ढगोबा कां फुटतो?

 


ढगोबा कां फुटतो?

ढगोबा फुटतो, म्हणजे काय? असं तुम्हाला वाटत असणार. विस्तवावर ठेवलेल्या तव्यावर टाकलेले जसे चणे फुटतात आणि तडतड उडतात. तसं ढगोबाचं होतं की काय?  चनोबा आणि ढगोबा सख्खे भाऊ तर नाही ना? असही तुम्हाला वाटू शकतं. मात्र तसं अजिबातच नाही, बरं का?  चनोबाचं फुटणं  नि ढगोबाचं फुटणं यात काही साम्य आहे का? चना फुटला की तो त्याच्या फोलपटाबाहेर येतो. असा फुटलेला चणा खायला काय झक्कास लागतो, नाही का? पण ढगोबा फुटतो तेव्हा काहीच झक्कास नसतं, घडतो तो हाहा:कार! होतं.

फार डेंजरस असतं ढगोबाचं फुटणं. पण याला हा आगावूपणा करायला कोण सांगतं? की हाच आपला अशी आगावूपणा करण्याची हौस पुरवून घेतो.

काहीही असलं तरी ढगोबाचं फुटणं हे, फार फार फार धोकादायक! कारण ढगोबा फुटला की प्रचंड वेगानं पाऊस खाली पडतो. जणू काही आकाशातून एखादा धबधबाच कोसळावा तसा. मग या वेगाने खाली पडणाऱ्या पाण्याच्या वाटेत जे कुणी येतं ते वाहून जातं. घरं कोसळतात.मोठमोठी वृक्ष आणि झाडे कोलमडून पडतात. मोठमेाठे पुल, रस्ते, रेल्वेचे रुळ भुईसपाट होतात. शेकडो माणसं वाहून जातात किंवा मृत्यमुखी पडतात. हा फुटलेला ढगोबा नुकसानच नुकसान करतो.

याच ढगोबाच्या पोटात हे असं धबधब्यासारखं पाणी येतं तरी कुठून?

ते तसं पृथ्वीवरुनच येतं किंवा जातं. होतं काय की, सामान्य स्वरुपाचा पाऊस पडू लागला की जमिनीच्या पृष्ठभागावर तयार झालेली गरम हवा पावसाच्या थेंबांना खाली पडू देत नाही. या थेंबांचं बाष्पामध्ये रुपांतर करुन ते परत ढगाकडे पाठवते. ढगामध्ये येणारे हे बाष्परुपी थेंब आणि या ढगात पूर्वीपासून असणारे पाण्याचे थेंब यांची गर्दी होते. गर्दीतरी किती म्हणायची? अक्षरश: अब्जावधी थेंब! उदाहरणच द्यायचं झालं तर, एखाद्या गाडीत प्रवासी बसू शकतात १००. पण तिथे शिरले हजार,तर मग काय होणार त्या गाडीचं?कल्पना करा. जागा कमी आणि अब्जावधी थेंब पोटात साठल्यानं ढगोबाचं पोट फुगू लागतं. त्याची घनता वाढते, आकार वाढतो आणि वजनही वाढते. याचवेळी जमिनीवरुन येणारी उष्ण हवा विरळ होऊ लागते. या उष्ण हवेमुळेच या ढगोबाला वर आकाशात आधार मिळालेला असतो.आता हवा विरळ होण्याने त्याचा आधारच नाहीसा होतो. समजा एखाद्या बॅटवर बॉल ठेवलाय. त्याच्याखालची बॅट काढली की तो धप्पकन खालीच पडणार ना! तसचं या ढगोबाचही होतं.अब्जावधी थेंबांनी गर्दी केलेला ढगोबा वेगाने खाली येऊ लागतो. असे अनेक ढगोबे एकमेकांना आदळतात.त्यांचं घर्षण होतं. त्यामुळे धडकी भरवणारा गडगडाट सुरु होतो. त्यात भर विजा चमकण्याची. अंगावर काटाच येतो अशावेळी. हे विजेचं तांडवसुरु असताना ढगोबाला ताण सहन न होऊन तो फुटतो मग धोधोधोधो पाऊस पडायला सुरुवात होते.या पावसाचे थेंब नेहमीच्या पावसाच्या थेंबापेक्षा मोठे असतात. या थेंबांचा खाली येण्याचा वेग ८० ते ९० किलोमीटर इतका प्रचंड असतो. पर्वत असणाऱ्या भागात हे ढगोबा लहान मोठ्या शिखरांना धडकतात. त्यातूनही ढगफुटी होते. मग त्या मोसमात पडणाऱ्या एकूण पावसापेक्षाही कितीतरी अधिक पाऊस त्या चार- पाच सहा तासात पडतो. पडणाऱ्या पावसाच्यापाण्याला वाहून जायलाही जागा राहत नाही. मग तो इथे शिर,तिथे शिर असं करुन प्रचंड विध्वंस करतो. आपण असं अवचित फुटल्यानंतर किती प्रचंड नुकसान होतं हे ढगोबास कधीच कळत नाही. कारण त्याचा हा विध्वंसकारी अवतार संपलेला असतो!

सुरेश वांदिले


Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!