वजनाचा धोंडा आणि फुकण्याचा कोंडा
वजनाचा धोंडा आणि फुकण्याचा कोंडा
एकदा एका घोड्यास दोन पिल्लं झाली.दोन्ही छान गुटगुटीत बाळं होती. त्यातला
एक पांढरा शुभ्र होता तर दुसऱ्याचा रंग काळा. पांढरा घोडा दिसायला देखणा
होता.त्याची चाल ऐटदार होती.काळा घोड्याचं मात्र तसं नव्हतं.त्याच्या पायातही
जन्मापासून किंचित व्यंग होतं.त्यामुळे तो थोडासा लंगडा चालायचा.
त्याच्या देखपणामुळे आणि एैटदार चालीमुळे पांढरा घोडा आईचा लाडका
झाला.निस्तेज दिसणाऱ्या काळ्या घोड्याकडे मात्र तिचे दुर्लक्ष होऊ लागले.ती
पांढऱ्या घोड्याला चांगलं खाऊ पिऊ घालायची.उरलं सुरलं,काळ्याला द्यायची.काळा घोडा
मात्र काही तक्रार करायचा नाही.दिलं ते खाऊन घ्यायचा. आईच्या लाडाने पांढरा मात्र
ऐदी झाला. त्याला कामाचा कंटाळा येऊ लागला. मस्त खा प्या. इकडे तिकडे ऐटित फिरुन
या आणि छान झोपा काढा. असा त्याचा दिनक्रम होता.त्यामुळे घरातली सगळी कामं, काळ्यालाच
करावी लागत असे. तो सुध्दा विनातक्रार सगळी कामे करत असे.
हळूहळू आळशी होत चाललेल्या पांढऱ्यावरचं आईचं प्रेम काही कमी होत
नव्हतं. ती त्याच्या आळसाकडे, झोपेकडे दुर्लक्षच करायची. पांढऱ्याला चांगलं चुंगलं
खायला प्यायला मिळाल्याने तो चांगलाच धष्टपुष्ट झाला. काळयाला मात्र उरलं सुरलं, शिळ
पाकं मिळायचं. कधी कधी तेही नाही मिळायचं.
त्यामुळे तो अंगात फार भरला नाही. पांढऱ्याच्या तुलनेत तो अशक्तच वाटायचा. काळ्यावर
सगळया कामांची जबाबदारी पडल्याने तो हळूहळू सगळया कामात तरबेज झाला. सतत कामात
राहिल्याने त्याचं शरीर चपळ झालं. पायात दुखणं असूनही, त्याला आता या दुखण्याला
सहन करण्याची शक्ती मिळाली . त्यामुळे तो चांगला धावू शके.
एकदा घोड्यांच्या महाराजांनी विशेष दरबार भरवला. दरबाराचं प्रयोजन
होतं, नवा राजाची निवड . कारण त्यांना मुलबाळ नव्हतं. त्यामुळे त्यांनी घोषणा
केली, ज्यांचा घोडा त्यांना आवडेल आणि त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण होईल त्याला ते
राजा करतील.
पांढऱ्याच्या आईस फार आनंद झाला. पांढऱ्यासारखा देखणा, ऐटीत चालणारा
घोडा तिच्या तरी पाहण्यात नव्हता. त्यामुळे आपला लेकच पुढचा राजा होणार, याचं
स्वप्न्ा तिला दिवसाढवळया पडू लागलं.
महाराजांनी परीक्षेचा जो दिवस मुक्रर केला होता. त्या दिवशी पांढऱ्याची
आई त्याला घेऊन महालाकडे निघाली. मी आलो तर चालेल का गं आई,काळयाने भीत भीत
विचारलं.
तुझं तिथे काय काम रे काळुंद्र्या, तू घरीच राहा. खूप कामं करायची
राहिली आहे. पांढरा तुच्छतेने म्हणाला.
अरे, येऊ दे रे त्याला. तुला राजा बनलेला पाहण्याचं भाग्य त्यालाही
मिळू दे की! आई पांढऱ्याला
म्हणाली. तिने काळ्याला महालात येण्याची परवानगी दिली. तो या दोघांच्या पाठिमागे
चालू लागला. आपला भाऊ राजा होणार याचा त्याला आनंद झाला होता.
तिघेही महालात पोहचले.महालात इतरही घोडे त्यांच्या मुलांना घेऊन आले
होते.त्या सर्वांत देखणा पांढराच होता.हे बघून आईस अत्यानंद झाला.महाराज
पांढऱ्यासच पुढचा राजा घोषित करतील याची तिला खात्री पटली.
थोड्या वेळाने महाराज दरबारात आले.त्यांनी सर्वांचे स्वागत
केले.पांढऱ्याने त्यांचेही लक्ष वेधून घेतले होते.हा देखणा घोडाच पुढचा राजा झाला
तर बरं असंही त्यांना वाटलं.पण छे छे आपण सर्वांना संधी देण्याची घोषणा केली
आहे.परीक्षा घेणार आहोत.जो कुणी यात उत्तीर्ण होईल तोच पुढचा राजा.ते मनात
म्हणाले.पांढऱ्यावरची नजर काढत, सर्वांना उद्देशून त्यांनी स्पर्धा कशासाठी,स्पर्धेचे
नियम समजावून सांगितले. प्रत्येकास भाग घेण्याची संधी असल्याचे त्यांनी जाहीर
केले.सर्वांनी महाराजांचा जयजयकार केला.
स्पर्धेसाठी नाव नोदंणी झाली.काळा सोडून सर्वांनी नाव नोंदवलं.महाराजांच्या
ते लक्षात आलं.त्यांनी काळ्याच्या आईला बोलावून ,त्याचं कारण विचारलं. तेव्हा,आई
म्हणाली, महाराज,हा काळा अशक्त आहे,पायाने किंचित लंगडतो आणि दिसायलाही असातसाच
आहेना, म्हणून त्याचं नावं नाही नोंदवलं स्पर्धेसाठी.
महाराज हसले.स्पर्धा सुरु झाली.पांढऱ्याने कशाबशा एक दोन फेऱ्या
जिंकल्या.प्रत्येक फेरीनंतर त्याला दम लागायचा. नावाचाच देखणा पण बिनकामाचा दिसतो
हा पांढरा.महाराज मनात म्हणाले.पांढऱ्याची आई त्याला प्रोत्साहन देत होती.काळाही
त्याला प्रोत्साहित करत होता.पण पांढऱ्याकडून काही पुढच्या फेरीत यश मिळवण शक्यं
होत नव्हतं. काही फेऱ्यानंतर तर त्याने आपण स्पर्धेतील पुढच्या फेऱ्यांमध्ये भागच
घेणार नाही असं सागितलं आणि दूर बाजूला
जाऊन झोपी गेला.
आईने त्याला उठवायचा प्रयत्न केला. राजा होण्यासाठी कशाला घ्यायचे
इतके कष्टं. झोप महत्वाची असं मनात म्हणून त्याने डोळे काही उघडले नाही.
आई, दादाच्या जागावर मी भाग घेऊ का?काळ्याने भीतभीत विचारलं. आईने त्याच्याकडे बघितलं
सुध्दा नाही. तेव्हा तो महाराजांकडे गेला.त्यांची परवानगी मागितली. महाराजांनी
त्याला स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी दिली.
हा अशक्त दिसणारा, पायाने लंगडा,काही जिंकणार नाही,असं महाराजांना
सुध्दा वाटलं.
महाराजांनी परवानगी दिल्याने काळा,स्पर्धेत सहभागी झाला.त्याला सर्व
प्रकारची कामं करण्याची सवय असल्याने तो चपळ होता.काटक होता.त्याला वेगानं धावताही
येत होते.या सर्व गुणांचा फायदा त्याला होऊ लागला.प्रत्येक फेरित तो इतरांच्या
सर्वात समोर राहू लागला.महाराज,जमलेले इतर घोडे आणि काळ्याची आईही थक्क झाली.
आता शेवटची फेरी.या फेरित जंगालातील या टोकापासून ते त्या टोकापर्यंत
जो सर्वात वेगाने धावून परत येईल,तो विजेता ठरेल असं महाराजांनी जाहीर केले.
जमेल ना रे तुला तुझ्या दुखऱ्या पायांमुळे, महाराजांनी काळ्यास
विचारलं. त्याने हसून मान हलवली.
अरे पण,तुझं दुखणं वाढलं तर,आयुष्यात तुला चालता येणार नाही,बसून
राहावं लागेल एकाच जागी.तू बाबा काही धावू-बिवू नकोस.मला भीती वाटते.आई काळ्यास
म्हणाली.
आई तू अजिबात काळजी करु नको,मला काहीही होणार नाही.काळ्याने तिला
समजावलं. आणि त्याने इतरांसोबत धावायला सुरुवात केली.वेगवेगळया कामानिमित्त त्याला
सतत जंगलात जावं लागत असल्यानं ते त्याच्या चांगल्या परिचयाचं होतं.त्याला पायवाटा
चांगल्या पाठ झाल्या होत्या. त्यामुळे थोड्या दूर गेल्यावर त्याने या पायावटा
पकडल्या आणि लवकरच जंगलाचं शेवटचं टोक गाठलं. आपल्यावर महाराजांनी व इतरांनी
विश्वास ठेवायला हवा म्हणून त्याने त्या ठिकाणी असलेल्या तलावातील एक कमळ तोडले
आणि तो पुन्हा भरधावर परत निघाला. लवकरच महालात पोहचला. त्याच्या कितीतरी पाठीमागे
इतर घोडे होते. तो महाराजांवळ पोहचला आणि त्याने महाराजांच्या पायावर कमळ ठेवलं. हे
कमळ फक्त जंगलाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तलावातच मिळते हे महाराजांना ठाऊक
होतं. त्यामुळे त्यांचे डोळे आंनदाने लुकलुकले,डोळयातून अश्रूही वाहू
लागले.त्यांनी काळ्याच्या आईला जवळ बोलावून घेतले.
बघा बघा ज्या पांढऱ्या मुलावर तुमचा विश्वास होता आणि त्याचे देखणेपण
बघून आम्हासही वाटलं होतं की, तोच राजा होण्याचा पात्रतेचा,पण त्याची अवस्था तर
वजनाचा धोंडा आणि फुकण्याचा कोंडा, अशी म्हणजे फारच बिनकामाचा अशी झालीय.ज्याच्यावर
तुमचा विश्वास नव्हता तो तुमचा अशक्त आणि दुखऱ्या पायाचा मुलगा मात्र अशक्त दिसत
असला तरी मनानं दणकट आहे तो फोफसा नाही,त्याच्याकडे शक्ती आणि युक्ती दोन्हीही आहेत.म्हणून तोच राजा बनण्याच्या पात्रतेचा
आहे.
काळ्याच्या आईला आनंद होत होता पण त्याच्याकडे बघण्याची हिम्मत होत
नव्हती.आपण आपल्या मुलावर फार अन्याय केल्याची जाणीव होऊन ती धाय मोकलून रडू
लागली.इकडे महाराजांनी काळ्याला पुढचा राजा म्हणून घोषित केला.तिकडे पांढऱ्याला आणखी
गाढ झोप लागली. आपणच राजा झाल्याचं स्वप्न या गाढ झोपेत त्याला पडल्याने , तो झोपेतच
खिदळू लागला.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment