हॉर्सशू
हॉर्सशू
माझं नाव हॉर्सशू...हॉर्स म्हणजे घोडा
आणि शू म्हणजे जोडा . घोडा जोडा! आहे की नाही गंमत.
ही गंमत तशी तुम्हीच केली म्हणा. आम्हाला कुठं कळतय किंवा समजतय हे नाव ठेवा, ते
नाव ठेवा म्हणून? माझं हॉर्सशू नाव, तुम्हाला सुचलं हे मात्र, फारच छान हं! यावरुन तुमची बुध्दी
किती जोरात धावते हेच लक्षात येतं.
हॉर्सशूचा अर्थ घोड्याचा जोडा. त्याचा
जोडा म्हणजे त्याच्या पायाच्या खुरांना लावलेली धातुची नाल. काटेकुटे, दगडधोंडे
यातून किती बिचाऱ्याला धावावं लागतं. मग त्याच्या खुरांना जखम होऊ शकते. त्यामुळे त्याला धावणच काय चालणंही अशक्य होऊ
शकतं. म्हणून हा जोडा किंवा नालेचा उपयोग करतात. तर या
नालेसारखा आमचा आकार म्हणून आम्ही हॉर्सशू !
तसे आम्ही समुद्रात रहातो. तुमच्यापैकी
काहीजणांना आम्ही खेकड्यांच्या परिवारातील वाटतो. तरी काहींना समुद्रातील विंचवाच्या कुटुंबातील
वाटतो. आम्हाला १० पाय आणि ९ डोळे असतात. त्यातलं एक संयुक्त असतं. आमचे ९ डोळे असूनही ते तुमच्या दोन डोळयांपेक्षा
फारच कमी सक्षम.
दोन डोळयांनी तुम्ही मानव चौफेर नव्हे दहा दिशांवर लक्ष ठेवता.
त्यातून आम्ही तुम्हाला दिसलो.
तुमच्यासाठी नवं काही दिसलं की मग तुम्ही त्याचा अंतर्बाह्य शोध घेता. आमचं तसंच
तुम्ही केलं. त्यातून तुम्हाला असं कळलं की आमचं रक्त तुमच्या फार उपयोगाचं. एखाद्या
साथरोगापासून ,आजारांपासून वाचण्यासाठी, किंवा त्याच्यावर नियंत्रण तुम्ही ठेवण्यासाठी
लस शोधता. ही लस सुरक्षित आहे की नाही यासाठी प्रयोग केले जातात. त्यासाठी बरेचदा
आमचं रक्त वापरलं जातं. आमच्या रक्तात हिमोसायानीन नावाचं निळ्या रंगाचं द्रव्यं
असतं, त्यात जीवाणूंशी सामना करण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात. विषारी जीवाणूंच्या
संपर्कात संवेदनशील होणाऱ्या रोगप्रतिकारक पेशी असतात. त्या इतर प्राणी किंवा
माणसांमध्ये नसतात. या पेशी जेव्हा जीवाणूंच्या संपर्कात येतात तेव्हा त्या जीवाणूंभोवती
गुठळ्या निर्माण करतात. त्यामुळे आम्ही वाचतो. हे असं तुम्हाला दिसल्यावर तुम्ही
प्रयोग सुरु केले आमच्यावर. आमच्या पेशिंचा वापर लसींमधील जीवाणूंचे दूषितीकरण
किती प्रमाणात झालय हे बघण्यासाठी केला जातो. त्यासाठी मग हजाराने आम्हाला पकडलं
जातं. आमचं रक्त काढलं जातं आणि आम्हाला फेकून दिलं जातं. तुमचे प्राण वाचवण्यात
आमचा खारीचा नव्हे सिंहाचा वाटा असतो. याचा आम्हाला आनंदच आहे की. पण आमचं रक्त
काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहणार? यामुळे आमची संख्या
कमी व्हायला लागलीय. ही परिस्थिती अशीच जर राहिली तर काही वर्षांनी आमचं अस्तित्व
सुध्दा राहणार नाही या सुंदर पृथ्वीवर.....
तुम्हाला आणखी एक गुपित सांगतो. आमचं सध्याचं वय ३० कोटी वर्ष आहे बरं
का? म्हणजे आम्ही डायनासॉरच्यापूर्वीपासूनचे
पृथ्वीवरचे निवासी! तुम्ही मानव कधीपासून इथे राहता? माहिताय ना तुम्हाला. फक्त ३ लाख वर्षापासून.
आम्ही तुमच्यासाठी रक्ताचं बलिदान देतो. आमचे प्राण वाचवण्यासाठी आणि
३० कोटी वर्षापूर्वीचा वारसा जपण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं नाही वाटतं? जिवो जीवस्य जीवनम म्हणतात. म्हणजे
जगा आणि जगू द्या...हॉर्सशू या पृथ्वीवरच्या सर्वात जुना रहिवाशाची तुम्हाला हात
जोडून प्रार्थना आहे.
सुरेश वांदिले


Comments
Post a Comment