वाईट सवय


 वाईट सवय

तेजोमयीच्या सदनिकेच्या गॅलरिच्या खिडकीत आणि आई स्वयंपाक करायची त्या खिडकीत कावळा आणि कबुतर येत.

कावळोबा आला की आई आनंदायची. कावळोबा खिडकित आधी हळूच येऊन बसायचा. आईचं त्यावेळी स्वयंपाकाचं काम सुरु असायचं. चोच इकडे तिकडे करत, आईकडे बघत तो बसायचा. त्याची वेळ ठरलेली असे. त्यामुळे तो आला की आई लगेच त्याच्यासाठी काही ना काही खायला द्यायची. कावळोबासाठी पाण्याचीही व्यवस्था तिने केली होती.

कावळोबास देण्यासाठी आईस थोडा जरी उशीर झाला तरी तो काव काव करुन आईचं लक्ष वेधायचा. तेव्हा आई त्याला लटकेच रागवायची. गप्प बस म्हणायची. थोडी कळ सहन कर असं सांगायची. त्याला ते कळत असावं. कारण तो मग चूप बसे. कंटाळा आला तर उडून खिडकी बाहेरच्या गुलमोहराच्या झाडावर जाऊन बसे. काही वेळाने परत यई. तो आला की मग आई त्याला प्रेमाने खाऊ घालायची.

कावळयाला जीव लावणारी आई, मात्र कबुतर आले की थयथयाट करायची. त्याला अजिबात खिडकीवर बसू देत नसे. झाडू घेऊन किंवा हातात मिळेल ती वस्तू घेऊन ती त्याच्या पाठीमागे लागायची.. कबुतराला याचं फार दु:ख होई.

एकदा त्याने न राहवून कावळोबास विचारलं

गड्या, तुझ्यापेक्षा मी दिसतो चांगला. मोहक आहे. आवजही तुझ्यापेक्षा किंचित बरा आहे. पण तेजोमयीची आई तुझ्यावर प्रेम करते नि मला कां बुवा सारखी हाटहूट करते.?

कावळोबास हा प्रश्न अनपेक्षित होता. तो कुणाच्या अध्यातमध्यात राहत नसे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काही त्याला देता आलं नाही..

मी सांगू का याचं कारण..या दोघांचं बोलण ऐकत असेलेली चिऊताई म्हणाली.

तुला गं कसं ठाऊक. कबुतर आणि कावळयानं एकाच वेळी विचारलं.

मी बघत असतेना, सारं काही, तुमच्या आजूबाजूला राहून...चिऊताई म्हणाली.

मग सांग बघू, कबुतरानं विचारलं.

अरे कबुतर दादा, कावळे दादावर तेजोमयीची आई प्रेम करते कारण, तो किती चांगला वागतो. आईला त्रास होईल, तिच्या कामात वाढ होईल असं काहीही करत नाही. आईनं दिलेलं मजेत खातो. थोडावेळ बसतो, आईशी बोलतो नि निघून जातो. मग येतो ते दुसऱ्या दिवशीच. पण कबुतर दादा, तुझं तसं नाही ना.. आई तुला हाकलून लावते तरी तू सारखा घरातच शिरण्याचा प्रयत्न करतो. आईला हे आवडत नाही हे तुझ्या लक्षात येत नाही. आईचं लक्ष नाही हे बघून पुन्हा पुन्हा घरात शिरतो, कपाटावर बसतो. तिथेच शी करतो..कावळे दादा असं काही करत नाही ..

चिऊ ताईनं सविस्तर सांगितलं.

बरोबर आहे या चिऊ ताईचं, अरे मित्रा, आपल्यामुळे फक्त त्रासच होत असेल तर कशाला आई आपल्यावर प्रेम करेल, नाही का? कावळेदादा कबुतरला म्हणाला.

आपण यापुढे चांगलं वागू असं कबुतरानं ठरवलं, पण त्याच्या वाईट सवयी गेल्या नाहीत आणि तो आईचा आवडताही झाला नाही.

सुरेश वांदिले

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!