अहंकारी झाड
अहंकारी झाड
एका
घनदाट जंगलात खूप मोठमोठी झाडं होती.काहींचं वय तर १०० वर्षांपेक्षाही अधिक होतं. यापैकी
एका झाडाला आपल्या वयाचा खूप गर्व होता. आम्ही १०० पावसाळे बघितले, आम्हाला शहणपणा
शिकवू नका, सगळयांनी माझच ऐकायला हवं. मी म्हणेल तेच खरं समजायला हवं, असा त्याचा अट्टाहास
असायचा. मात्र या झाडांमधील सर्वात जुने असलेले झाड त्याला असा स्वत:बद्दलचा
गैरसमज करुन घेऊ नकोस,गर्व करु नकोस असं अनेकदा समजावयाचा. पण या अहंकारी झाडास
त्याचं सांगणं काही पटत नसे. तो या झाडाला अतिशहाणा, मूर्ख, घाबरु, असं हिणवत असत.
या झाडाने नंतर नंतर या अहंकारी झाडांकडे लक्ष देणं सोडून दिलं
हे
अहंकारी झाड त्यांच्या फांद्यावर खेळायला,विश्रांती घ्यायला आलेल्या पक्ष्यांना
फांदी हलवून हलवून खाली पाडायचा. पक्षांची घरटी पाडून टाकायचा. त्यामुळे हळूहळू पक्ष्यांनी
या अहंकारी झाडावर जाणं सोडलं.
सर्व
पक्षी सर्वात वृध्द झाडाच्या फांद्यावरच बसू लागले. खेळू लागले. घरटी बांधू लागले.
वेगवेगळया पक्षांच्या किलबिलाटानं ते झाड सर्वांच्या आनंदाचं ठिकाण झालं. पाऊस आणि
वादळापासून हे झाड पक्षांचं सरंक्षण करत असे. एखादा अजगर किंवा इतर प्राणी झाडावर चढायचा प्रयत्न
केल्याचं दिसताच, जमिनीपर्यंत लोंबकाळणाऱ्या आपल्या जाडजूड फांद्यांनी तो या अजगर
किंवा प्राण्यांना जखडून टाकायचा आणि दूर भिरकावून द्यायचा. त्यामुळे हे झाड
म्हणजे सर्व पक्ष्यांसाठी सुरक्षित असं हक्काचं घर झालं होतं. या पक्षांमुळे
या झाडाचा दिवस छान आणि आनंदी जात असे. सर्वांसोबत तो रात्री निवांत झोपीही जात असे.
मात्र अहंकारी
झाडाला या परोपकारी झाडाचं असं वागणं मूर्खपणाचं वाटायचं. त्याला वाटायच आपण आपल्या
फांद्यावर पक्षांना कां बसू द्यायचं? त्यांच्या वजनानं आपल्या फांद्या मोडल्या तर? हे पक्षी थोडेच आपल्या फांद्या जोडून देणार?आपल्या
फांद्यांना येणारी फळं यांना कां बरं फुकटात द्यायची? आपल्याला थोडच ते काही मोबदला
देतात याचा ! यांना कशासाठी घरटं बांधू द्यायचं? आपल्या फांद्या म्हणजे काय यांना धर्मशाळा
वाटते की काय? असे काहीबाही विचार या अहंकारी
झाडाच्या डोक्यात सतत येत आणि तो मग पुन्हा पुन्हा सर्व पक्षांना हाकलून लावत असे.
काही दिवसांनी त्याच्या या वागण्याला कंटाळून एकही पक्षी त्याच्याकडे जाईनासा झाला.
पक्षी झाडावर
बसायला येतात तेव्हा कधी त्यांच्या चोचितून किटक आणतात तर कधी एखादं फळ आणतात. खाता
खाता त्यातलं काही खाली पडतं. ते शि-शू करतात. तेही खाली पडतं. ते झाडाच्या बुंध्याशी
जाऊन जमिनीत मिसळतं. त्याचा उपयोग झाडाला आणखी तजेला मिळण्यासाठी, अन्न मिळण्यासाठी
होतो. झाडं आणखी बहरतात. त्यांना चांगली फलं फुळं येतात.
झाडावर काही
किटकांनी हल्ला केला, बुरशी चढली, किड लागली तर काही पक्षांना ते बरोबर कळतं. मग ती
बुरशी चोचीने बाजूला काढतात. किटकांना हाकलून लावतात. किड्यांचा नायनाट करतात. अंहकारी
झाडाकडे पक्षांनी जाणंच सोडल्यानं, मग त्याला सकस अन्न, खत मिळणं बंद झालं. किटक ,बुरशी,किडयांपासून
संरक्षण करणारं कुणी उरलं नाही. हळूहळू त्या झाडाला काही किडयांनी पोखरायला सुरुवात
केली. पण आपल्या अहंकाराच्या धुंदित असणा-या त्या झाडाने तिकडं दुर्लक्ष केलं. हळूहळू
त्याच्या फांदया वाळू लागल्या. फलं-फुळं येणं बंद झालं. परोपकारी झाडाच्या ते लक्षात
आलं होतं. त्याने पुन्हा या अहंकारी झाडाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्या
मूर्ख झाडाने त्याचं काही ऐकलं नाही. अखेर व्हायचं तेच झालं. एके दिवशी सोसाटयाचा वारा
सुटला आणि आतून संपूर्णपणे पोखरलेलं ते अहंकारी झाड खाली कोसळलं. खोट्या अंहकारापोटी
हे झाड प्राण गमावून बसलं.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment