गर्वाचे घर खाली
गर्वाचे घर खाली
एका कुंभाराकडे एक घोडा आणि एक गाढव होतं.
घोड्याचा उपयोग हा कुंभार जाण्या-येण्यासाठी करायचा. गाढवाचा उपयोग ओझे
वाहण्यासाठी. घोड्यावरुन जाणं-येणं होत असल्याने त्याची विशेष सरबराई केली जाई.
त्याला वेगळं खाऊ-पिऊ घातलं जात असे.
सकाळी-सकाळी कुंभार आधी त्याच्याकडे येऊन त्याची
पाठ थोपटायचा. पाठीवरुन हात फिरवायचा. मात्र तो गाढवाकडे ढुंकूनही बघत नसे.
यामुळे आपणच कुंभाराचे आवडते म्हणजे विशेष
असल्याचा गर्व घोड्याला झाला. तो गाढवाशी तुच्छतेने वागू लागला. कुंभाराच्या
घरातील कुत्रे, म्हैस, गाय यांच्याशीही तो तुसडेपणाने वागू लागला. आपण सर्वश्रेष्ठ
असल्याचा दर्प त्यांच्या वागणुकीतून दिसून येऊ लागला..
हा घोडा गाढवाला सतत हिणवत राहायचा. गाढव बिचारा
त्यावर काही उत्तर देत नसे. तो निपूटपणे आपलं काम करत राही. कुंभार त्याच्याकडे
सकाळी कधीच लक्ष देत नसला तरी रात्री मात्र गाढवाच्या पाठीवरुन हात फिरवूनच
झोपायला जायचा, हे काही घोड्याला ठाऊक नव्हते.
आपण सर्वश्रेष्ठ असल्याचा दर्प झालेला घोडा
कधीकधी कुंभाराशीही आढ्यतेने वागायचा. मात्र त्याच्यावरुन जाणं येणं करावं लागत
असल्यानं कुंभार त्याच्या अशा वागण्याकडे दुर्लक्ष करायचा.
तू कुंभाराशी असं वागू नकोस,एखादे दिवशी याचा
फटका तुलाच बसायचा, असं गाढवाने एक-दोनदा त्याला समजावून सांगितलं. पण गाढवाकडे
तुच्छतेने बघून त्याचं हे सांगणं घोड्याने या कानानं ऐकले नि त्या कानानं सोडून
दिलं..
घोडा आपलं काही ऐकत नाही हे बघून गाढवानं, नंतर-नंतर
त्याला समजावणं सोडून दिलं.
एकदा प्रवासात असताना घोड्याचा पाय मुरगळला.
त्यामुळे त्याला नीट धावता येईना की चालता येईना. त्याने कुंभाराला कसंबसं घरी
पोहचवलं आणि धाडदिशी खाली बसला. त्याला असह्य वेदना होत होत्या. कुंभाराने तिकडे
लक्ष सुध्दा दिलं नाही.
घरातील एका नोकराने खाण्याचं त्याच्यासमोर आणून
ठेवलं. मात्र घोड्यास खायची इच्छाच होत नव्हती. तो तसाच वेदनेनं कण्हत रात्रभर
उपाशी राहिला.
गाढवाने त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला पण
इतकं सारं घडूनही घोड्याच्या मनातला, आपणच सर्वश्रेष्ठ हा दर्प काही गेला नव्हता.
त्यामुळे त्याने गाढवाकडे दुर्लक्ष करुन तुच्छतेनं बघितलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी कुंभार घराबाहेर पडला.
जाताना त्याने घोड्याकडे बघितलेही नाही त्याच्या पाठीवरुन हाथही फिरवला नाही. हे
बघून घोड्याला खूप दु:ख झालें. मुरगळलेल्या पायाचं दुखण आणखीच वाढलं होतं.
काही वेळानंतर कुंभार एका व्यक्तीसोबत घरी परत
आला. त्याच्यासोबत एक नवा उमदा घोडा होता. घरी आल्या-आल्या कुंभाराने जुन्या
घोड्याला नव्या घोड्यासोबत आलेल्या माणसाच्या ताब्यात दिले.
घोड्याच्याने उठवेना तेव्हा त्या व्यक्तिने
त्याच्या पाठीवर जोरदार चाबूक हाणला. पायाच्या वेदनेत या माराने आणखी भर घातली.
घोडा कसातरी उभे राहिला.
नव्या मालकाने घोड्याच्या गळ्यात दोरी टाकून
त्याला ओढतच घराबाहेर काढले..तो पुन्हा पुन्हा कुंभाराकडे बघत होता. मला असं पाठवू
नका...पाठवू नका..असे भाव त्याच्या डोळयात होते.. पण कुंभाराने अजिबात तिकडे लक्ष
दिलं नाही..जाता जाता घोड्याचं लक्ष गाढवाकडे गेलं..
गाढवाने कुंभाराकडे बघून, घोड्याला असं जाऊ देऊ
नका, त्याने आपली खूप सेवा केली असं सांगण्याचा प्रयत्न केला..
कुंभार गाढवाकडे येउुन म्हणाला..अरे
गाढवोबा..कशाला त्या गर्विष्ठ घोड्यासाठी शब्द टाकतोस. त्याला फार घमेंड झालीय,
माझ्याशी सुध्दा आढ्यातखोरपणे वागतो बरेचदा.. नम्रपणे राहिला असता...तुझ्या सारखं
आपलं काम बरं, असं वागला असता, कुणालाही तुच्छ समजला नसता तर त्याला मी त्याला
नक्कीच विकला नसता....
कुंभार म्हणाला ते खरचं होतं.. घोड्याने स्वत:च्या हाताने पायावर
कुऱ्हाड मारुन घेतली होती.. गाढव मनात म्हणाला... आपल्यामध्ये असे कोणतेच दुर्गुण
नाही याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर उमटलं.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment