आळशी बेडूक
आळशी बेडूक
बेडकांचा आजोबा एकदा आपल्या नातवांना गोष्ट सांगत होता. विहिरीत
राहणाऱ्या आणि विहिरीच्या बाहेर एका डबक्यात राहणाऱ्या बेडकांची ही गोष्ट होती.
उन्हाळ्यात डबक्यातले पाणी आटत आल्याचं दिसल्यावर विहिरीतील बेडकाने, डबक्यात
राहणाऱ्या बेडकास विहिरीत राहाण्यासाठी येण्याचा सल्ला दिला.
मग, हा सल्ला त्याने ऐकला नाही का?
एका नातवानं विचारलं.
त्याला ते पटत होतं? आजोबा उत्तरले
मग काय झालं?
तो डबक्यातला बेडूक होता आळशी. फार हालचाल करण्याची त्याची इच्छा नसे.
हे पाणी पूर्ण आटणार नाही, असही त्याला वाटायचं. हे पाणी आटू नये म्हणून तो देवाची
दररोज प्रार्थना करायचा.
मग काय झालं? देवानं त्याची
प्रार्थना ऐकली नाही का?
देवाने ही प्रार्थना ऐकायचं ठरवलं. देव त्या डबक्यातल्या बेडकासमोर
प्रगट झाला. हे कळताच विहिरीतला बेडूक तिथे आला नि तो देवाला म्हणाला,
देवा, या बेडकाचं म्हणणं तुम्ही ऐकू नका. त्यामुळे हा आणखीच आळशी होईल.
देवाला, विहिरीतल्या बेडकाचा हा सल्ला आगावूपणाचा वाटला. तर डबक्यातला
बेडकास त्याचा भयंकर राग आला. त्याला खाऊ की गिळू असे झाले.
देवाने, रागाने विहिरीतल्या बेडकाकडे बघितलं.
हे बघा देवा, तुम्हाला माझा राग आलाय हे मला ठाऊकाय. पण तुम्ही
डबक्यातलं पाणी कमी होणार नाही, असं वरदान दिलं तर, हा डबक्यातला बेडूक काहीच
हालचाल न करता इथेच डबक्यात पडून राहील. हे डबकं म्हणजेच त्याला जग वाटेल. या
डबक्यात याला पोट भरण्यासाठी अन्न कमीच राहील. मग ते संपलं की पुन्हा तो तुमची
प्रार्थना करेल. परत तुम्ही त्याला वरदान द्याल. असं प्रत्येकवेळी होत राहिलं तर
हा बेडूक किती आळशी आणि ऐतखाऊ बनेल, तुम्ही याचा विचार करा? विहिरीतला बेडूक म्हणाला.
आधी राग आलेल्या देवाला या विहिरीतल्या बेडकाचं कौतुक वाटलं. डबक्यातला
बेडकास देव काहीतरी सांगणार तोच त्या ठिकाणाहून एक रथ भरधाव जाऊ लागला. त्याच्या
चाकाखाली डबक्यातला बेडूक येऊ शकला असता, हे देवाच्या लक्षात आल्याने त्याने
चटदिशी त्याची एक तंगडी पकडली आणि त्याला विहिरीत टाकलं.
बापरे ! नातू म्हणाला.
हो ना, थोडक्यात वाचला म्हणायचा, डबक्यातला बेडूक.
मग आजोबा, देवाने विहिरीत टाकलेल्या त्या बेडकात आणि विहिरीतल्या
बेडकात भांडण झालं का?
छे छे,अरे, त्या बेडकाला आपली चूक कळली.त्याने विहिरतल्या बेडकाचे
आभारच मानले. यापुढे आळस करायचा नाही आणि जे जे स्वत:च्या हिताचं कानावर पडतं, त्याकडे
दुर्लक्ष करायचं नाही हे त्याने ठरवून टाकलं.
वा वा वा वा....
तेव्हा मीसुध्दा तुम्हाला जेव्हा तुमच्या हिताचं सांगतो, तेव्हा ते
लक्षात ठेवायच आणि तसं वागायचं. त्यामुळे तुमचं कोणताच नुकसान होणार नाही.
होय आजोबा..आम्ही तसचं वागू नातवाने आजोबांना मिठी मारत आश्वासन दिलं.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment