वस्तुसंग्रहातलं साहस
वस्तुसंग्रहातलं साहस
एका सुटिच्या दिवशी तेजोमयीला बाप्पांनी थेट
छत्रपती शिवाजी संग्रहालयात म्हणजेच प्रिंस ऑफ वेल्स म्युझियम मध्ये नेलं.
अहो बाप्पा, तेच ते कितीदा बघायचं?तेजोमयी तक्रारीच्या सुरात म्हणाली.
तेच ते असलं तरी प्रत्येक वेळेला आपल्याला नवं
काही कळतं. समजतं. त्यामुळे नवा आनंद मिळतो.
पण बाप्पा, तरीसुध्दा मला काही तुमचं म्हणणं
पटत नाही.
नाही तर नाही! पण आता आलोच आहोत तर आपण बघूया की! असं बोलून बाप्पांनी
तिला तळमजल्यावर असलेल्या प्राणी संग्रहालयात नेलं.
तेजोमयी इथे अनेकदा आली होती. त्यामुळे ती
अनिच्छेनं आत शिरली. आत शिरताच बाप्पांनी तिच्या हातात कागद,पेन दिला आणि तिला म्हणाले...
इथे असंख्य पोपट आणि कावळे आहेत. त्यांची
वेगवेगळी नावं आहेत. वेगवेगळी वैशिष्टयं आहेत. लिहून काढ बरं!
बाप्पांनी काय नवं खूळ काढलय? तेजोमयी मनात म्हणाली. पण आता नकार देणं शक्य नव्हतं.
तिने काचेच्या कपाटात बघितलं. शंभरहून अधिक कावळे. त्यांची शास्त्रीय नावं,
त्यांचे विविध आकार. शिवाय पांढरा कावळा, रंगीबेरंगी कावळासुध्दा!
वॉवsss उत्स्फुर्तपणे तेजोयमी उद्गारली. बाप्पा हसले.
या आधी ती आई-बाबांसोबत इथे आली तेव्हा तिने
पोपटाचा कपाट बघितला होता. तो पूर्ण बहुनही झाला नसताना बाबांनी दुसऱ्या कपाटाकडे
नेलं. ते पूर्ण बघून होण्याच्या आधीच बाबा म्हणाले चला तिसऱ्या कपाटाकडे! अशाप्रकारे संपूर्ण पशूपक्षी ग्रहालय एका तासात बघून
पूर्ण!
आता बाप्पासोबत मात्र कावळयांचच कपाट बघायला एक तास लागला. पोपटांच्या
कपाटासमोर ती समोर उभी राहिली तेव्हा १०० हून अधिक प्रकार आणि विविध रंगी आकाराचे पोपट बघून ती उडालीच, ओ मॉय गॉड! असं चटकन बोलून
गेली. बाप्पा हळूच म्हणाले, ओह मॉय बाप्पा! म्हण ना. तेजोमयी
खुदकन हसली.
०००
तेजोमयी आणि बाप्पा पोपटांच्या कपाटाजवळ दीड
तास उभे होते. त्यानंतर ते आतील दालनात गेले. तिथे छताला एक भला मोठा व्हेल
तारांनी बांधून ठेवला होता. या आधी तेजोमयी जेव्हा इथे आली होती,तेव्हा तेवढ्यापुरतं बघून व अबब!
म्हणून तिने पुढचे प्राणी बघितले. यावेळी बाप्पांनी तिला पुढे जाऊ दिले नाही. ते
म्हणाले, इथेच थांब, आपण या व्हेलला
काळजीपूर्वक बघू.
काळजीपूर्वक म्हणजे हो काय? बाप्पा, तेजोमयीने विचारलं.
काळजीपूर्वक म्हणजे या व्हेलचा बारिक सारिक तपशील
बघू. बाप्पा म्हणाले.
अहो,
हा कुठला आलाय बारिक! हा तर अवाढव्य, ट्रकभर
लांबीचा!तेजोमयी हसत म्हणाली.
अगदी बरोबर! पण ते तुझ्या आता
लक्षात आलय ना! ट्रकभर लांबीचा व्हेल!
हा जेव्हा किनाऱ्यावर सापडला असेल तेव्हा नेमकी काय प्रतिक्रिया उमटली
असेल हो बाप्पा?तेजोमयीनं विचारलं.
हो ना उमटली होती,त्या ठिकाणी आवाज उमटला.
कोण बोललं? तेजोमयीने बाप्पांना विचारलं.
मी तर काहीच म्हणालो नाही.
मग इथे आवाज कुठून आला?
मी पण एैकला.बाप्पा म्हणाले.
०००
व्हेलच्या दालनात तेजोमयी आणि बाप्पांनी इकडे
तिकडे बघितलं.पण त्या दालनात कुणीच नव्हतं.
असं आश्चर्यचकित होऊ नका? वर बघा...असा आवाज त्या दालनात
घुमला.
हा आवाज कानावर पडताच तेजोमयी आणि बाप्पांनी वर
बघितलं. व्हेलच बोलत होता...
तू मेलेला असताना, कसा काय बोलतोयस?तुझं भूत-बित तर झालं नाही ना? तेजोमयीने घाबरुन विचारलं आणि
बाप्पांना बिलगली.
अगं घाबरु नकोस.सोबत बाप्पा असताना घाबरायचं
कशाला? व्हेल म्हणाला.
हे मी कितीदा तरी हिला सांगितलं, पण ही ऐकतच
नाही.बाप्पा म्हणाले.
पण,
तू तर मेलेला आहेस ना?तेजोमयीने पुन्हा तोच प्रश्न विचारला.
होय,पण बाप्पांसाठी मी अजूनही जिवंत आहे!
म्हणजे?
ते जाऊ दे!ते
तुला नाही कळायचं?मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो.
कोणत्या?
मी जेव्हा किनाऱ्यावर सापडलो तेव्हा लोकांना
काय वाटलं? हा तो प्रश्न...
काय वाटलं?
अगं,मी त्यांना दैत्य वाटलो!
बापरे!
तोसुध्दा समुद्रातला दैत्य!पृथ्वीवरच्या लोकांवर राज्य करण्यासाठी मला
समुद्राच्या राजानं पाठवलं असं काही जणांना वाटलं.
खर होतं का ते?
अगं, कसलं खरं नि कसलं काय?
समुद्रात मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळयात
अडकलो.सुटकेसाठी खूप प्रयत्न केला.पण जमलं नाही.अखेर गुदमरुन जीव गेला. माझ्या
मृतदेहासह जाळं वर आलं.तर मला लोकांनी दैत्य ठरवलं!
अरेरे!तेजोमयी
म्हणाली.
000
व्हेलच्या गप्पांमध्ये तेजोमयी आणि बाप्पा
रंगून गेले.गप्पा रंगात आल्या असताना बाप्पा व्हेलला म्हणाले,इथे असं बोलत बसण्यापेक्षा आपण बाहेरच गेलो तर...
पण बाप्पा बाहेर कसं जाणार? कुणी बघितलं तर?व्हेल म्हणाला.
अरे, मघा तू जसा मला म्हणालास, बाप्पा सोबत असताना काळजी
कशाला?ते तुलाही लागू ठरत ना!तेजोमयी
म्हणाली.तिघेही हसले.अशाप्रकारे बाप्पांनी व्हेलला बाहेर काढलं.
आता कुठं जायचं?
समुद्रातच जाऊ या की! बाप्पा म्हणाले.तेजोमयीला कल्पना आवडली.बाप्पांनी व्हेलला पंख दिले.
बाप्पा आणि तेजोमयी दोघेही त्याच्या मुखातून आत
शिरले.व्हेल उडाला नि गेटवे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रावर उतरला.
बाप्पा त्याला म्हणाले.चल समुद्रात!
व्हेलने समुद्रात डुबकी मारली.जवळपास १००
वर्षानंतर तो पाण्यात शिरला होता.त्यामुळे तो आनंदून गेला होता.
पाण्यात शिरल्यावर बाप्पा त्याला म्हणाले,सांग आता तुझी गोष्ट!
व्हेल सांगू लागला...
पाण्यात राहणारा मी एकमेव सस्तन प्राणी. माझ्या
प्रचंड आकार आणि वजनामुळे माझं वर्णन
सागरातील हत्ती अस केलं जातं. आमच्या नवजात पिलाचं वजन ९९०० किलो ,लांबी १२ फूट असते. पाण्यात राहूनही आम्ही उष्ण रक्ताचे म्हणजेच मानसाच्या गटातले.आम्हाला पृथ्वीतलावर
सर्वात मोठा प्राणी समजल जातं.
ते तर दिसूनच येतय.तेजोमयी म्हणाली.
आमचं सर्वसाधारण वजन हे २००० माणसांइतकं असतं.आमच्या
८० प्रजाती सापडतात.तीक्ष्ण दात असलेले व्हेल आणि असे दात नसलेले व्हेल अशा
गटातल्या या प्रजाती असतात.आम्ही व्हेल परस्परांशी उत्तम संवाद साधू शकतो.आम्ही
कळपासह राहतो.आमचा पोहण्याचा वेग छोटया नौकांच्या वेगाइतका असतो.आम्ही पाण्याबाहेर
येऊन श्वासोछ्वास करु शकतो. समुद्रात काही हजार मीटर खोल उडी मारु शकतो . असे आम्ही तुमचे सोबती .पण भविष्यात आम्ही
जिवंत राहू की अशी स्थिती सध्या निर्माण झालीय.व्हेल दु:खी अंत:करणाने म्हणाला.
कां हो काय झालं? तेजोमयीनं काळजीने विचारलं.
अगं बाळं, तुम्ही मानवांनी विविध कारणांसाठी आमची एवढी हत्या चालवलीय ना,त्यामुळे ही
भीती वाटतेय मला.
बापरे बाप!
होना,व्हेलने हुंदका दिला.बाप्पांचेही डोळे
भरुन आले.
बाप्पा, आपण व्हेलची मदत करायला हवी.तेजोमयी व्हेलची व्यथा ऐकून
म्हणाली.
मदत म्हणजे काय करायचं?
व्हेल वाचवा-निसर्ग जगवा अशी संघटना स्थापन करु
या!
मग काय करु?
घोषणा देऊ या.
कुणाविरुध्द?
खरच की! कुणाविरुध्द घोषणा द्यायच्या?तेजोमयी म्हणाली.बाप्पा
खळखळून हसले.व्हेल वेगानं पाण्याच्या वर येत होता.
अरे,अजून थोडावेळ पाण्यात फिरु या ना!बाप्पा म्हणाले.
छे! छे! मी वस्तुसंग्रहालयात नाही हे कुणाच्या लक्षात
आलं तर, बोंबाबोंब हाईल.
कसली रे बोंबाबोंब?
व्हेल गेला कुठं? चोरी
तर झाली नाही ना त्याची? चोर कसे शिरले एव्हढ्या बंदोबस्तात?अतिरेकी तर नसतील ना?
बापरे बाप! अतिरेकी सुध्दा येऊ शकतात वस्तुसंग्रहालयात?तेजोमयी घाबरुन
म्हणाली.
दिवसाढवळया नव्हे गं,रात्रीच्या अंधारात! साडे बारा वाजता.बाप्पा मिश्किली करत म्हणाले.
बाप्पा विनोदाची गोष्ट नाही.मुंबईत काहीही
अशक्य नाही.व्हेल म्हणाला.
आले, तरी ते तुला नेणार नाहीत.कारण तू आमच्या सोबत आहेस.तेजोमयी म्हणाली.
अतिरेकी येणार की नाही येणार हा नंतरचा प्रश्न
झाला पण मी तिथे नाही हे बघून बोंबाबोंब सुरु होईल.कुणीतरी अतिरेक्याचं नाव घेईल.मग
माझ्या शोधासाठी मोहीम सुरु करतील.मग पोलीस करतील मुंबई बंद.
असं पण घडू शकतं?
हो ना! कारण मी तिथे नाही म्हणजे घातपातच असं समजलं जाईल बघा.तेव्हा चला जाऊया
आता पटदिशी.असं म्हणून व्हेल वेगाने पाण्याच्या वर आला. आणि त्याने वस्तुसंग्रहालयाच्या
दिशेने उडायला सुरुवात केली.
०००
बाप्पा आणि तेजोमयीसह व्हेल वस्तुसंग्रहालायत
शिरला.ते जेव्हा पशुपक्ष्यांच्या दालनात जाऊ लागले.तेव्हा दबक्या पावलाने काही
माणसं लगबगीनं बाहेर जाताना व्हेलला दिसली.त्याने त्यांच्या हालचाली काळजीपूर्वक
टिपून ठेवल्या.
त्यांच्या खांद्यावर पोत्यासारखं काहीतरी
लटकवलेलं होतं. व्हेलच्या पोटात शंकेची पाल चुकचुकली. पण तो बाप्पांना काही बोलला
नाही. आपण कधी आपल्या जागेवर कधी जातो नि पूर्ववत लटकतो याची त्याला घाई झाली
होती.
लवकरच तो त्याच्या जागेवर आला. बाप्पा आणि
तेजोमयी त्याच्या पोटातून बाहेर आले. बाप्पांनी त्याच्या पोटाला करंगळी लावली.तो
नेहमीप्रमाणे त्याच्या तारांमध्ये वर अडकला. बाप्पा आणि तेजोमयीनं त्याचा निरोप
घेतला.
दोघेही पहिल्या दालनात आले तेव्हा तेथील दृष्य
बघून तेजोयमी बेशुध्द होता होता राहिली.
तेजोमयीची ती अवस्था बघून बाप्पांनी तिला आधार
दिला. काय झालय ते विचारलं.
तेजोयमीनं दालनातील कपाटांकडे बाप्पांचे लक्ष
वेधलं.
बाप्पांनी दालनाकडे बघितले.ते सुध्दा
आश्चर्यचकित झाले. त्यांना धक्का बसला. कारण ती सगळी कपाटं खाली
होती...वेगवेगळया प्रकारचे किमान ५०० हून अधिक पक्षी तिथे होते. ते सर्व गायब झाले
होते.क्षणभर बाप्पांनाही काही सुचेना.थोड्यावेळ्यापूर्वी समुद्रात चोर आणि
अतिरेक्यांविषयी व्हेल बोलत असल्याचं त्यांना आठवलं. तेजोमयीला घेऊन ते पटकन मागे
वळले आणि व्हेल जवळ आले.
बाप्पा आणि तेजोमयी असे भेदरल्यासारखे पुन्हा आपल्याकडे
आल्याचं बघून व्हेल आश्चर्यचकित झाला.
बाप्पांनी त्याला खाली आणलं.
काय हो बाप्पा काय घडलं?व्हेलनं विचारलं.
बाप्पा आणि तेजोमयी काहीच बोलले नाहीत.ते सरळ
पहिल्या दालनाकडे चालू लागले. व्हेल त्यांच्यापाठिमागे निघाला. पहिल्या दालनात
आल्यावर बाप्पांनी त्याला रिकामे कपाट दाखवलं.
ती रिकामी कपाटं बघून व्हेल काय समजायचा ते
समजला.
याचा अर्थ,बाप्पा, इथे चोर येऊन गेले. त्यांनी हे सगळे पक्षी लंपास केले. थोड्यावेळापूर्वी
समुद्रावरुन इथे परतताना मी काही माणसं पोत्यासारख्या पिशव्या खांद्यावर टाकून
दबक्या पावलानं बाहेर जाताना मी बघितलं.
त्यांचच हे कार्य असलं पाहिजे.तेजोमयी
म्हणाली.
अगदी बरोबर त्यांचंच हे कार्य असलं पाहिजे. बाप्पाही
तसच म्हणाले..
आता काहीतरी हालचाल करायला हवी बाप्पा .नाहीतर
ते सर्व पक्षी मोठ्या संकटात सापडतील .असं बोलून व्हेलने हुंदका दिला.
000
बाप्पांनी त्याच्या पाठीवरुन हात फिरवून
त्याला दिलासा दिला.तेजोमयीनं सुध्दा त्याच्या पाठिवरुन हात फिरवला.
बाप्पा आता काय करायचं आपण?
ते चोर कुठे गेले ते आपण आधी बघू या.
कसे बघणार?
ते या व्हेलच्या डोळयात.
ते कसं काय?
त्याने या चोरांना बघितलं आहे.त्याच्या
प्रतिमा अजून याच्या मेंदूत असतील.त्या प्रतिमेवरुन ते चोर कुठे जात आहेत याचा
मागोवा मी घेतो.बाप्पांनी सांगितलं.
बाप्पांनी व्हेलला त्याचे डोळे पूर्ण उघडायला
सांगितलं.त्यांनी व्हेलच्या डोळयांकडे बघत मंत्र पुटपुटला.त्याच्या डोळयात
तेजोमयीला बघायला सांगितलं.ते ही बघू लागले..वस्तुसंग्रहालयातून पक्ष्यांची चोरी
करुन एक नव्हे सहा सात चोर समुद्राकडे निघाले होते.
या चोरांना इथून बाहेर काढण्यासाठी एखादे जहाज
नक्कीच तयार असेल.तिथे हे चोर पोहचले की हे जहाज वेगानं निघेल व कुठे तरी अज्ञात
स्थळी निघून जाईल.बाप्पा म्हणाले.
त्याआधी आपण तिथे पोहचलं पाहिजे.व्हेल
म्हणाला.
पण आपण तिघे पोहचून काही उपयोग होणार नाही.
कां बरं?
कारण या चोरांची मोठी टोळी दिसते.जहाजात बरेच
लोक राहू शकतात.त्यांच्याकडे शस्त्रे,बंदुका
असू शकतात.बाप्पा म्हणाले.
मग आता काय करायचं?तेजोमयीने विचारलं.
काय करायचं?काय
करायचं? ..बाप्पा सुध्दा काही क्षण विचारमग्न झाले.
०००
वस्तुसंग्रहालयातील चोरी गेलेल्या पक्ष्यांना
कसं वाचवायचं याचा विचार करण्यात बाप्पांचे काही सेकंद गेले.त्यांना उपाय
सापडला.तेजोमयी आणि व्हेलला त्याच दालनात थांबायला सांगून ते आतल्या दालनात
गेले.काही मिनिटांनी बाहेर आले.
बाप्पा,तुम्ही
आत कशासाठी गेला होतात?तेजोमयीने विचारलं..
ते तुला नंतर कळेलच.बाप्पा म्हणाले.तेजोमयीची
आणि व्हेलची उत्सुकता ताणली गेली.बाप्पांची सांगण्याची इच्छा दिसत नाही हे
बघितल्यावर व्हेल चूप बसला.
बाप्पांनी व्हेलला वस्तुसंग्रहालयाच्या बाहेर
काढले.दोघेही त्याच्यावर बसले.व्हेल समुद्राच्या दिशेने उडू लागला.काही क्षणात
व्हेल गेट वे ऑफ इंडियाजवळ पोहचला.बाप्पांनी त्याला गेट वे ऑफ इंडियाच्यावर
उतरायला सांगितलं.तिथे कुणाचच लक्ष गेलं नसतं.तिथून जहाजावरील संशयास्पद हालचाली
टिपणं सहज शक्य होतं.
व्हेल,गेटवे
ऑफ इंडियाच्या वरील भागावर उतरला.बाप्पा व तेजोयमी त्याच्या अंगावरुन खाली
उतरले.बाप्पा,तेजोमयी आणि व्हेल काळजीपूर्वक समुद्रातील
जहाजांकडे बघू लागले. व्हेलचं लक्ष एका जहाजाकडे गेलं.त्याने वस्तुसंग्रहालाच्या
बाहेर पडताना बघितलेला एक चोर बरोबर हेरला.त्याने बाप्पांना तो दाखवला.
शाबास!बाप्पा
उदगारले.ते आणि तेजोमयी व्हेलच्या पाठिवर बसले.चोर शिरत असणाऱ्या त्या जहाजाकडे
छलांग मारायला व्हेलला बाप्पांनी सांगितलं.
व्हेलची छलांग अगदी अचूक होती.अलगद ते तिघेही
त्या जहाजावर आले.
त्या तिघांना बघून जहाजावर गोंधळ उडाला.व्हेलचे
ते धूड बघून काहीजण घाबरलेसुध्दा. काही जणांनी बंदुका रोखल्या.
कोण रे तुम्ही?कुणीतरी
जाड्या भरड्या आवाजात बोललं.
बॉस कुछ तो गडबड है!
मारुन टाका यांना...
असं कुणी तरी म्हणताच बाप्पा खो खो खो हसायला लागले.ते
हसताहेत हे बघून तेजोमयीही हसायला लागली.
बॉस,आपल्याला
बेवकूफ बनविण्यासाठी हे हसताहेत.उडवा यांना लगेच.नाही तर आपण अडचणित येऊ..त्या
टोळीतील एक जण म्हणाला.
एका भीतीदायक माणसानं रिवाल्वर तेजोमयीच्या डोक्याला
लावलं..तो रिव्हॉल्वरचा चाप ओढणार तोच बाप्पांनी त्यांच्या गळातल्या हार शिताफीनं
काढला.त्याला तोडला.त्यामुळे फुलं बाहेर पडली.बाप्पांनी त्यांच्यावर फुंकर
मारली.आश्चर्य घडलं.त्यातून साप बाहेर पडले.त्या भयंकर सापांना बघून चोर टोळी
घाबरुन गेली.सापांनी प्रत्येकाला वेढा दिला. तेजोयमीच्या डोक्याला रिवाल्वर
लावलेल्या चोराला व्हायपर सापानं दंश केला.तो त्याक्षणी खाली कोसळला.बघता बघता चोर
टोळीला सापांनी जायबंदी केलं.
हे बघून व्हेलच्या डोळयात आंनदाश्रू वाहू
लागले.
काळजी करु नकोस.आता सर्व पक्षी सुरक्षित राहतील.बाप्पा
म्हणाले.
बाप्पांनी तेजोमयीला मोबाईल वरुन १०० नंबर
फिरवायला सांगितला.तिने तसं केलं.पोलिसांना माहिती दिली.बाप्पा आणि तेजोमयी तत्काळ
व्हेलच्या पाठिवर बसले.बाप्पांनी त्याला पुन्हा गेट वे ऑफ इंडियाच्यावर जायला
सांगितलं.व्हेल त्या दोघांना घेऊन उडाला
नि गेट वे ऑफ इंडियाच्यावर आला.
00
थोडयाच वेळात तिथे पोलीस आले.त्यांनी ताबडतोब
जहाजाकडे कूच केले.पोलीस जहाजावर पोहचण्याआधी बाप्पांनी सर्व सापांना पुन्हा हारात
रुपांतर केले.तो हार अलगद त्यांच्याकडे आला.पोलीस जहाजावर पोहचले तेव्हा चोर
टोळीतील बहुतेकजण बेशुध्द पडले होते.पोलीसांनी सर्वांना त्याब्यात घेतले.त्यांनी
जहाजाची कसून तपासणी केली.त्यात त्यांना वस्तुसंग्रहालायातील चोरलेले पक्षी
मिळाले.तेही त्यांनी ताब्यात घेतले.
व्हेल आणि तेजोयमीनं सुटकेचा नि:श्वास
टाकला.पोलिसांनी चोर टोळीच्या हातात बेडया टाकल्या.त्यांना पोलीस गाडीत टाकले आणि
त्यांना घेऊन ते निघून गेले.
चला आपलं काम झालं,आपणही जाऊया
आता.बाप्पा म्हणाले.
पण बाप्पा,ते
पक्षी?व्हेल काळजीच्या सुरात म्हणाला.
ते उद्या वस्तुसंग्रहलयात परत येतील.
कसं काय?तेजोमयीने
विचारलं.
उद्या या चोरांची कसून चौकशी होतील.त्यातून हे
पक्षी कुठून चोरले हे पोलिसांना कळेल.ते मग वस्तुसंग्रहालयात आणून देतील या
पक्ष्यांना.बाप्पा म्हणाले.
व्हेलने सुटकेचा नि:श्वास टाकला.
बाप्पा एक विचारायचं होतं.सर्व सापांना तुम्ही
आणलात तरी कुठून?तेजोमयीनं विचारलं..
अगं मी तुम्हा दोघांना पक्ष्यांच्या दालनात
सोडून आत सापांच्या दालनात गेलो.त्यांना सारं काही सांगितलं.ते पक्ष्यांच्या
सुटकेसाठी येण्याला तयार झाले.त्यांना असं सोबत घेणं धोकादायक असल्यानं त्यांचा
हार केला नि इकडे आलो.आता परत वस्तुसंग्रहालयात गेलो की या हाराचं साप करणार नि ते
त्यांच्या दालनात आराम करणार.बाप्पांनी सांगितलं.व्हेल त्यांच्याकडे कौतुकाने बघू
लागला.
000
व्हेलसोबत तेजोमयी आणि बाप्पा वस्तुसंग्रहालयात
आले.बाप्पांनी व्हेलला त्याच्या दालनात त्याच्या जागेवर ठेवलं.हाराचे पुन्हा साप
केले.यांच्या दालनात त्यांना ठेवले.सर्वांचा निरोप घेऊन ते घरी परतले.
000
दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरमध्ये
वस्तुसंग्रहालयातल्या पक्षी चोरीची बातमी आली होती.बाबा ही बातमी आईला वाचून दाखवत
होते.
बाबांचा पेपर वाचून झाल्यावर तेजोमयीनं पेपर
वाचायला घेतला.
पक्षी चोरणाऱ्या मोठ्या टोळीला पोलीसांनी
पकडलं होतं.या पक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारात फार मोठी किंमत मिळणार होती.दुर्मिळ
पक्ष्यांची चोरी करणारी टोळीच जगात कार्यरत आहे.त्यातली एक टोळी पकडली गेली होती.
ही टोळी पकडण्यासाठी आपलाही खारीचा वाटा
असल्यानं ही बातमी वाचून तेजोमयीचा उर अभिमानानं भरुन आला.तिने बाप्पांनाही पेपर
दाखवला.
बाप्पाचं तिने अभिनंदन केलं.
खरं कौतुक त्या व्हेलच केलं पाहिजे.
ते कां बरं बाप्पा?
अगं,वस्तुसंग्रहालातून
बाहेर पडणाऱ्या त्या चोरांच्या संशयास्पद हालचालींना त्याच्या बरोबर लक्षात आलं.त्याने
त्या लक्षात ठेवल्या.म्हणून पुढचं काम सोपं झालं.बरोबर की नाही!
अगदी बरोबर.
आपल्या या शहरात प्रत्येकानच असं कायम जागरुक
राहिलं पाहिजे.कुठे काही संयशास्पद हालचाली दिसल्या की त्या लक्षात ठेवल्या
पाहिजे.पोलिसांना लगेच कळवलं पाहिजे.ते शक्य नसेल तर आपल्या आईवडिलांना सांगितलं
पाहिजे.शिक्षकांना सांगितलं पाहिजे.त्यामुळे बऱ्याच दुर्घटना टळू शकतात. असं जर
केलं तर पोलिसांचं कामही सोप होईल..आपण अधिक सुरक्षितही राहू.
तेजोयमीला बाप्पांच सांगणं पटलं.आपल्या कॉलनीत
तिने पोलीस मित्र टोळी करण्याचा संकल्प सोडलाय.
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment