गर्वाचे घर खाली
गर्वाचे
घर खाली
रामू आणि शामू या दोन हत्तींमध्ये
मैत्री होती. या दोघांपैकी रामू हत्ती अधिक समंजस आणि शहाणा होता. शामू हत्ती
उथळपणे वागायचा. त्याला आपल्या शक्तीचा गर्वही होता. शामूला अनेकदा रामू समजावायचा
की, असा गर्व बरोबर नाही. गर्वाचे घर नेहमी खालीच असते. मात्र, शामू या कानाने
ऐकून त्या कानाने रामूचं सांगणं सोडून द्यायचा.
एकदा दोघेही जंगलात भ्रमंतीला निघाले
असताना, शामू अचानक रामूला म्हणाला,
माझी शक्ती तुझ्यापेक्षा अधिक असल्याचं
तुला कबूल करावं लागेल.
रामू या बोलण्यावर शांतपणे हसला.
तू हसतोस म्हणजे, माझं म्हणणं तुला मान्य
असल्याचं समजायचं का?
यावर रामू काहीच बोलला नाही. त्याने
शामूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.
शामूला वाटलं, रामू आपल्या शक्तीला
घाबरला म्हणून काहीच बोलत नाही. याचा अर्थ आपणच खरे शक्तीमान!
दुसऱ्या दिवशी त्याने जंगलाच्या
मध्यभागी जाऊन मोठ्याने चित्कार करुन सर्व प्राण्यांना बोलावलं. बरेच प्राणी तिथे गोळा झाले.
काय रे कशासाठी बोलावलस आम्हाला? कोल्होबानं विचारलं.
एक गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला, सोंड
फुगवत शामू म्हणाला.
मग सांग की, त्यासाठी सोंड कशाला फुगवतोस? या फुगवण्यातून तुझ्या अहंकारच दिसून
येतोय. गाढवोबा म्हणाला.
ए गाढव्या, जास्त शहाणपणा करु नकोस, मी
एक लाथ मारली तर तुझ्या आतड्याच बाहेर येतील. शामू सोंड उचांवत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर दर्प जाणवत होता.
अरे, पण तू आम्हाला बोलावलस कशाला? हे आधी सांग ना, मग जे काय करायचं ते कर. उंटोबा शांतपणे म्हणाला.
सांगतो की...शामू म्हणाला. मीच खरा बलवान. जंगलातील कोणत्याही हत्तीपेक्षा
माझ्याकडे अधिक शक्ती आहे. त्यामुळे मीच हत्तींचा राजा.
हो का? पण तूच खरा शक्तीमान हे कुणी सांगितलं
तुला? किंवा
तुलाच पहाटे पहाटे स्वप्न पडलं? लांडगोबा हसत म्हणाले.
ये लांडग्या, जास्त आगावूपणा करु नकोस. माझ्या एका लाथेनेच कंबरडं मोडून पडेल
तुझं. दर्पयुक्त
स्वरात शामू म्हणाला.
अरे, तू ज्याच्या त्याच्यावर असा दरडावतोस
कशाला?तू
खराखुरा शक्तीमान आहेस हे आधी सिध्द करुन दाखवना. मगच आम्ही तसं समजू. अस्वल शामूला म्हणाले. सर्वांनी यास समत्ती दिली.
पण तू सर्वांपेक्षा शक्तीमान आहेस हे
सिध्द करण्यासाठी आणखी दुसरा कुणीतरी हवा . अजगरोबा म्हणाला.
अगदी बरोबर, लांडगोबाने यास होकार दिला.
मग, त्या रामूला सांगा की माझ्यासोबत
स्पर्धा करायला. दूरवर बसलेल्या रामूकडे बोट दाखवत शामू म्हणाला. अस्वल
त्याच्याकडे गेले. त्याला शामूसोबत स्पर्धा करण्यास तयार आहेस का, विचारलं.
हा मूर्खासारखा वागतो म्हणून मी तसा
वागू शकत नाही? असं
रामू, अस्वलास म्हणाला.
ते बरोबर आहे रे. पण तू आता नकार दिलास
तर शामूचा मूर्खपणा आणखीनच वाढत जाईल. अशा मूर्खांचा बंदोबस्त वेळीच करायला हवा. अस्वलाने
त्याला समजावलं. अखेर हो नाही करत रामू स्पर्धेसाठी तयार झाला.
स्पर्धा सुरु होण्याआधीच शामूने जाहीर
केले. ही स्पर्धा मीच जिंकणार कारण मीच सर्व शक्तीमान. प्रत्येक शब्दातून त्याचा
अहंकार जाणवत होता.
सर्वांच्या सम्मतीने स्पर्धा ठरली. यामध्ये
जंगलाजवळील एका टेकडीवर असलेला मोठा दगड जो हत्ती आधी खाली ढकलेल तो खरा शक्तीमान!
रामू आणि शामूने यास मान्यता दिली. आपण
ही स्पर्धा यूं जिंकू, असे भाव शामूने चेहऱ्यावर आणले. त्याला स्पर्धा जिंकून सर्व
शक्तीमान असल्याचं सिध्द करण्याची घाई झाली होती. स्पर्धा सुरु होताच त्याने
जोराने धावायला सुरुवात केली. त्याचा स्पर्धक असूनही रामूने त्याला असा वेडेपणा
करु नकोस असं सांगण्याचा प्रयत्न केला. पण शामूने त्याकडे दुर्लक्ष केले आणि तो
पुन्हा वेगाने धावू लागला. चढ असल्याने त्याला काही वेळाने दम लागला. त्यामुळे
पुढे त्याला धावणं सोडा, चढताही येईना. तो कसाबसा चार पावलं चालू शकला आणि मटकन
खालीच बसला. वेगाने धावल्यानं त्याला श्वास लागला. त्याचा जीव वरखाली होऊ लागला. रामू
मात्र सावधपणे हळूवार टेकडीवर चढला आणि त्याने टेकडीवरचा दगड खाली ढकलला.
जमलेल्या प्राण्यांनी त्याचा जयजयकार
केला. तूच खरा शक्तीमान म्हणून त्याचा गौरव केला. शामू मात्र लाजून चूर झाला. त्याची
मान खाली गेली. त्याच्या डोळयातून अश्रू वाहू लागले.
रामू त्याला समजावत म्हणाला,
अरे असा अहंकार आणि गर्व बरा नाही. आपण
कितीही शक्तीमान असलो तरी त्याचं प्रदर्शन करायचं नसतं. शक्तीचा वापरसुध्दा युक्तीनेच
केला तरच जिंकू शकतो.
रामूचे म्हणने शामूला पटले. यापुढे आपण असं
अहंकाराने वागणार नाही याची कबूली त्याने दिली.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment