दहा वर्षाची क्युरिआसिटी
दहा वर्षाची क्युरिआसिटी
हाय,माझं नाव क्युरिआसिटी.नुकताच माझा
दहावा वाढदिवस साजरा केला. तुम्ही म्हणाल त्यात काय मोठसं! आम्हीसुध्दा आमचा वाढदिवस
दरवर्षी धुमधडक्यात साजरा करतोच की? अगदी बरोबर,पण तुम्ही वाढदिवस साजरा करताना तुमचे
आईबाबा,मित्रमैत्रिणी सोबत असतात.मी मात्र माझा वाढदिवस एकट्यानेच साजरा केला.तुमचा
वाढदिवस धुमधडाक्यात साजरा होतो, माझा मात्र धुराळयात साजरा झाला.
तुम्ही म्हणाल तुला कुणी सांगितलं होतं,धुराळ्यात
जायला?याचं खरं उत्तर म्हणजे तुम्हीच मला जायला सांगितलं,नव्हे पाठवलच मला धुराळ्यात.
पण माझी काही याबद्दल काही तक्रार नाही बरं का? मी कां बरं तक्रार करावी? कारण तुम्हा
मानवांना जे अद्याप तरी जे शक्य नाही,ते मला शक्य झालय ना !
अरे, मग तू आहेस तरी कोण? असा प्रश्न
तुमच्या मनात आला असेल ? आता जास्त ताणून न धरता मी तुम्हाला सांगूनच टाकतो.मी म्हणजे
चार पायाचा यंत्रमानवच आहे समजा. माझा आकार एखाद्या बग्गीसारखा म्हणजे चारचाकी गाडी
सारखा आहे.
मी मोठा भाग्यवान हो! तुम्हा मानवांच्या
पत्रिकेत मंगळ असेल तर म्हणे फार त्रास होतो तुम्हाला,विशेषत: लग्नाच्या वेळी. पण माझ्या
पत्रिकेत मंगळ असला पाहिजे,याची मला पक्की खात्री आहे म्हणूनच मला प्रत्यक्ष मंगळाचे
दर्शन होऊ शकलेना. म्हणूनच मी १० वर्षापूर्वी म्हणजे ६ ऑगस्ट २०१२ रोजी थेट मंगळावर
पोहचलो. माझा प्रवास सुरु झाला २६ नोव्हेंबर २०११ रोजी. ५६ कोटी किलोमीटरचं अंतर मी ९ महिन्यात पूर्ण केलं.
अर्थातच हे सारं तुम्हा मानवांमुळेच शक्य झालं,हे मी नम्रपणे कबूल करतो.
गंमत बघा,तुम्हा मानवास पृथ्वीपासून
लाखो मैल दूर असणारा मंगळ बघावा लागतो तो माझ्या नजरेतून. कारण मी प्रत्यक्ष मंगळावर
वावरतो. इकडे जातो. तिकडे जातो. सारखी भ्रमंती सुरु असते माझी.
मी मंगळावर उतरलो ते गेल नावाच्या एका
भल्या मोठ्या विवरात. याचा व्यास १५४ किलोमीटर म्हणजे अबाबा म्हणायला लावणारा. हे विवर
३.५ किंवा ३.८ अब्ज वर्षापूर्वी तयार झाल्याचं तुम्हीच शोधून काढलय.या विवराच्या बरोबर
मध्यभागी शॉर्प नावाचा उंच पर्वतसुध्दा आहे.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढया
मोठया मंगळावर हाच विवर मला उतरण्यासाठी कां निवडला असेल बरं? अहो,तुम्हा मानवाचं डोकं
फार चालतं ना. त्यातून असं तुमच्या लक्षात आलं की खूप खूप वर्षापूर्वी हे विवर म्हणजे
एक भलं मोठ्ठं तळं होतं. तळं म्ंहटलं की पाणी आलं. पाणी म्हंटलं की सूक्ष्म जीवजंतू
आलेच, असा तुम्ही तर्क चालवला. हा तर्क खरा की खोटा हे याचा अगदी जवळून शोध घेता यावा
म्हणून मला या ठिकाणी उतरवण्यात आलं.
मी इथे उरतलो नि मग काय मीच झालो की
इथला राजा.कारण इथे सध्या माझ्याशिवाय दुसरं कुणीही नाही.मी इथे अगदी राजासारखा वावरतो.कुठेही
जाऊ शकतो.जिकडे जातो तिकडचे छान फोटोग्रॅफ् काढतो नि पृथ्वीवर पाठवून देतो. शार्प पर्वतावर
मी ६२५ मीटर उंचीपर्यंत जाऊन आलोय. या उंचीवरुन मंगळ बघण्याचा आनंद काही औरच आहे. माझ्याकडे
मंगळाला छिद्र पाडण्याचं यंत्र लावलय. त्याने मी वेगवेळया ठिकाणी छिद्र पाडून ४१ खडकांचे
नमूने गोळा केले. माझ्यात एक छोटीशी प्रयोगशाळाही आहे.त्यात मी या नमून्यांवर प्रयोग
करतो. त्यांचे निष्कर्ष पृथ्वीवर तुमच्याकडे पाठवतो. असं गेल्या दहा वर्षांपासून माझं
कार्य सुरु आहे. मस्त मजेत आणि आनंदात.
मानवानं मला जन्मास घातलं.पण सध्यातरी
तुमच्यापेक्षा एक पाऊल समोरच आहे.भविष्यातील यंत्रमानव म्हणे इतका हुषार आणि बुध्दीमान
असेल केी तो तुमच्यावर राज्यबिज्य करेल, असं काहीबाही माझ्या कानावर येतं. पण मी मात्र
तसं काही करणार नाही हं.मानवाला मंगळावर राहता येणं शक्य आहे का? याचा शोध घेण्यासाठी
माझा शेवटचा श्वास असे पर्यंत मी प्रयत्न करत राहणार…मंगळाची शप्पथ घेऊन सांगते मी
तुम्हाला…

Comments
Post a Comment