दुर्गा
येती घरा..
नवरात्रीच्या
काळात,तेजोमयीच्या आईने, कामवाली काकू आणि तिच्या घरच्या सर्वांना जेवायला बोलवायच
ठरवलं.
आपली
ईमारत झाडणाऱ्या मावशीसही बोलवण्याची सूचना बाबांनी केली. आई हो म्हणाली. आईनेच
स्वत: त्यांना आवर्जून मोबाईलवरुन निरोप दिला.
आईनं
एखादी गोष्ट करायची ठरवली की, मग तिचा उत्साह विचारायलाच नको. कितीही काम असो, तिला
थकवा येत नाही. काम संपेपर्यंत तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान असतं.
तिच्या अवती-भवती असणाऱ्या अलेक्झांडरशी इकडच्या तिकडच्या गप्पा करत, ती कामाचा
फडशा पाडते.
आजही
जवळजवळ १५ व्यक्तिंच्या जेवणाची जय्यत तयारी आईने केली. दोन तीन भाज्या, मसालेभात,
पुरणपोळी, कढी,वडे असा मस्त बेत होता. तेजोमयी आणि बाबांनी सुध्दा आईच्या
उत्साहालाच साजेशा उत्साहाने तिला जमेल तशी मदत केली. ठरल्याप्रमाणे स्वयंपाक
झाला. सांगितलेल्या वेळेवर पाहुणे आले. आईने त्यांना आदराने सोफ्यावर बसवले. काकू
आणि मावशी या दोघींनी, आईला मदत करण्याविषयी विचारलं. आईनं हसून नकार दिला.
तेजोमयीच्या
मदतीनं तिने आतल्या खोलित जेवणाची सगळी तयारी केली. सर्वांसाठी चटया टाकल्या. त्याभोवती
रांगोळी घातली. ताट वाढून झाल्यावर सर्वांना जेवायला बोलावलं. काकू आणि मावशी
आईपेक्षा मोठ्या असल्याने आईने त्यांना नमस्कार केला. सर्वांना आईने आग्रहाने
वाढलं. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसू लागला. आईने काकू आणि मावशीला
आणि ताईस दोन दोन हजार रुपयेही दिले.
काकूस
राहवलं नाही, हे कशासाठी ताई त्यांनी विचारलं.
काही
नाही गं..प्रेमाची भेट समज.. तुम्ही आमच्यासाठी किती श्रम करता, झटता..पण त्याची
दखल आम्ही म्हणावी तेवढी फार कमी वेळेला घेतो. तुम्ही आमच्यासाठी काम करता म्हणून
आमचं जीवन सुसह्य होतं. तुम्हीच आमच्या खऱ्या खुऱ्या दुर्गा आणि भवानी आहात..आई
म्हणाली. बोलता बोलता तिच्या डोळयात अश्रू आले. पण लगेच तिने स्वत:ला सावरलं. आता
फार प्रश्न नको असं तिने काकूंना बजावलं.
दुपारपर्यंत
छान गप्पा टप्पा झाल्या. काकू आणि मावशीच्या मुलांसोबत तेजोमयी खेळली. अलेक्झांडरही
त्यात सामील झाला. दुपारी सर्वांचा चहा करुन आईने त्यांना निरोप दिला. जाताना काकूंना
म्हणाली..काकू उद्या तुम्हाला सुटी बरं का..
अहो
पण ताई, आजही तुम्ही मला काम करु दिलं..पुन्हा उद्या सुध्दा.किती भार पडणार
तुमच्यावर..
काही
भार पडत नाही...वर्षभर तुम्ही राबताच की..दोन दिवस आपणहून सुटी दिली तर काही बिघडत
नाही..आई म्हणाली.काकू आणि मावशी तिघीही गहिवरल्या. इतर लोकही असं वागलं तर किती
छान होईल नाही का, असं मावशी म्हणाली.
आई
हसली.
पाहुणे
जाताच बाबांनी आईचं कौतुक केलं.आपल्याला असं सुचलं नसतं, हे सांगायला ते विसरलं
नाहीत. आपली आई खरच ग्रेट असल्याचं वाटून तेजोमयीने तिच्या गळयात पडून तिला पप्पी
दिल्ली. आईनं काहीतरी मोठं केल्याचं हे अलेक्झांडरच्या लक्षात आल्यानं तोही आईच्या
गळयात पडला नि त्यानेही त्याच्या पध्दतीनं आईवरचं प्रेम व्यक्त केलं..
अगं
पण आई,तेजोमयी अचानक म्हणाली..
काय
झालं गं..
अगं,
तू आज देवघरातील देवींची पूजाच केली नाहीस ना..कामाच्या गडबडीत विसरलीस तू..
खरच
की..आठवण राहिली नाही..
देवी
रागवेल का आता..
त्या
कशाला रागवतील..बाबा म्हणाले.
कां
हो..
अगं,तुझ्या
आईने आज खऱ्या खुऱ्या दुर्गादेविंना जेवू घातलं. त्यांची पूजा केली..देवघरातल्या
मूर्त्या ते सगळं बघतच होत्या ....काय हो, बरोबर ना... आईकडे बघून बाबा म्हणाले..
आई
फक्त हसली..तिच्या चेहऱ्यावर वेगळच तेज वाटत होतं..
आपली
आईच आपली दुर्गा बरं का तेजो. बाबा म्हणाले. अलेक्झांडरला आईच कौतुक लगेच कळतं,त्यानेही
उडी मारुन आपला आनंद व्यक्त केला.
सुरेश
वांदिले
००००

Comments
Post a Comment