अंगठीचा प्रकाश

 

अंगठीचा प्रकाश

कल्याणीच्या आईची आई म्हणजेच कल्याणीची आजी, वैरागडला मामांकडे राहते. कल्याणी, आजीची फार लाडकी. त्यामुळे दर दोन-तीन महिन्यांनी ती आईसोबत आजीच्या भेटीला जाते. नात आली की तिला कुठे ठेऊ नि कुठे नाही, असं आजीला होतं.

तिचे इतके लाड करुन नकोस असं कल्याणीची आई तिला सारखी सांगते. पण आजी ते सांगणं हसण्यावारी नेते. तिच्या लाडासाठीच मी अजून जिवंत आहे गं बाई, असं कधीकधी उत्तर देते. तेव्हा सगळयांची बोलती बंद होते. आईही डोळ्याला पदर लावून दुसरीकडे जाते.

तू, असं काही बोलत जाऊ नकोस गड्या, असं तेव्हा कल्याणी रागावण्याचा अभिनय करत म्हणते, तेव्हा तिच्या गळयाला हात लावून आजी छान हसते.

कल्याणीचं लाडं करणं आजी थांबवणार नाही हे आता पक्क ठाऊक झाल्यानं नंतर नंतर आईने तिकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. आजी आणि तिची नात, त्यांचं त्यांचं बघून घेतील, असं कल्याणीचे बाबा आणि मामा आईला म्हणत.

मागच्या महिन्यात पुन्हा एकदा कल्याणी, तिची आई आणि बाबा वैरागडला गेले होते. आजीची तब्येत जरा बरी नव्हती. ती अंथरुणाला खिळून होती. डॉक्टरांनी फार हालचाल करण्यास मनाई केली होती. मात्र कल्याणीस बघताच आजीचा चेहरा खुलला. बेडवरुन उतरुन तिने कल्याणीस पोटाशी घेतले. तिचे पटापट मुके घेतले. तिच्या केसांवरुन हात फिरवला. तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू आलं.

त्यारात्री डॉक्टर तपासायला आले असता, आजीमधला हा बदल बघून त्यांना आश्चर्य वाटलं. मामाने कल्याणीकडे बोट दाखवलं.

अच्छा, हे आहे तर आजीचं खरं टॉनिक असं म्हणत, डॉक्टरांनी आजी आणि कल्याणीकडे कौतुकानं बघितलं.

नात आली म्हणून टनटन चालू फिरु नका, असं डॉक्टरांनी जाताजाता बजावलं.

नाही रे, मी कुठे काय टनटन चालते? गोगलगायीसारखीच हळूळू चालते ना! नातीसोबत थोडफार चालायची बंदी आहे की काय? आजी हसत डॉक्टरांना म्हणाली.

डॉक्टर हसले. आजीकडे लक्ष ठेवा असं मामांना सांगून निघून गेले.

कल्याणीसोबत गप्पा करण्यात थोडफार बाहेर फिरुन येण्यात, परसबागेत फेरफटका मारण्यात आजी रमून गेली. तिचा थकवाही दूर झाला.

एके दिवशी दोघी गप्पा मारत असताना, कल्याणीचं लक्ष आजीच्या उजव्या हातातील मधल्या बोटात असणाऱ्या अंगठीकडे गेलं. ते बोट हातात घेऊन ती अंगठी निरखून बघू लागली.

आवडली का तुला? आजीनं विचारलं.

हो आजी, खूप छान आहे.

हवी का तुला? आजी म्हणाली.

अगं, पण ही तुझी अंगठी मला कशी होईल?

होईल गं. असं म्हणून ती अंगठी आजीने कल्याणीच्या उजव्या हाताच्या बोटात घातली. ती अंगठी सहज तिच्या बोटात गेली. मात्र ती थोडी मोठी होत असल्याने पटकन खाली पडायची.

आता गं काय करायचं? कल्याणीनं विचारलं.

अंगठी, कल्याणीच्या बोटात बसेल अशी सोनाराकडून करुन आण असं आजीने मामाला सांगितलं.

अगं, हे काय भलतच? कशाला हवी कल्याणीस अंगठी? नको तो हट्ट पुरवू नकोस तू. आई रागावून म्हणाली.

हे बघ बाई, एक तर कल्याणीने हट्ट केला नाही. मीच खुषिने तिला देतेय. लाडोबाच्या बोटात किती छान दिसतेय बघ. बोटात घातल्यावर कसा चेहरा खुलला होता गुलाबासारखा तिचा. त्याआनंदापेक्षा या अंगठीचं काही मोल नाही गं! आजी आईला समजावत म्हणाली.

अंगठी हरवली म्हणजे?

अशी कशी हरवणार? आजीने प्रतिप्रश्न केला.

 

वेंधळी आहे कल्याणी.

कुणी सांगितलं तुला?

अगं आई, माझी मुलगी आहे ना ती. मला नाही ठाऊक असणार तर कुणाला?

हो का? तू हिच्याहून मोठी असताना किती वेंधळी होती ते सांगू का सगळ्यांना? एक गोष्ट सांभाळून ठेवायची नाहीस. जागेवर ठेवायची नाही. सगळं आपलं अस्ताव्यस्त. त्यासाठी कितीदा बाबांचा ओरडा आणि माझे रट्टे खाल्लेस. आजी म्हणाली. आईचा चेहरा गोरामोरा झाला. मामा आणि बाबांना हसू आवरणं अशक्य झालं.

अंगठीचं प्रकरण वेगळच वळण घेतय हे लक्षात आल्यावर कल्याणी आजीला थांबवत म्हणाली,

अगं आजी, माझ्याबोटापेक्षा तुझ्याच बोटात अंगठी शोभून दिसते. अंगठीतला हिरा कसा लखलखतो बघ. त्याचा प्रकाश तुझ्या चेहऱ्यावर पडतो आणि मग तू अगदी देवीसारखी दिसते.

आँ! आई, बाबा, मामा आणि आजीसुध्दा एकाच वेळी म्हणाले.

आजी गोड हसली. तुझ्यापेक्षा तुझी लेक शहाणी हो. असं आईकडे बघून, कल्याणीस जवळ घेत आजी म्हणाली. आता हसावं की आईवर रुसावं? हा प्रश्न आईच्या चेहऱ्यावर उमटला...

सुरेश वांदिले

 


Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!