शोधता शोधता गंमत घडली
शोधता शोधता गंमत घडली
हॅरी पॉटरसारखी
जादू आपल्याला शिकायला मिळाली तरी काय गम्मत येईल असं
टिल्लू-मिंकू-वैष्णव-कल्याणी- तेजोमयी आणि टोळीला सारखं वाटायचं. हॅरी ज्या जादूच्या शाळेत शिकतो त्या शाळेत
आपल्याला शिकायला मिळालं तर आपण हॅरी द ग्रेट सारखंच ग्रेट बनू असही त्यांना
वाटायचं. हॅरीच्या जादूच्या शाळेत नेणारी गाडी पावने दहा क्रमांकाच्या
प्लॅटफॉर्मवरुन जात असल्याचं त्यांना हॅरीचं पुस्तकं वाचून वाचून माहीत होतं.
या टोळीने एके दिवशी
त्यांच्या कॉलनीतील हनुमान मंदिरात हनुमानाच्या साक्षिने असा प्लॅटफॉर्म मुंबईत शोधून
काढण्याचा निर्णय घेतला. कोणतही सामूहिक काम करण्याआधी ही टोळी या हनुमानाला आपला
बेत समजावत आणि काम फत्ते झाल्यास अमूक करु.. ढमूक करु.. नारळं फोडू असं त्याला
प्रॉमिस करत. एखादं काम फत्ते झाले की मग खाऊच्या पैशातून नारळही फोडत असत.
प्लॅटफॉर्म नंबर पावणे दहा सापडला तर तुला
लाडू सम्राटमधील बुंदीचे लाडू देईन, टिल्लू हनुमानाच्या
मूर्तीकडे बघत म्हणाला. टोळीतील सर्वांची यास मान्यता होती. हनुमानाला प्रॉमिस
केल्यावर त्याला मनोभावे नमस्कार करुन टोळी मोहिमेवर निघाली.
टोळीतील प्रत्येकजण मग तो टिल्लू असो की
तेजोमयी,
किंवा वैष्णव वा कल्याणी हे चौघेही उनाडक्या करण्यात पटाईत असले तरी
अभ्यासातही आघाडीवर राहत असल्याने त्यांच्या आईबाबांनाकडून त्यांना बऱ्यापैकी
स्वातंत्र्य मिळायचं. खेळायला जातो, मत्स्यालयात जातो,
नेहरु सेंटरला जाते असं काहीसं सांगून ही टोळी पावने दहा
प्लॅटफार्मच्या शोध घेण्यासाठी बाहेर पडू लागली. पावने दहा प्लॅटफार्मचा त्यांचा
शोध हा बांद्रा स्टेशन पासून सुरु झाला. सुटीच्या दिवशी हा शोध ते सुरु ठेवत.
या टोळीने मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर लाईनवरील लहान मोठी 36 रेल्वे
स्थानके प्लॅटफॉर्म क्रमांक पावणे दहाच्या शोधासाठी पालथी घातली. बरोबर पावणे दहा
दिवस ही टोळी या स्टेशनवरुन त्या स्टेशनवर जात होती. पण हा प्लॅटफॉर्म त्यांना
कुठेच दिसत नव्हता.
पावने दहाव्या दिवशी ही टोळी महालक्ष्मी
रेल्वेस्थानकावर पावने दहा प्लॅटफार्म कुठे दिसतो का यासाठी बारकाईने पाहणी करत
होती. ही पाहणी करता करता तेजोमयीचं लक्ष पश्चिमेकडच्या एका मोकळ्या जागेकडे गेले.
तिचा विश्वासच बसेना. तिने त्या दिशेनं टिल्लू, कल्याणी, वैष्वणला बघायला सांगितलं. पण कुणालाच काही दिसलं नाही.
बोर करु नकोस यार, कल्याणी म्हणाली.
शक्यच नाही, वैष्ण्वने
प्रतिक्रिया नोंदवली.
तुलाच कसं गं दिसलं. मला कां नाही? टिल्लू चिडून म्हणाला. ही चर्चा सुरु असतानाच मुंबई सेंट्रल स्टेशनकडे
जाणारी दिल्लीवरुन येणारी राजधानी एक्सप्रेस धाडधाड करत प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा
टोळी जरा प्लॅटफॉर्मपासून दूर झाली. काही सेकंदात ही एक्सप्रेस निघून गेली.
टिल्लूने इकडे तिकडे बघितले.तर तेजोमयी गायप.
अरे कुठे गेली ही बया...वैष्णव म्हणाला.
भलतीच बाई वेंधळी, कल्याणीने प्रतिक्रिया दिली.
वेंधळी नाही. ती मघा सांगत होती ते खरं
वाटायला लागलं आहे. टिल्लू म्हणाला.
निव्वळ मूर्खपणा.
तेजोमयी म्हणजे हॅरी नव्हे. कल्याणी म्हणाली.
पण बॉस, तिला तो दिसला
होता. आपल्याला नाही. हेही खरच नाही काय? वैष्णव म्हणाला.
याचा अर्थ तेजोमयी आपल्यातली नाही. ती
त्यांच्यातील समजायची का?
कोण असेल ती?ती नक्कीच
डंबलडोर सरांची पुतणी असणार. वैष्णव म्हणाला.
आय डोण्ट थिंक. ती इथेच कुठेतरी असणार.टिल्लू
मग ती दिसत कां नाही.
याचा अर्थ ती अदृष्य झाली.
असं फक्त हॅरी आणि त्याच्या मित्रांनाच शक्य
होतं .तेजोमयी काही अद्याप हॅरीची मैत्रीण झालेली नाही. वैष्वण म्हणाला.
टोळीला त्याचं म्हणनं पटलं.
000.
टिल्लू आणि टोळी विचारमग्न झाली. उभं राहून
पाय दुखू लागल्याने ते एका बाकावर बसले. कल्याणीने कुरकुऱ्यांचे दोन पॉकिट आणले.
ते खात खात टोळी पुन्हा विचारमग्न झाली.तेजोमयीला खरोखरच तो दिसला असेल का? पण कुणाचही डोकं चालेना. ही मुलं
बराच वेळची बसून निव्वळ काही तरी खलबतं करताहेत हे महालक्ष्मी स्टेशनच्या
सुरक्षेसाठी असलेल्या एका पोलीसाच्या लक्षात आलं,तेव्हा
त्याने टोळीला हटकले. आपल्या एका मैत्रिणीची वाट बघतोय असं टिल्लूने कसं बसं
सांगितलं. तेव्हा, बघा हं. खोटं बोललात तर गाठ माझ्याशी आहे.असं काहीसं बोलून तो निघून
गेला.
पावणे दहा वाजले होते.तेजोमयीचा पत्ता नव्हता.
टोळी रडकुंडीला आली. आता घरी आई बाबांना सांगणार काय? ते पावणे दहा प्लॅटफॉर्मच्या शोध घेत होते आणि आज हा शोध घेता घेता
तेजोमयीच हरवली होती.कल्याणीच्या डोळयापुढे काजवे चमकले तर वैष्णवच्या डोळयापुढे
तारे. टिल्लूच्या डोळयासमोर पोलीसवाला चमकला.आता आणखी काही काळ इथे थांबलो तर तो
आपल्याला पकडून घेऊन जाईल, असं त्याने टोळीच्या लक्षात आणलं.
आता घरी जाणंच श्रेयस्कर होतं.घरी गेल्यावर
आई-बाबांना सारं काही खरं खरं तत्काळ सांगणं आवश्यक होतं.तरच तेजोमयीचा शोध लागला
असता.तेजोमयी हरवली ही कल्पना कुणालाच सहन होत नव्हती..हनुमानाला आठवून तेजोमयीला
सुखरुप राहू दे असही प्रत्येकानं मनात त्याला सांगितलं.
बांद्र्याकडे जाणा-या लोकलमध्ये बसण्यासाठी
टोळी पुढच्या प्लॅटफॉर्मवर जायला निघाली तर तासाभरापूर्वी तेजोमयीने दाखवलेल्या
पश्चिमेकडील मोकळ्या जागेतून तेजोमयीच धावत येताना टिल्लूला दिसली. टोळी एकदम
थांबली. तेजोमयी धापा टाकतच त्यांच्याजवळ पोहचली. वैष्णवने तिला हात देऊन
प्लॅटफॉर्मवर घेतलं.तिचा चेहरा घामाने डबडबला होता.कपडयांवर धूळ बसली होती.केसं
धुरकट झाले होते.ही तेजोमयी की हरमायनी असा प्रश्न कल्याणीला पडला.तिने तेजोमयीला
बाकावर बसवले.
मग टोळीने प्रश्नांची सरबत्ती सुरु
केली.टिल्लू,कल्याणी आणि वैष्णवचा एकच प्रश्न होता.तो म्हणजे
तेजोमयी अचानक गेली कुठे आणि अचानक आली कुठून.
सांगते सांगते.जरा दम तर घेऊ द्या,असं तेजोमयी म्हणाली.प्लॅटफार्म नंबर पावने दहाचा शोध घेता घेता मला या
प्लॉटफार्मवर तो प्लॅटफार्म दिसला. मी
तुम्हाला दाखवलं सुध्दा.पण तुमचा विश्वास बसला नाही.तेवढयात धाडधाड करत
राजधानी गेली.ही संधी साधून मी तिकडे सटकले.
म्हणजे जादूच्या शाळेत.
वाव..
वाव नाही की टाव नाही.अरे तो आहे रेल्वेचा
लोकोशेड.म्हणजे तिथे रेल्वे इंजिन,डबे यांची दुरुस्ती
डागडुजी होते.जुने कपडे आणि पुस्तकांसारखे असंख्य डबे अस्ताव्यस्त पडले होते.भंगार
होते.वायर,तारा,डबे,इंजिन,अशी यंत्रसामग्री.खरं म्हणजे जादूच्या
साहित्यासारखंच वाटत होतं सारं काही.इथे कुठे तरी जादूची शाळा असेल अशी मला खात्री
होती.भिरभिर फिरत असताना एका इंजिनावर बसलेलं कुत्रं भुंकायला लागलं तशी मी घाबरुन
पळत सुटले तर तुम्ही दिसलात.तेजोमयीने एका दमात सांगून टाकलं.
पण तू तिथे गेली तरी कशी..टिल्लूने पुन्हा
विचारलं
प्लॉटफार्म नंबर पावणे पाच...मोकळया जागेकडे
बोट दाखवत तेजोमयी म्हणाली.
000
काय चाललय पोरांनोडुका आपटण्याचा जोरदार आवाज
आला आणि टोळीने समोर बघितले.मघाचा पोलीस त्यांच्या पुढयात उभा होता.टिल्लूने
प्रसंगावधान दाखवून तेजोमयीकडे बोट दाखवलं.
आली ना मैत्रिण निघा आता..पोलीस टोळीला
म्हणाला.
मोकळ्या जागेत तेजोमयीला कसा
काय प्लॉटफार्म क्रमांक पावणे पाच दिसला असेल याचा विचार करत करत टोळी बोरिवली
लोकल मध्ये बसली...
सुरेश
वांदिले

Comments
Post a Comment