खरे सुख
खरे सुख
मेळघाटातील एक वाघोबा एकदा
रस्ता चुकले. ते इकडे तिकडे भरकट नागपुरच्या महाराज बागेत रात्रौ आठच्या सुमारास पोहचले.
महाराज बाग प्रेक्षकांसाठी बंद झाल्याने तिथे फक्त पशु पक्षांशिवाय कुणीही नव्हतं.
वाघोबांनी महाराज बागेचा फेरफटका
सुरु केला. बागेमध्ये झाडे होती पण ती फारच अल्प प्रमाणात. वाघोबांना मेळघाटातले
जंगल आठवले. किती घनदाट आणि झाडांची नुसती गर्दी. त्यातून वाट काढणे सुध्दा कठीण. इथे
मात्र अगदी सहजच चालता येत होते.
अरे वा, असे सहज उद्गगार
त्यांच्या मुखातून बाहेर पडले.
त्यांची अशी भटकंती सुरु
असताना एका पिंजऱ्यात त्यांना दुसरे वाघोबा दिसले.
अरे, हा दुसरा वाघोबा कसा काय
अडकला बुवा या पिंजऱ्यात, वाघोबा विचार करु लागले. पण या प्रश्नाचं त्यांना उत्तर
मिळालं नाही.
त्यांनी पिंजऱ्यातल्या वाघोबास
हाक मारली. पिंजऱ्यातल्या वाघोबांचे नुकतेच मस्त भोजन झाले होते. त्याचे डोळे
पेंगुळायला लागले होते. पिंजऱ्याबाहरेचा वाघोबाचा आवाज ऐकून या वाघोबांनी डोळे
उघडले.
अरे, तू कुठून आलास...भरकटलास
वाटते जंगलातून.पिंजऱ्यातल्या वाघाने विचारले
होय तसे समज..रस्ता चुकला..पण
तू कसा काय आलास इथे. या चार भिंतीत कसा बुवा राहू शकतो.. तू.. असं
पिंजऱ्याबाहेरच्या वाघोबानं विचारलं.
तेव्हा पिंजऱ्यातला वाघोबा
म्हणाला. मित्रा, मी कसं काय सांगू शकेन इथे या चार भिंतीत कसा राहू शकतो ते..ते
तुला आत आल्यावरच कळेल ना..पिंजऱ्यात काय सुख असते ते...
पिंजऱ्यात सुख असतं? पिंजऱ्याबाहेरच्या
वाघोबानं आश्चर्यानं विचारलं.
मग ! अरे जंगलात
शिकारीसाठी फेरफटका मारायची गरज नाही. शिकारीच्या पाठीमागे धावायची गरज नाही. सगळं
कसं इथे आयतं मिळतं. मस्त खायचं आणि आराम करायचा. कोणतेही कष्ट नाही ,घाम गाळणे
नाही..एखादा राजा नसतो का, त्याला काहीच करावं लागत नाही. आज्ञा दिली की
सेवकांकडून सारे काही तयार. तसे माझे आहे. मी खरा राजा बाबा..तू पिंजऱ्यात आलास तर
तुही राजासारखा होशील बघ..पिंजऱ्यातल्या वाघोबा म्हणाला.
पिंजऱ्यात खरोखरच सुख असेल का? की हा वाघोबा आपल्याला
फसवतोय..असे विचार पिंजऱ्या बाहेरच्या वाघोबांच्या मनात आले..त्याचे सुख त्याला
लखलाभ. आपण कशाला या भानगडित पडायचं. पिंजऱ्या बाहेरचे वाघोबा स्वत:शीच बोलले.
पिंजऱ्यातल्या वाघोबास खरे
सुख, खरा आनंद कशात आहे, हे समजावून सांगण्यात अर्थ नाही. तो ते समजणारही नाही
उगाच आपल्या तोंडाची वाफ का दडवायची. असे पिंजऱ्याबाहेरच्या वाघोबास वाटले. पिंजऱ्यातल्या
वाघोबाकडे बघून हसले. या वाघोबाचा त्यांनी निरोप घेतला आणि मेळघाटच्या रस्त्याचा
शोध घ्यायला पुढे निघाले..
मूर्ख लेकाचा..पिंजऱ्यातला
वाघ, पिंजऱ्याबाहेरच्या वाघोबाकडे बघून हळूच म्हणाला. आणि त्याने मस्त ताणून दिली..
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment