दुर्गा म्हणते,शिकायचं कशाला?
दुर्गा म्हणते,शिकायचं कशाला?
सॅनफ्रँसिस्को, हे अमेरिकेतलं मोठं शहर. या शहरात सिटी हॉल नावाच्या
नामांकित ठिकाणी, या शहरातील मोठी-जाणती-सुजाण माणसं वेगवेगळया कामानिमित्त सतत
जात येत असतात. हा हॉल या मोठ्या माणसांनी गजबलेला असतो.
या हॉलच्या
प्रवेशव्दाजवळ दर शुक्रवारी न चुकता, ती मुलगी ठरलेल्या वेळी बसू लागली. सुरुवातीला
कुणाचं फारसं तिच्याकडे लक्ष गेलं नाही. कारण इतर दिवशी ती दिसायची नाही. मात्र
शुक्रवार आला की ती हमखास तिथे असणारच.
शुक्रवारचं
तिचं प्रवेशव्दाराजवळ बसलेलं असणं, काही मोठ्यांच्या बरोबर लक्षात आलं. एके दिवशी
एका काकांनी याबाबत तिला विचारलच शेवटी...
काय गं बाळ
,तुला शाळाबिळा नाही कां,इथे येऊन निव्वळ बसून असते नुसती.
ती हसली. हा
प्रश्न विचारणाऱ्या त्या काकांना म्हणाली..
काका, मी कां म्हणून शाळेत जावं असं तुम्हाला
वाटतं...
आँ..हा अजब
प्रश्न ऐकून तो काका उडालाच....मनातून टरकला सुध्दा. ही मुलगी वेडी तर नाही ना
अशीही शंका त्याला आली. तिच्या ते बरोबर लक्षात आलं.
काका, मी तुम्हाला
वेडी वाटतेय ना..आहेच मी तशी...म्हणून तर मला माझ्या भविष्याविषयी चिंता वाटते. आपल्या
पृथ्वीविषयी चिंता वाटते. कॅलिफोर्नियाच्या जंगलात सतत लागणाऱ्या आगित पशू-पक्षी
जिवंत जळून जातात ,मात्र तुमच्यासारख्या मोठ्या माणसांना याचं फारसं काही वाटत
नाही,याचं दु:ख वाटतं मला..
अगं, हो हो
कळलं तुला काय म्हणायचं ते ..पण, असं दर शुक्रवारी या ठिकाणी बसून ही समस्या दूर
होणार का?..ते काका या मुलीस म्हणाले.
मला माहीत
आहे काका, असं होणार नाही. पण आज जसं तुमचं माझ्याकडे लक्ष गेलं तसच हळूहळू इतरांचंही
जाईला ना. त्यांनाही मी सांगेन, मानसांमुळे पशुपक्षांच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन
निसर्गाचा समतेाल ढळतोय, आपण जशी पृथ्वीची मुलं तसेच हे प्राणीसुध्दा मुलचं
ना..त्यांना मारताना, त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करताना आपणास काहीच काहीच कसं
वाटतं नाही. पर्यावरणाचा इतका नाश आपण करतो. याचं काहीच कसं वाटतं नाही
तुम्हास..यामुळे तुमची माझी ही पृथ्वी आपली वसुंधरा वाचणार नसेल तर मी शिकायचं तरी
कशाला. सांगा बरं, मी शिकायचं तरी कशाला..
या
प्रश्नाचं उत्तर त्या काकांकडे होतं.पण त्याचं उत्तर देण्याची हिम्मत म्हणा, शौर्य
म्हणा, ते नव्हतं.ते ओशाळल्यागत हसले. खाली मान टाकून निघून गेले.
हे असचं
होणार हे तिला पक्क ठाऊक आहे. कारण पर्यावरण संरक्षणाचा विषय आला की मोठी माणसं
बोलतात एक नि करताच भलतच हे तिला एव्हाना लक्षात आलय. पण यामुळे निराश व्हायचं
नाही. पर्यावरण रक्षणासाठी जागृती करण्याचं काम काही थांबवायचं नाही याचा तिने
पक्का निर्धार केला.
पर्यावरणाची
हानी करण्यात मानसाला अजिबात काहीही वाटत नसल्याचं तिला सहाव्या वर्गातच कळलं.
झालं असं की,
एके दिवशी,तिच्या वर्ग शिक्षिका रिबेका
न्युबर्न यांनी, मानवी हस्तक्षेपांमुळेच कॅलिफोर्नियाच्या जंगलात वारंवार लागणाऱ्या
आगीबद्दल माहिती दिली. या सततच्या आगीमुळे पशुपक्षांचा अधिवास नष्ट होतो. वनसंपत्ती
नष्ट होते.धुरांमुळे लोकांना विशेषत: मुलांना दम्यासारखे आजार होतो, असं त्यांनी
सांगितलं. हे सगळं ऐकून ही मुलगी हादरली.घाबरली सुध्दा.
शाळेतून घरी
येईपर्यंत तिच्या डोक्यात हाच विषय घोळत होता. याच अस्वस्थेत ती रात्री झोपली.
मात्र त्या दिवशी तिला डोळा लागला नाही. तिचं विचारचक्र सुरुच राहिलं. आपण काहीतरी
करायला हवं. वन वाचवायला हवं. पृथ्वी वाचवायला हवी... असे विचार तिच्या मनात
रात्रभर येत राहिले.
सहावितली ही
11 वर्षाची मुलगी खरं तर या काळात नैराश्याचा सामना करत होती. तिला कशातच रस
वाटेना. ती खेळायची नाही की मित्रांमध्ये मिसळायची नाही. कसं होणार या मुलीचं, या
चिंतेनं तिच्या आईवडिलांची झोप उडाली होती. मानसोपचार तज्ज्ञांचे उपचारही कामी येत
नव्हते.. फुल जसं कोमेजतं तसं या मुलीचं झालं होतं... पण रिबेका न्युबर्न
यांनी दिलेली माहिती कानावर पडताच, ती सजग झाली. आपलं नसलेलं दु:ख उगाचच
कवटाळून बसत असल्याचं तिला तेव्हा प्रकर्षानं जाणवलं.
विचारात आणि
तळमळीत घालवेली ती रात्र सरली आणि तिच्यासाठी नवा सूर्य उगवला.
तिने
ठरवलं,आता आपल्या कोषातून बाहेर पडायचच.जे ठरवलं ते तिने करुन दाखवलं.काही दिवसात
ती नैराश्यातून बाहेर पडली. जोमाने आणि
उत्साहाने कामाला लागली.
पृथ्वीला वाचवण्याच्या,पर्यावरण
रक्षणाच्या धेय्याने तिचं संपूर्ण परिवर्तन झालं. पर्यावरण रक्षण चळवळीसाठी
अमेरिकेत कोण कोण काय करतय, याची माहिती तिने काढली.काही संस्था आणि संघटनांची ती
सदस्य झाली. वेगवेगळया चळवळीत सामील होउु लागली. पर्यावरण रक्षणाच्या महत्वावर
भाषणंही देऊ लागली. या शहरातून त्या शहरात जाऊ लागली.
त्यातूनच
तिला टॉऊन हॉल जवळच्या प्रवेशव्दाराजवळ
शुक्रवारी बसण्याची कल्पना सुचली. या
कल्पनेला तिने पृथ्वीला वाचवा,या चळवळीच्या स्वरुपात मूर्त रुप दिलं.त्यात सातत्य
ठेवलं. त्यावर हळूहळू बरीच चर्चा होऊ लागली .
मात्र, तिच्यासोबत
शिकणाऱ्या बऱ्याच मुलांना पर्यावरणाचं रक्षण, असा सुध्दा विषय राहू शकतो, हेच
ठाउुक नव्हतं. तर काही मुलांना आपण एकेकटे कसं काय संरक्षण करणार पर्यावरणाचं असं
वाटायचं. एकूणच मुलांच्या मनात बराच गोंधळ होता. मुलांच्या मनातील हा गोंधळ दूर
झाला तरच ते पृथ्वीला वाचवा, या चळवळीत हिरहिरीने भाग घेतील याची खात्री तिला पटली.
आता, तिने
यासाठी क्लायमेंट नाऊ, नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत ती आणि तिच्या
विचारांनी प्रेरित झालेल्या मित्र-मैत्रिणी वेगवेगळया शाळांमध्ये जातात. मुलांशी
पर्यावरण, हवामान बदल, नष्ट होणारे प्राणी, परिसंस्थेचा ऱ्हास यावर माहिती देतात. त्यांच्याशी
गप्पा मारतात.
अनेक
देशातील मुलांपर्यंत, पृथ्वीच वाचणार नसेल तर मग शिकायचं कशाला? ही काळजी, इंटरनेटची मदत घेऊन ही मुलगी- प्रभावीपणे पोहचवतेय आणि मुलांना
जागृत करतेय..
ही मुलगी
म्हणजे सारा गुडी..
सुरेश वांदिले..

Comments
Post a Comment