दा नाही.. मालकीनबाई
वाघोबाच्या नावानं आपल्याला भीती दाखवत आहेत हो. वाघोबा बिघोबा कुणी नसणारच .. असं विचार करता करता मध्यरात्री टिटूला कधी झोप
लागली हे कळलं नाही.
गाढ झोपतेच तिच्याकडे कुणीतरी येताना दिसलं. तो
एक धिप्पाड प्राणी होता. तिच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठा. डोळे आणि मिशा
तिच्यासारखेच दिसत होत्या. पायाची नखं थोडीफार तिच्यासारखीच होती. त्याला बघून टिटूला
दरदरून घाम फुटला. ती त त प प करायला लागली..
क क कोण रे तू, टिटू कशीबशी बोलली..
हे काय गं मावशे, मला नाही ओळखलं तू...
म्हणजे तू रे कोण आणि मी तुझी मावशी कधीपासून
झाली. मला तर कुणी बहीण होती असं काहीच आठवत सुध्दा नाही.
काय गं मावशे, तू इथे या मोठ्या घरी येऊन बसलीस. मऊ
मऊ गादीवर झोपतेस ,चॉकलेट खाते. पिझ्झा खाते. टीव्ही बघते. मालकीनबाईच्या गोष्टी
ऐकतेस. तेव्हा तुला तुझी बहीण आणि तुझे भाचरे कसे आठवणार ?
आँ.
आँ, काय करतेस मावशे तू. असं वागणं बरोबर नाही. तू
चल माझ्याबरोबर तुझ्या बहिणीकडे आणि भाच्यांच्या घरी..
आँ..
मावशे, हे सारखं सारखं आँ, आँ काय करतेस. मी खरच
सांगतो तुला. मी तुला न्यायलाच आलो आहे.
न्यायला म्हणजे ? कुठं जाणार ? कसं
जाणार ?
अगं, तू माझ्या पाठीवर बस मी बरोबर घेउुन जाईन
तुला माझ्या घरी.
तुझं सुध्दा घरं आहे.
मग माझं घरं असं चार भिंतीतलं नाही, तुझ्या घरासारखं. ते खूप मोठ्ठं आहे. राजाच आहे
मी माझ्या घराचा.
आँ..
पुन्हा आँ. मावशे. वाघाची मावशी सारखी आ, आँ करते याचा अर्थ ती फारच बावळट घाबरट आणि
मूर्ख आहे असा नाही का होत ? तुझ्या मालकीनबाईस हे कळलं तर त्या हाकलून नाही
का देणार तुला. तेव्हा त्यांनी असं काही करण्याआधी तू माझ्या सोबत चल... वाघोबा म्हणाला..
वाघाची मावशी, वाघाची मावशी, असं मालकीनबाई आपणास
म्हणते, तो हा वाघ आपल्यासमोर असा उभा ठाकेल असं टिटूस वाटलं नव्हतं. प्रारंभी
तिला त्या धिप्पाड वाघाची भीती वाटली. पण तो वाघ तिला सारखा-सारखा मावशे मावशे
म्हणू लागला तेव्हा तिची भीती थोडीफार पळून गेली. तिने वाघोबाच्या मिशीला स्पर्ष करण्यासाठी
एक पंजा पुढे केला. वाघोबास आपली मिशी प्राणापेक्षाही प्रिय असल्यानं त्याला
मावशीची ही कृती आवडली नाही. खरतर त्याला रागच आला. त्यामुळे त्याने मावशीचा तो
पंजा पकडण्यासाठी आपला जबडा उघडला. त्या उघडलेल्या जबड्यातील सुळयासारखे दात आणि
विजेसारखी लपलप करणारी जीभ बघून टिटू गर्भगळीत झाली. तिने जोराने किंकाळी फोडली.
झोपतेच उडी मारली. रात्रीच्या अंधारात ती सोफ्याला जाउुन धडकली. तिच्या डोक्याला
मार लागली. त्या वेदनेने टिटू विव्हळू लागली. या धडपडीच्या आवाजामुळे मालकीनबाईंना
जाग आली. त्या टिटूच्या खोलीत आल्या. त्यांनी लाईट लावला. टिटूची ती अवस्था बघून
त्यांना हसावं की रडावं हे कळेना. व्हिवळत असणाऱ्या टिटूला त्यांनी उचललं. तिच्या
डोक्यावरुन हात फिरवला. टिटूस बरं वाटलं.
काय झालं टिटू. वाघ दिसला की काय तुला स्वप्नात...
वाघाचं नाव कानावर पडताच टिटूने मान हलवली आणि मालकीनबाईच्या
कुशित आणखी घट्ट शिरली.
तिच्या अंगावरुन हात फिरवत मालकीनबाई म्हणाल्या, अगं
तू वाघोबाला बघितल्यावर घाबरलीस कशाला. तू तर त्याची मावशी ना.
टिटूने, नाही नाही अशा स्वरुपाची मान हलवली. वाघोबाचं नाव कानी पडताच टिटूला सू होता होता
राहिली. तिच्या अंगावरचे केस उभे राहिले. ती थरथर कापू लागली. हे बघून मालकीनबाईस
गम्मत वाटली. टिटूला वाघाची भीती वाटत असली पाहिजे असं त्यांना वाटलं.
होना गं.
टिटूने पुन्हा मान हलवली. भिंतीवर टांगलेल्या
वाघोबाच्या चित्राकडे बघून तिने मालकीनबाईच्या कुशित शिरण्याचा प्रयत्न केला.
अगं तू वाघाची मावशी असताना त्याला घाबरतेस कशी
गं. आँ. तू अशीच घाबरत राहिलीस तर मी तुला घरातून हाकलूनच लावीन. मालकीनबाईने तिला दटावून सांगितलं.
मालकीनबाई काहीही करु शकतात याची टिटूला खात्री असल्यानं,
आपण आता वाघोबास घाबरणार नाही, असं कसंबसं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तिने
उसनं अवसान आणलं. पण मालकीनबाई झोपायला गेल्यावर ते अवसान गळून पडलं.
०००
भिंतीवर टांगलेल्या वाघाच्या छायाचित्राकडे तिचं
लक्ष जाताच टिटू जागच्या जागी थरथरायला लागली. तिने स्वत:ला आक्रसून घेतले. तो
छायाचित्रातील वाघोबा मात्र बराच वेळ झाला तरी काहीच करत नाही असं तिच्या लक्षात
आल्यावर तिला हायसं वाटलं. तिनं स्वत:चं आक्रसणं सोडून दिलं. शरीरास आळोखेपिळोख
देऊन ती पूर्ववत झाली. भिंतीवरील वाघाच्या चित्राकडे काही क्षण एकटक बघत राहिली. चित्रातील
वाघाच्या डोळयात डोळे टाकून बघितले. पण तो चित्रातील वाघोबा हुं की चूं करेना...
आपण समजतो तितका हा वाघोबा काही भीतीदायक दिसत
नाही. उगाचच काहीबाही कल्पना करुन आपण घाबरत होतो. भीती आपल्या मनात असते. ती
काढून टाकली तर मग आपल्याला कुणीच काही करु शकत नाही. असं ती स्वत:लाच म्हणाली. तिने पुन्हा एकदा
वाघोबाच्या चित्राकडे बघितलं. तो एकाच जागी ढिम्म उभा होता. फारच ढिम्माडा
दिसतो बाँ आपला हा भाचा, असं स्वत:शीच पुटपुटत टिटू झोपी गेली.
०००
दुसऱ्या दिवशी मालकीनबाई उठल्या तरी टिटू काही
उठली नव्हती. मालकीनबाईंनी समोरच्या खोलित येऊन बघितलं तर काय, टिटू गाढ झोपेलेली
होती. मध्येच ती हसल्यासारखी करायची. ते बघून मालकीनबाईस गंमत वाटली. त्या
तिच्याजवळ बसल्या. टिटूने पुन्हा एकदा झोपत हसल्यासारखं केलं. टिटू नक्कीच स्वप्न
बघत असणार असं त्यांना वाटलं. तिची ती गम्मत थोडावेळ बघावी म्हणून त्या कोचावर
बसणार तोच त्यांचा हात लागून टिपॉयवरचा ग्लास पडला. त्या आवाजानं टिटू जागी झाली. समोर मालकीनबाई बघून ती
ओशाळली.
काय गं वाघाचे मावशे किती झोपतेस तू. दूध प्यायची
वेळ निघून गेली तरी तू उठली नाहीस. मालकीनबाई म्हणाल्या.
वाघाची मावशे हा शब्द कानावर पडल्यावर टिटूला
मज्जा वाटली. खूप भारीसुध्दा वाटलं. मालकीनबाईंच्या अंगावर उडी घेत त्यांना ती
बिलगली. त्यांचे गाल लाडाने चाटू लागली. मालकीनबाईनांही बरं वाटलं. काल रात्रीचा
भीतीचा लवशेषही टिटूच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.
मग मावशे, जरा मॉर्निंग वॉक करुन यायचा का.. त्यांनी विचारलं. टिटूनं होकारार्थी मान हलवली.
मालकीनबाईंनी तिच्या गळयात पट्टा टाकला आणि त्या
खाली उतरु लागल्या. टिटूला बघताच शेजारच्यांचा कुत्रा भुंकू लागला. तो असा दिसला
आणि भुंकायला लागला की टिटू गर्भगळीतच व्हायची. मात्र आज काही तसं झालं नाही. टिटूने
उलट त्या कुत्र्याच्या नजरेला नजर भिडवली. कुत्र्यासाठी हे नवीनच होतं. तिचे ते
चकाकणाऱ्या डोळयांनी एकटक बघणं त्याला सहन होईना. त्याची मान खाली गेली. त्याच्या
भुंकण्याचा स्वर कमी झाला. कुई कुई असं तो कुंथत कुंथत आवाज काढू लागला.
कमालच केलीस टिटू तू. या डॉगीस केवळ नजरेनं
घाबरवलंस, वाव...मालकीनबाई तिच्याकडे
बघत म्हणाल्या.
असं काही घडेल हे टिटूनं अपेक्षित केलं नव्हतं. पण
काल रात्री वाघोबाकडे एकटक बघताना तिची भीती पळून गेली होती. आपण उगाचच कुणालाही
भितो याची जाण तिला तेव्हा झाली. एकदा मनातून भीती गेली मग मस्त आत्मविश्वास येतो.
हे काल तिला कळलं होतच. आज प्रत्यक्षात तसं घडलं...
तू गं बये खरोखरच वाघाची मावशी आहेस हं, मालकीनबाई म्हणाल्या आणि त्यांनी टिटूचा
गालगुच्चा घेतला.
०००
.jpg)
Comments
Post a Comment