आजोबांची चूक
आजोबांची चूक
संध्याकाळी बागेत फिरायला बरीच मंडळी येतात. बागेत
चालणाऱ्यांसाठी छान अशी पायवाट आहे. पायवाटेच्या अवतीभवती वेगवेगळी झाडे, वेली
आहेत. या झाडांवर वेगवेगळया रंगांची आणि आकाराची फुलं उगवली आहेत. या पायवाटेवरुन
फिरताना त्यांचा मंद सुगंध आसमंतात दरवळत असतो. त्यामुळे हे फिरणं अधिक
प्रसन्नदायी होतं.
संध्याकाळी फिरण्यासाठी आई-बाबा, काका-काकू, दादा-ताई,
आजी-आजोबा, आजोबा-नातू, छोटी मुलं म्हणजे सर्वच वयोगटातील लोक येतात. कुणी वेगाने
चालतं. कुणी हळूवार चालतं. कुणी मोबाईलवर बोलत बोलत चालतात. कुणी मोबाईलला इअरफोन
लावून गाणं ऐकत चालतात. कुणी एकमेकांशी बोलत चालतात. सोबत-सोबत असुनही कुणी बोलत
नाहीत. छोटी मुलं उगाचच पळत राहतात. त्यांना पकडताना आजी-आजोबा किंवा आई-बाबांची
दमछाक होते. पळता कशाला? पडाल म्हणून काही आजी-आजोबा आपल्या नातवांवर
रागवत असतात.
तर, अशा या बागेत परवा संध्याकाळी एक आजोबा सहावीत
शिकणाऱ्या आपल्या कल्याणी या नातिनसोबत फिरायला आले होते. बागेत फिरत असताना कल्याणीचे
लक्ष, एका झाडावरील छोट्या छोट्या फुलांनी एकत्र होऊन बनलेलल्या गुच्छाकडे गेले.
वाSव! किती सुंदर ना आजोबा हा फुलांचा गुच्छ. ती म्हणाली.
हो हो खूपच छान. तुला हवा का तो? आजोबा म्हणाले.
काय म्हणालात? कल्याणीने आजोबांकडे
वळून आश्चर्यानं विचारलं.
अगं, एवढं आश्चर्यचकित होण्याचं काय कारण? तुला हवा का तो गुच्छ, असं मी विचारलय. आजोबा
म्हणाले. यावर कल्याणी हसायला लागली.
अगं, तू हसतेस कशाला? मी खरच विचारतोय तुला हवाय का तो गुच्छ? आजोबा किंचित नाराज होत म्हणाले.
आजोबांचा हात हातात पकडून कल्याणीने त्यांच्या
हातास बांधलेल्या घड्याळाकडे त्यांचे लक्ष वेधले.
घड्याळतर सुरु आहे. आजोबा तिला म्हणाले.
घड्याळात किती वाजले ते बघा. कल्याणी म्हणाली.
सहा वाजून पस्तीस मिनिटे! आजोबा घड्याळात बघत म्हणाले.
अगदी बरोबर. सहा वाजून पस्तिस मिनिटे म्हणजे संध्याकाळच ना
आजोबा!
होय होय संध्याकाळच.
संध्याकाळी काय होतं?
अंधार पडतो.
आणखी काय होतं?
आणखी काय होणार? थोड्यावेळाने
हा अंधार आणखी गडद होणार.
अंधार झाला की काय होतं?
अगं, तुला म्हणायचं तरी काय? स्पष्टच सांगना. उगाचच माझी परीक्षा घेत बसलीस.
बरं, नाही घेत परीक्षा. मला एक सांगा, आपण रात्री
जेवण झालं काय करतो?
झोपतो.
आपला डॉगी काय करतो?
तोही झोपतो.
पक्षी काय करतात?
तेही झोपतात.
झाडं काय करतात.
तेही झोपतात.
झोपलेल्या जागं करणं, वाईट असतं असं तुम्ही आणि आजी
अनेकदा मला सांगता की नाही?
हो हो बरोबरच सांगतो आम्ही.
मग आता संध्याकाळी झाडावरील पुष्पगुच्छ तोडून
त्याला जागं करणं चूक की बरोबर?
ऑ...
अहो आजोबा, वनस्पती, वृक्ष, झाडे, आपल्यासारखेच रात्री
झोपायला जातात. विश्रांती घेतात. असं थोर वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस
यांनी सिध्द केल्याचं तुमच्या सरांनी शाळेत सांगितलं नव्हतं का?
सांगितलं होतं की?
मग, तुम्ही विसरलात की काय ते?
कसा विसरेन?
मग तुम्ही कसं काय मला आता या क्षणी झाडावरील पुष्पांचा
गुच्छ तोडून देतो म्हणता?
आँ...
हाँ आजोबा, मला जरी तो
पुष्पगुच्छ आवडला तरी तो आता तोडणं म्हणजे या झाडाला त्रास देणं, त्याला निद्रेतून
जागवणं नाही का?
हो हो हो बरोबर. बरं झालंस तू माझे डोळे उघडलेस
ते. नाहीतर तुझ्याप्रेमापोटी मी तोडलीच असती ही फुलं.
आजोबा तुम्ही माझ्यावरही प्रेम करा तसच या अबोल
वृक्षावरही तितकचं प्रेम करा की...कल्याणी डोळे मिचकावीत म्हणाली.
हो गं माझं तायडे...असं म्हणून आजोबांनी कल्याणीस
जवळ घेत तिच्या डोक्यावरुन प्रेमानं हात फिरवला. कल्याणीच्या हुषारीनं आणि
झांडाप्रती असलेल्या काळजीनं त्यांचं ह्रदय भरुन आलं.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment