सर्वांचा सन्मान करा..


 


सर्वांचा सन्मान करा..

खूप वर्षांपूर्वी सध्याच्या सिंहमहाराजांच्या आजोबांच्या आजोबांची एका उंदरानं शिकाऱ्याच्या जाळ्यातून सुटका केली होती. तेव्हापासून सिंहमहाराजांची प्रत्येक पिढी उंदरांसोबत छान संबंध ठेऊन होती. प्रत्येक पिढीचा सिंहमहाराज त्यांच्या वारसांना एक धडा शिकवायचे की केवळ शक्ती असल्यानेच विजय मिळवता येतो असं नाही तर कधीकधी युक्तीच शक्तीपेक्षा श्रेष्ठ ठरते. सगळ्यांशी चांगलं वागायला हवं. कोण कधी आपल्या मदतीला धावून येईल हे सांगता येत नाही.

सिंहमहाराजांच्या प्रत्येक पिढीने ही शिकवण तंतोतंत अंगिकारली. सध्याचे सिंहमहाराज तर दोन पावलं समोर होते. ते उंदराचाच सन्मान करायचे असं नाही तर मुंगीसारख्या छोट्या जीवाचाही आदर करायचे. पण सिंह महाराजांचं हे असं वागणं पंतप्रधान वाघोबांना पटायचं नाही. महाराज असं प्रेमळपणे वागत राहिलात तर हा उंदऱ्या आणि ती मुंगीटली,ती खारुटली तुमच्या आमच्या डोक्यावर बसतील.

यावर महाराज हसत म्हणाले,

वाघोबाजी, अहो तो पिटुकला उंदिर नि चिटुकली मुंगी, इवलीशी खारुमावशी माझ्या डोक्यावर बसल्यानं माझी आयाळ गळून जाणार नाही की माझी मान वाकडी होणार नाही. तुमच्या झुपकेदार मिशांची शान कमी होणार नाही की तुमच्या जिभेवर फोडं येणार नाहीत.

वाघोबांना महाराजांचं बोलणं आवडलं नाही. त्यामुळे ते नाखुशी दर्शवत म्हणाले,

महाराज, तुमचं म्हणणं मला पटत नाही. अशा कमकुवतांना अशी ढील देणं बरोबर नाही. त्यांच्याशी कठोरपणे वागायला हवं.  असं जर वागलो नाही तर आपला दबदबा राहणार नाही. त्यांच्यावर आपला वचक राहणार नाही. जो तो आपल्या मर्जीचा राजा होईल, महाराज. असा गोंधळ राज्यासाठी चांगला नसतो. या गोंधळाचा लाभ घेऊन शेजारील गेंडाश्री महाराज  आपल्यावर आक्रमण करतील. वननगरी हकनाक त्यांच्या ताब्यात जाईल. वाघोबा, महाराजांना समजावून सांगू लागले.

अस्वल, कोल्हा, लांडगा या दरबाऱ्यांनी वाघोबांना पाठिंबा दर्शवला.

सिंह महाराजांनी वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा, अस्वलराव यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. आपल्या राज्यातील निरुपद्रवी छोट्या जीवांबद्दल त्यांची अशी मतं बघून महाराजांना वाईट वाटलं. आपल्या दरबाऱ्यांना स्वत:च्या शक्तीचा गर्व आणि अहंकार वाटतो. त्यांच्या गर्व आणि अंहकारचा फुगा फोडणं गरजेचं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पण, राजा म्हणून त्यांना असं एकांगी विचार करणं बरोबर नव्हतं. वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा,अस्वलराव या मोठ्या शक्तीशाली प्राण्यांसोबत छोटे जीव-जंतू-प्राणी-पक्षी हे त्यांचे प्रजाजन होते. सर्वांशी समानतेनं वागणं हाच त्यांचा राजधर्म होता. त्यामुळे महाराजांनी दरबाऱ्यांची वेगवेगळी मतेमतांतरे शांतपणे ऐकून घेतली.

वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा,अस्वलराव या दरबाऱ्यांना वाटले की आता महाराज उंदीर, मुंगी यासारख्या शुल्लक आणि क्षुद्र प्राण्यांना दरबारात येण्यास मनाई करतील.त्यांचं महत्व कमी करणारा आदेश काढतील. पण महाराजांनी तसं काही केलं नाही. त्यांनी कोणताही निर्णय न घेता दरबार बरखास्त केला.

वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा, अस्वलराव यांना आश्चर्य वाटलं.

 

०००

महाराजांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा दरबार भरवला. त्यांनी एका लखोट्यातून कागद बाहेर काढला. तो एक आदेश होता. या आदेशात असं नमूद होतं की, वाघोबा, कोल्होबा, लांडगोबा, अस्वलराव,रानडुकरे यांच्यासारख्या सर्व मोठ्या प्राण्यांनी उंदिर,मुंगी,माकोडे अशा सारख्या सर्व छोट्या प्राण्यांना प्रेमाणे वागणूक दिली पाहिजे. त्यांचा आदर केला पाहिजे.असं जे कोणी वागणार नाहीत, मग ते कोणत्याही पदावर असतो वा शक्तीशाली असतो त्यांना राज्यातून हाकलून दिलं जाईल.

हा आदेश वाचून दाखवल्याबरोबर महाराजांनी दरबार बरखास्त केला नि ते अंत:पुरात निघून गेले.

०००

या आदेशाचा वाघोबांना प्रचंड राग आला. आपल्या सारख्या शक्तीशाली प्राण्यांपेक्षा आणि वननगरीच्या इतर महत्वाच्या प्राण्यांपेक्षा उंदिर, मुंग्या महाराजांना अधिक प्रिय वाटतात हे त्यांना समजून चुकले. अशा पुळचट महाराजांना वननगरीतून हाकलून लावायला हवं आणि त्यासाठी शेजारील गेंडा-श्री महाराजांची मदत घेतली पाहिजे असं वाघोबांना वाटू लागलं.

०००

गेंडा-श्री महाराजांसोबत संधान बांधण्याचा दुष्ट हेतू घेऊन वाघोबांनी शेजारी राज्यात एकेदिवशी गुपचूप भेट दिली. सिंहमहाराज कसे गुळाचा गणपती आणि साखरेचा महादेव झाले असून त्यांना मुंग्या उंदिर आवडायला लागल्याचं गेंडा-श्रींना सांगितलं. गेंडा-श्रींनी जर सिंहमहाराजांना हटवण्यास मदत केली तर वननगरीच्या गादीवर बसल्यावर अर्धे राज्य देऊ सा प्रस्ताव त्यांनी गेंडा-श्री महाराजांपुढे ठेवला.

गेंडा-श्री यांच्यासाठी ही सुवर्णसंधी होती. एकदा का सिंहमहाराजाला हटवले की मग सगळेच राज्य ताब्यात घेऊन या वाघोबास हाकलून लावू असा विचार करुन गेंडा-श्रींनी वाघोंबाकडे मैत्रीचा हात पुढे केला.

ठरल्याप्रमाणे एके दिवशी वाघोबा आणि गेंडा-श्री यांनी वननगरीवर आक्रमण केले. वाघोबांना सर्व खाचाखोचा माहीत असल्याने ते थेट सिंह महाराजाच्या दरबारात पोहचले. महाराज त्यावेळी न्यायनिवाडा देत होते. दरबारात इतर प्राण्यांसमवेत उंदिर आणि मुंग्याही होत्या.

वाघोबा आणि गेंडा-श्रीने सैन्यासह दरबारात प्रवेश केला. गेंडाश्रीच्या सैन्याने सिंहमहाराजांना वेढा टाकला. लांडगा, कोल्हा, अस्वल, रानडुक्कर आंनदले. या सर्व घडामोडींकडे हुषार उंदराचे बारिक लक्ष होते. प्रसंगाचं गांभीर्य त्याला चटकन कळलं. त्याने झटदिशी गेंडा-श्रीच्या डोक्यावर उडी घेतली. झटपट कचदिशी चावा घेतला. गेंडा-श्री यांना काही कळण्याचा आत उडी मारुन तो आपल्या सहकाऱ्यांना बोलावायला बाहेर पडला. त्याचे सहकारी दरबाराच्या आसपास वेगवेगळ्या बिळात होतेच. ते पटापट बाहेर पडले. काही कळण्याचा आत उंदिर टोळी गेंडाश्रीच्या सैन्याला चावू लागली. त्यांच्या चपळाईपुढे गेंडा-श्री आणि त्याचे सैन्य हैरान झाले . वाघोबाची दुष्टबुध्दी एव्हाना मुंगीच्याही लक्षात आलीच होती. अवतीभोवती शांतपणे काम करत असणाऱ्या आपल्या टोळीला तिने इशारा केला. मुंगीटोळी वाघोबांच्या अंगावर पोहचून इकडे तिकडे चावू लागल्या. एकाच वेळी खूप साऱ्या मुंग्या चावू लागल्याने वाघोबांना काय करावे हेच कळेनासे झाले. त्यातच  उंदराने आता आपला मोर्चा वाघोबाकडे वळवला. त्याने वाघाच्या नाकपुडीला करकचून चावा घेतला नि मिशीचे केस ओढले. वाघ वेदेनेन तळमळू लागला. उंदिर झरदिशी वाघावरुन उडी मारुन पुन्हा गेंडा-श्रीवर चढून त्याला चावा घेऊ लागला. मुंग्या आणि उंदिर आलटून पालटून वाघोबा, गेंडा-श्री त्याच्या सैनिकांवर चालून जात राहिले.

या लहानग्या प्राण्यांना कसं पकडायचं,हे कुणालाच कळेना. पुन्हा एकदा उंदिर आणि मुंगी आपल्या मदतीला धावून आल्याचं सिंह महाराजांच्या लक्षात आलं.

काहीक्षण गडबडून गेलेले महाराज आता सावध झाले. त्यांनी मोठी डरकाळी दिली. आपला पंजा उगारुन त्यांनी वाघोबाला उचलले नि त्याला खाली आपटले. हा गोंधळ आणि उंदिर मुंग्यांच्या चाव्याने गोंधळून गेलेल्या गेंडा-श्रीला सिंहमहाराजांच्या सैन्याने पकडले.फंदीफितुरीने सिंह महाराजांवरील झालेला हा हल्ला उंदिर आणि मुंग्यामुळे अयशस्वी ठरला.

यापुढे तरी कुणीही कुणाला लहान समजू नका. प्रत्येकाचा सन्मान करायला शिका. अशी तंबी  महाराजांनी सर्व दरबाऱ्यांना दिली.

सुरेश वांदिले

००००

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!