सत्कार


 


सत्कार

   परवा सोसायटीची बैठक पार पडली.  सगळी चर्चा संपल्यावर अध्यक्ष काकांनी तेजोमयी आणि टोळीचा सत्कार करण्याचं घोषित केलं.सर्वांनी टाळ्या वाजवून यास संमत्ती दिली.

तुम्हास प्रश्न पडला असेल, तेजोमयी आणि टोळीनं असा कोणता पराक्रम गाजवला बरं? की ज्यामुळे ते असे सत्काराचे धनी झाले.

या टोळीनं जे केलय किंवा करुन दाखवलय त्याला पराक्रम समजायचा की  आणखी काही, हे आता ज्याचं त्यानं ठरवावं.

तर झालं काय की, तेजोमयी आणि  टोळीनं यंदाच्या दिवाळीत वेगळीच धम्माल केली. तेजोमयीस ही कल्पना सुचली. तिने दिवाळीच्या महिन्याभर आधी टोळीला व्यवस्थित सारं काही समजावून सांगितलं.

  जे काही करायचं होतं, त्यासाठी पैसे लागणार होते. त्यासाठी मग प्रत्येकानं पॉकेटमनीतले पैसे दररोज वाचवायचं ठरलं. कशासाठी बरं? हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. कुणाला वाटेल, फटाके घेण्यासाठी, कुणाला वाटेल पिज्जा पार्टी करण्यासाठी, कुणाला वाटेल पाणीपुरी पार्टी करण्यासाठी.

पण छे छे, तसं काही टोळीनं केलं नाही. तर मग काय केलं?

पॉकेटमनीमधून वाचवलेल्या पैशाची त्यांनी एके दिवशी मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन मोजदाद केली. साडेचार हजार रुपयाच्या आसपास ही रक्कम होती.

वा S व तेजोमयी म्हणाली.

टॉ S व..इतरांनी प्रतिसाद दिला.

या पैशाचं काय केलं या टोळीनं?

तर, एके दिवशी टोळीतले तेजोमयी, कल्याणी, वैष्णवी, टिल्लू आणि अभिमन्यू ही मंडळी दादर रेल्वेस्थानानजिक असलेल्या एका मोठया पुस्तकांच्या दुकानात गेली. त्या दुकानाच्या खुल्या प्रागंणात मोठ्या टेबलवर दिवाळी अंक विक्रीसाठी ठेवले होते. दिवाळी अंकाचं प्रदर्शनच होतं ते. त्या ठिकाणी १०० च्या आसपास दिवाळी अंक बघून सर्वजण हरखून गेली.

आता या १०० अंकातून कोणता अंक घ्यायचा? हा प्रश्न मुलांना पडला. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला. मुलांची ही धांदल, दुकानदारकाका बघत होते. मुलांना दिवाळी अंक तर घ्यायचेत पण, त्यांना सुचत नाहीय हे त्यांच्या लक्षात आलं. तासाभरानंतरही, मुलांचं दिवाळी अंक पुन्हा पुन्हा बघणं, काहीतरी हळू आवाजात बोलणं, पुन्हा बघणं हे चक्र थांबलेलं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी चौघांनांही आपल्या जवळ बोलावलं. त्यांना नेमकं काय हवं ते विचारलं. तेजोमीयने कल्याणीकडे बघितलं. तिने वैष्णवीकडे बघितलं. तिने अभिमन्यूकडे.

मुलांनो जे सांगायचय ते सांगा की. कशाला इकडे तिकडे बघता?

तेजोमयी हसली. तिने मग आपण कशासाठी तिथे आलो ते सविस्तर सांगितलं.

सोसायटीतल्या प्रत्येकाच्या घरी एक दिवाळी अंक सप्रेम भेट देण्याचं टोळीनं ठरवलं होतं. त्यांच्याकडे साडेचार हजार रुपये गोळा झाले होते. तीस अंक हवे होते त्यांना. पण अंक कोणता घ्यायचा नि त्यासाठी पैसे पुरेसे पडतील का याची त्यांना शंका वाटत होती. त्यामुळे त्यांचा गोंधळ ऐकला होता.

काही मुलं असाही विचार करतात हे बघून ते दुकानदारकाका खूप आनंदले.

ते म्हणाले,

मी तुमची समस्या सोडवली तर चालेल काय?

सर्वांनी एका सुरात हो म्हंटलं.

दुकानदारांनी मग त्यांना सर्वात जास्त विकला जात असलेला दिवाळी अंक दाखवला. त्याची किंमत होती दोनशे रुपये. ३० अंकांसाठी लागणार होते सहा हजार रुपये. याचा अर्थ दीड हजार रुपये कमी पडत होते.

आता काय काका?

अरे, तुम्ही काळजी कशाला करता.

तुम्ही साडे चार हजारातच हे ३० ही अंक घेऊन जा. या अंकावर तुमच्यासाठीची खास सुट म्हणा, माझ्याकडून.

वाSव असा जोरदार गलका या मुलांनी केला.

या आरडाओरडीने इतर ग्राहकांनी त्यांच्याकडे वळून बघितलं. दुकानदार काकांनी, मुलच ती, गलका करणारच, असं काहीस एकदोन जणांना सांगितलं.

काकांनी मग मुलांना टॅक्सी करुन दिली. त्यात नोकराकरवी ३० अंक ठेवले. इकडे कॉलनीत पोहचण्यापूर्वी टोळीने आपल्या इतर सदस्यांना मारुतीरायाच्या मंदिरात येण्याचा निरोप दिला.

मारुतीरायाच्या मंदिराजवळ टॅक्सी थांबली. तेजोमयीने मारुतीरायांना अंक दाखवला. त्यांना तिने आणि इतरांनी नमस्कार केला. मारुतीरायांनी गदा हलवून आर्शीवाद दिल्याचा भास तेजोयमीस नेहमीप्रमाणे झाला.

आता टोळीतील प्रत्येक सदस्याने प्रत्येकी तीन अंक आपल्याजवळ घेतले आणि गुपचूप घरी नेले.

त्या आठवड्यातील रविवारी टोळी सोसायटीच्या मैदानात अंक घेऊन गोळा झाली. त्यांनी मग प्रत्येकाच्या घरी जाऊन एक एक अंक सर्वांना सप्रेम भेट दिला.

हे काय,कल्याणीच्या बाबांनी विचारलं.

  ही दिवाळी सप्रेम भेट कॉलनीच्या तमाम बच्चेमंडळींकडून तेजोमयीनं सांगितलं.कल्याणीच्या आई बाबांना पोरांचं कौतुक वाटलं.कल्याणीच्या आईने सर्वांना घरी असलेले चॉकटलेटस् दिलेत. त्यावर ताव मार टोळी कॉलनीतल्या प्रत्येक घरी गेली.घरटी एक असा दिवाळी अंक सप्रेमभेट दिला.पोरांच्या या कल्पकतेनं आख्खी सोसायटी भारावून गेली.जे मोठयानं सुचलं नाही.ते या लहानग्यांनी करुन दाखवलं.सर्वजण हीच प्रतिक्रिया देते झाले.

त्याचच कौतुक म्हणूनच सोसायटीनं टोळीचा जोरदार सत्कार करायचं ठरवलंय.

सुरेश वांदिले

000

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!