गाणारा ससोबा


गाणारा ससोबा

बाबांनी आणलेला ससा रोहितला खूप आवडला. हा ससा खराखुरा नव्हता तर ते होतं एक खेळणं. मात्र हा ससा अगदी खऱ्या सारखाच दिसायचा. गुबगुबित. इकडून तिकडे हळूवार कधी उड्यामारत तर कधी तुरुतुरु चालत जाणारा. त्याच्याकडे आणखी एक गंमत होती. ती म्हणजे त्याला कोणत्याही संकटाच्या वेळी गाणं म्हणता येत असे. कृत्रिम बुध्दीमत्तेने म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्यानं त्याच्या पोटातली ही जादू शक्य झाली होती.

तर, एकदा राहूल या ससोबाशी खेळत बसला असताना त्याला डुलकी आली. त्याचवेळी तिथे बाजूच्या काकांचा, टोनी द डॉगी आला. या ससोबाला बघून ही मस्त मेजवाणी मिळालीय आयतीच, असा त्याला खूप आनंद झाला. इकडेतिकडे कुणीनाही हे बघत त्याने ससोबास तोंडात पकडलं आणि धूम ठोकली.

टोनी रस्त्यावर येताच अचानक ससोबा गाऊ लागला,

चोरा रे चोरा, पळतोस कशाला

मुंगी बनशील शाप देतो तुला

हे गाणं कानावर पडताच टोनी घाबरला. त्याने पटकन ससोबास रस्त्यावर सोडून दिलं आणि धूम ठोकली.

रस्त्यावर पडलेल्या या सशाकडे आकाशात उडत असणाऱ्या गरुड पक्षाचं लक्ष गेलं. झरदिशी खाली येऊन त्याने ससोबास चोचित पकडलं आणि तो वर उंच उंच उडू लागला.

ससोबा पुन्हा गाऊ लागला...

मी तर राजा, कापसासारखा मऊ

भ्यालोय मी,मला नको खाऊ

हे गाण कानावर पडताच गरुड घाबरला आणि त्याने उडताउडता त्याने ससोबास खाली सोडून दिलं. ससोबा वेगाने खाली एका जंगलातील घनदाट गवतावर पडला. तिथे त्यावेळी एक कोल्होबा आराम करत होता. ससोबाला बघताच त्याला खूप आनंद झाला. देवानं आयतीच मेजवाणी पाठवली म्हणून त्याने आभाळाकडे बघून देवाचे आभार माणले. कोल्होबाने झडप मारुन ससोबास पकडलं.

ससोबा गाऊ लागला.

मी जरी असे पिटुकला इटुकला

तुला करुन टाकेन क्षणात बुटुकला

हे गाणं ऐकून कोल्हा थरथर कापू लागला आणि त्याने ससोबाला तिथेच सोडून धूम ठोकली.त्याला पळताना बघून एका वाघोबानं काय झालं? भूत पाठिमागे लागल्यासारखं पळायला, असं विचारलं.

तो ससा म्हणजे भूतच आहे वाघोबा.कोल्होबा कसा बसा म्हणला आणि त्याने तिथून पळ काढला.

भूत आणि माझ्या राज्यात शक्यच नाही! वाघोबाने डरकाळी फोडली आणि तो समोर जाऊ लागला. त्याला समोर ससोबा दिसला.

हा आणि भूत.हा हा हा... दाखतोच याला गमजा ,असं म्हणून वाघोबाने त्याच्यावर पंजा उगारला.ते बघून ससोबा गाऊ लागला...

अरे अरे वाघोबा,तू किती बलवान

मी कशी काय घालवणार तुझी शान

हे गाणं कानावर पडताच वाघोबाची पाचावर धारण बसली. हे पिटूकलं भूत आपल्याला गिळून टाकेल अशी भीती वाटून त्याने तिथून पळ काढला.

ही सर्व गंमत एका झाडावर बसलेला वानरोबा बघत होता. वाघोबा पळताच वानरोबा खाली उतरला आणि ससोबाजवळ येऊन म्हणाला,

कोण रे तू? नवा दिसतोस इथं. मात्र शूर आहेस हं तू. कुठून आलास? सांगशील का मला.

एकामागोमाग एका संकटातून सुटका करुन घेताना ससोबाची दमछाक झाली होती वानरोबाच्या प्रेमळ बोलण्याने ससोबास खूप बरं वाटलं. कधी आपण घरी जातो नि राहूलसोबत खेळतो असं झालं होतं. त्याने वानरोबास सगळं काही सांगितलं. वानरोबाला त्याची दया आली. त्याने त्याला पोटाशी धरल आणि झाडावर उडी मारली. या झाडावरुन त्या झाडावर उडी मारत तो राघवच्या घरी पोहचला. त्याने खिडकीतून ससोबास आत सोडून दिलं.

वानरोबा वानरोबा किती रे तू दयाळू

माझं गुपित नको देऊ कुणास कळू..

ससोबा गाऊ लागला. वानरोबाने मान हलवत होकार दिला.  या गाण्याणं राघव आणखी गाढ झोपी गेला.

सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!