उंच उंच झोका
उंच उंच झोका
उन्ह्याळ्यातच नव्हे तर कोणतीही
मोठी सुटी आली की,बरेचदा तेजोमयी आईसोबत आजोळी जात असे.हे आजोळ म्हणजे तिच्या
आईच्या बाबांचं घर. म्हणजे आईचं माहेर. त्याचवेळी तिची मावस बहीण कल्याणीही तिच्या
आईसोबत येत असे.
तेजोमयीला आजोबांचं घर खूप आवडायचं
कारण, त्यांच्या घरातल्या एक दोन खोल्यात आणि घरासमोरच्या बागेत मस्त झोपाळे होते.
त्यावर लटकून किंवा बसून उंच उंच झोका घ्यायला तिला फार आवडायचं.
प्रवासातून आल्याबरोबर सुध्दा घरात
शिरण्यापूर्वी ती बागेतल्या झोपाळयाकडे धावून आधी दोन तीन झोके घेऊनच मग आत जाई.
याच्या उलट कल्याणीचं होतं.तिला
अजिबातच झोपाळ्यावर बसून झोका घ्यायला आवडत नसे.आपण उंचावरुन पडू अशी भीती तिला
वाटायची.
पण असं काही घडत नाही.हे
तेजोमयीनं, आजोबांनी,तिच्या आणि तेजोमयीच्या आईनं बरेचदा समजावून सांगितलं पण
कल्याणी काही झोपाळ्यावर बसायला तयार होईना.
नाही तर नाही.कशाला बिचारीला तिला
आग्रह करता?एखाद्याला
नसते आवड झुलण्याची.आजी कल्याणीची बाजू घेत म्हणाली.
अगं पण आज्जू, उंच उंच झोका
घेण्याचा आंनद कल्लूस घेता येत नाही ना! शिवाय आणखी एक गंमत आहेच की?तेजोमयी आजीला म्हणाली.
कोणती गं गम्मत? आजीनं विचारलं.
म्हणजे आज्जू तू झोपाळयावर बसून
उंच झोका घेतला नाहीस की काय? तेजोमयीनं विचारलं.
अगं, तुझ्या आजोबांनी बसू द्यायला
हवं की नाही? आजी
मिस्किलपणे म्हणाली.
काय हो आजोबा,तुम्ही आजीला कां
नाही बसू दिलं झोपाळयावर,तेजोमयीने आजोबांना विचारलं.
अगं तिचं काही ऐकून नकोस.भीत्रूबाई
आहे तुझी आजी!
पण आजोबा, तुम्ही तिला झोका उंच
उंच गेल्यावरची गंमत सांगितली नसणार ना!
अगं,मघापासून तू गंमत गंमत
म्हणतेस,ती कोणती हे तर सांगना?आई म्हणाली.
पण त्यासाठी उंच झोका घ्यावा
लागेल.तेजोमयी म्हणाली
नको बाबा,पूर्वी आम्ही दोघी झुलत
असू पण आता कुठे राहिली सवय,त्याची. पडलं झडलं तर?कल्याणीची आई म्हणाली.तेजोमयीच्या आईनेही
असाच सूर लावला.
मग तुम्हाला नाही कळणार गंमत कोणती
ती आणि मी सुध्दा सांगणार नाही. तेजोमयी म्हणाली.
बरं बाई नको सांगू.तू जर सांगितलं
नाही तर कल्याणीसुध्दा कशी काय झोपाळयावर बसून उंच उंच झोका घेईल बरं?आजी म्हणाली.
अगं आज्जे,तू इतका आग्रह करतेस तर
सांगूनच टाकते,अगं पहिल्यांदा झोका उंच गेला की हळूच एक परी येते आणि चॉकलेट देऊन
जाते.
आँ! सर्वांनी एका सुरात आश्चर्य व्यक्त केलं.
दुसऱ्यांदा असाच झोका वर गेला हळू
हळूच परीराणीची मैत्रिण येते नि आईसक्रीम देऊन जाते.
आँ.
तिसऱ्यांदा झोका वर गेला
की,परीराणची दुसरी मैत्रिण येते आणि
पिज्जा देऊन जाते,असंच ना...आजी
तेजोमयीचा गाल ओढत म्हणाली.
असं म्हंटल असतं गं आजी त्यांनी,पण
परीराणीस पिज्जा आवडत नाही ना!म्हणून पिज्जा देत नाही,तर पाणी पुरी देते.तेजोमयी हसत म्हणाली.
बस्स झाल्या हं तुझ्या थापा!आई तेजोमयीस रागावून
म्हणाली.
अगं या थापा नाही,खरय ते.मला सगळं
मिळतं.दररोज.मग मी आणि आजोबा वाटून खातो.हो ना हो आजोबा?
यावर आजोबा हसले.ते,हो ही म्हणाले
नाही आणि नाही सुध्दा म्हणाले नाही.
तू हा खाऊ त्यांना देण्याऐवजी
कल्लूस कां देत नाही?आजीनं विचारलं.
परीराणीनं सांगितलय तसं.जोपर्यंत
कल्लू उंच झोका घेत नाही तोपर्यंत तिला काही द्यायचं नाही.
पुन्हा थाप!आई रागावली.
अगं आई,खोटं असेल तर बसव कल्याणीस
झोपाळयावर आणि घे म्हणा उंच झोका.तेजोमयी म्हणाली.
नको! नको!
मग आईसक्रीम,पाणीपुरी तुला मिळायची
नाही. तेजोमयी ओठांवरुन जिभ फिरवत म्हणाली.कल्याणीच्या तोंडाला पाणी सुटलं.
अगं मी पडले तर?ती घाबरत म्हणाली.
परीराणी पडूच देत नाही.तिच्या
दोन्ही मैत्रिणी आपल्या आजूबाजूला असतात.समजा तोल गेला तर त्या अलगद हातात घेतात
आपल्याला.
हो का खरच!
हो हो. तू बसून तर बघ.
अखेर हो नाही करत,कल्याणी
झोपाळयावर बसली.
एक दोन झोके हळूवार घेतले.तिला
थोडी मजा वाटू लागली.मग तिने स्वत:हून वेग वाढवला.तिचा झोका उंच उंच जाऊ लागला.आता
उंचावर गेल्यावर परीराणी कधी येते नी पाणीपुरी आईसक्रीम देते असं तिला झालं.मात्र
चार पाच वेळा उंच झोका जाऊनही परीराणी काही आली नाही आणि तिने पाणीपुरी आईसक्रीम
दिला नाही.तेजो थाप मारते हे कल्ल्याणीच्या लक्षात आलं.तिने झोका घेणं थांबवलं.
तेजो तू थापा मारतेस.मावशी तू
म्हणतेस ते बरोबर आहे.
काय झालं गं?
अगं,मी पाच वेळं उंच जाऊनही परीराणी आली नाही.
आली होती...
मग मला कां दिसली नाही?
कारण तू डोळे मिटले होते. तेजोमयी
म्हणाली.
नाही नाही माझे डोळे उघडेच होते.कल्याणी
म्हणाली.
आजोबांना विचार बघू.
तिने मागे वळून बघितलं पण आजोबा
तिथे नव्हते.
आँ! आजोबा कुठे गेले?काय
गं आजी?आजीही इकडे तिकडे बघू लागली.
अहो,हे काय मी इथेच आहे.
दरवाज्याच्या बाहेरुन आवाज आला.आजोबा आत येत होते.त्यांच्या हातात आईसक्रीमचा
फॅमिली पॅक आणि पाणीपुरीचे पॅकेट होतं.
अगं बाई कुणीदिलं तुम्हाला?कल्याणीच्या आईनं
विचारलं.
कोण देणार?अगं परिराणीनं
दिलं.कल्लूचा उंच उंच झोका बघून ती खूप खुष झाली.तिने मला पाठिमागे बोलावून
घेतलं.हे दिलं.
पण तिने स्वत: इथे येऊन कल्याणीस
द्यायला होता ना हा खाउु.
बरोबर आहे.पण ती म्हणाली सलग पंधरा
दिवस कल्याणी उंच उंच झोका घेईल तेव्हाच मी तिला भेटेन आणि खाउु देईन.
आँ!
हाँ!
मग कल्लूताई आता पंधरा दिवस झोपाळ्यावर
उंच उंच झोका घेणार ना?आजोबांनी विचारलं.
झोपाळयावर बसण्याची भीती गेल्याने
कल्याणी आनंदाने हो म्हणाली.
त्यांना काहीही न सांगता,सारं काही
कळलं होतं म्हणून तेजोमयी आजोबांना थँक्यू म्हणाली आणि तिने त्यांना छानशी पप्पीही
दिली.
सुरेश वांदिले

Comments
Post a Comment