पिल्लू संकटात
पिल्लू संकटात
दर
शनिवारी बाप्पा आणि तेजोमयी मारुतीरायांच्या मंदिरात जातं.आजही ते गेले.दोघांनी
मारुतीरायाचं दर्शन घेतलं.तीर्थ -प्रसाद घेतला नि ते मंदिराच्या बाहेर पडले.
बाप्पांनी तेजोमयीला 87 क्रमांकाच्या बेस्टबसच्या थांब्यावर
नेलं.त्यांना तिथे थोडावेळ थांबून बसची येजा बघायची होतं.बाप्पांना कधी काय करायची
इच्छा होईल ,हे काही सांगताच येत नाही गडे.त्यांचं वागणं
बरेचदा चमत्कारीक असतं.तेजोमयी मनात म्हणाली.आणि निमूटपणे त्यांच्यासोबत 87
च्या बसथांब्यावर गेली.तेजोमयीच्या मनात काय चाललय हे ओळखून बाप्पा गालातल्या
गालात हसले.
बसथांव्यावर गाडयांची जा-ये बघत असताना
मांजरीचं एक छोट्टूसं पिल्लू अचानक तिथे आलं.कुठनं,कसं? हे
काही कळलं नाही.त्याची आईही कुठे दिसत नव्हती.आईपासून भरकटलेलं असावं ते.आपल्या
किन-या आवाजात मँऊ, मँऊ,करत ते इकडे तिकडे पळत होतं.ते बघून
तेजोमयीच्या छातीत धस्स होत होतं.एखाद्या गाडीच्या चाकाखाली ते पिल्लू आलं तर..असा
एक वाईट विचार तिच्या मनात आला.मात्र तिने झटकन तो विचार झटकून टाकला.ते पिल्लू
सुरक्षित राहावं म्हणून बाप्पांचीच प्रार्थना करु लागली.
00
87 क्रमांकाच्या
बसथांब्यांच्या जवळच ट्रॅफिक नियंत्रण होत असल्याने गाडयांचा वेग कमी होत
होता.त्यामुळे ते मांजरीचे पिल्लू गाडीच्या खाली आलं नव्हतं.पण ते कधीही येऊ शकलं
असतं.हे बघून एका व्यक्तिने त्या पिल्लाला उचललं नि बाजूला ठेवलं.पण ते पिल्लू
क्षणात रस्त्यावर आलं.त्या व्यक्तीनं परत त्याला उचललं आणि थोडया दूर अंतरावर नेऊन
ठेवलं.पण परत काही क्षणात ते तिथे आलं नि रस्त्यावर पळू लागलं.
त्या व्यक्तिने पुन्हा त्या पिल्लाची
मान पकडली नि बसथांब्याला लागून असलेल्या कंपौंडच्या आतमध्ये त्याला टाकलं.नि
सुटकेचा निश्वास टाकला.पण अर्ध्यामिनिटात ते पिलू पुन्हा रस्त्यावर तयार नि
पळण्यासाठी उत्सूक..हे बघून तेजोमयीला गंमतही वाटत होती नि पिल्लाची काळजी वाटत
होती.
बाप्पा सुध्दा ही गंमत बघत होते.ते पिल्लू फार धीट होतं.त्याला भीती वाटत
नव्हती हे खरच होतं.पण त्याला कदाचित वाहनांच्या खाली आल्यास काय घडतं हेच ठाऊक
नसण्याची जास्त शक्यता होती.त्यामुळे ते वारंवार त्या ठिकाणी जात होतं.तो त्याचा
बदमाशपणा किंवा हट्टीपणा नव्हता.त्याचं ते खेळणच होतं.ते निरागस होतं.पण कोणत्याही
क्षणी त्याच्या जीवावर बेतणारा त्याचा हा
खेळ होता.
त्या
पिल्लाला पुन्हा पुन्हा सुरक्षित जागी ठेवणारी ती व्यक्तीही वैतागली.तिची बस
आल्याने ती त्यात बसून निघून गेली.आता या पिलाला कोण उचलणार.एखाद्या भरधाव
गाडीखाली हे पिल्लू आलं तर..या विचारारनं तेजोमयी अस्वस्थ झाली.त्यामुळे ती
बाप्पांना म्हणाली..
बाप्पा
बाप्पा तुम्हीच काही तरी करा आता.
त्याचवेळी एका सँट्रो गाडीचा ब्रेक
करकचून लागला.त्या गाडीच्या चाकाखाली येता येता पिल्लू वाचलं.गाडी चालवणाऱ्या
बाईने दोन चार शिव्या हासडल्या..अचानक तिथे मोठी मांजर कुठनशी प्रगटली कुणास
ठाऊक.तिने त्या पिलाची मान आपल्या तोंडात पकडली आणि तिने बाजूच्या कंपौंडवरुन उडी
मारली नि ती अदृष्य झाली.तेजोमयीने आणि बसथांब्यावरील प्रवाशांना सुटकेचा निश्वास
टाकला.
तेजोमयीने बांप्पाकडे बघितले.ते गालातल्या गालात हसत होते.
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment