खारुताईची सुटका
खारुताईची सुटका
तेजोमयीच्या सदनिकेच्या सर्व गॅलरिंना नायलॉनची
जाळी लावली आहे. कबुतर,उंदिर आणि पक्षी आत शिरु नये म्हणून ही खबरदारी.पण पक्षांना
आणि उंदिरमामास त्याचं काय? ते या
जाळीतून आत येण्याचा प्रयत्नच करणार नाहीत, असं आईला वाटत होतं.बाबांचं यावर काहीच
मत म्हणजे चितभी मेरी आणि पटभी मेरी. म्हणजे उंदिर-कबुतर-खारुताई-इतर पक्षी येऊही
शकतात किंवा नाहीही शकतात. त्यांचं असच बऱ्याचदा अधेमध्ये असायचं.
तुमचं काय?तेजोमयीनं अलेक्झांडरला विचारलं.
अलेक्झांडर हुषार आणि हिज मदर व्हाईस ना , त्यामुळे याप्रश्नावर
त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
या जाळ्यांवर पक्षी आणि उंदिरमामास त्यातून आत
येण्यास मनाई आहे,अशी पाटी लावली नव्हती. त्यामुळे जाळी लावल्यावर दोन तीन दिवसात
पक्षांनी जाळीतून आत येण्याचा प्रयत्न सुरु केला.एका उंदिरमामाने या जाळीतली एक
मोठी फट बरोबर शोधून काढून त्याने घरात प्रवेश केला.त्यावेळी त्याच्या
दुर्देव्याने अलेक्झांडर समोरच होता.त्याला बघून उंदिरमामाची भीतिने गाळण
उडाली.अलेक्झांडर त्याच्यावर झडप मारणार तोच उंदिरमामा शिताफीने आल्यापावली माघारी
वळले आणि त्यांनी शोधलेल्या फटीतून बाहेर उडी मारली. या सगळया पळापळीत ती फट आणखी
मोठी झाली.
एके दिवशी एका खारुताईस ती फट दिसली असावी. ती
त्यातून आत आली.गॅलरितल्या झाडांच्या कुंड्यांवर इकडून तिकडे उंडारत राहिली. तिला
जेव्हा या खेळण्याचा आणि उड्या मारण्याचा कंटाळा आला, तेव्हा ती बाहेर पडण्यासाठी
प्रयत्न करु लागली.ज्या फटीतून आली ती फट ती विसरुन गेली असावी. त्यामुळे ती या
कुंडीवरुन त्या कुंडीवर जावून बाहेर कसं पडता येईल हे ती बघू लागली.काही वेळानं बिचारी
ती थकलीच.तिचा चेहरा दिनवाना झाला.
संध्याकाळी पाच वाचता झाडांना पाणी टाकायला आई आली
तेव्हा खारुताई एका झाडाजवळ मुटकुळ करुन बसलेली तिला दिसली. तिला बघून आई ओरडली.या
ओरडण्याने अलेक्झांडर ,बाबा आणि तेजोयमी धावत गॅलरीजवळ आले.
काय झालं?बाबा आणि तेजोमयीनं
विचारलं. अलेक्झांडरही याच आशयाचे भाव आणत आईकडे बघू लागला.
आईने बाबांना खारुताईकड बोट दाखवले.
अगं ही तर खारुताई,तू काय राक्षस बघितल्यासारखी
ओरडतेस.तेजोमयी म्हणाली. अलेक्झांडरने मध्यचे डोकं खुपसले आणि त्याने भुंकायला
सुरुवात केली. या भुंकण्याने खारुताई आणखी घाबरली.
बाबांनी अलेक्झांडरचा कान पकडून त्याला भुंकू नको
म्हणून सांगितलं.
अलेक्झांडर चूप बसला.
ग र्भगळीत झालेली खारुताई इकडून
तिकडे पुन्हा जाऊ लागली.पण तिला काही फट दिसेना.
अहो तिला बाहेर पडायचयं.पण तिला रस्ता दिसत नाही.
आई म्हणाली.
तिला म्हणावं आत ये.आम्ही काही करणार नाही.बाबा
तेजोमयीला म्हणाले.
तेजोमयीने खारुताईस आत ये, अशी हाताने खूण
केली.पण खारुताई ढिम्म.आईनेही बोलावून बघितलं पण ती काही आत येईना.अलेक्झांडर या
सर्व हालचाली काळजीपूर्वक न्याहळत होता.तोही मान हलवून खारुताईस आत ये..आत ये असं
सांगू लागला.पण तिने काही प्रतिसाद दिला नाही.
काही वेळाने आणखी दोन खारुताई खिडकीजवळ आल्या. त्यांना
बघून आत अडकेली खारुताई त्यांच्याकडे झेपावली.पण जाळीमुळे आत कुंड्यांवर पडली. बाहेरच्या
खारुताईंना आत येईना आणि आत असणाऱ्या ताईस बाहेर जाता येईना. फारच केविलवाणे दृष्य
होते ते.
त्यांची दयनीय परस्थिती बघून आई रडकुंडीस आली.
काय करावं बरं याचा विचार बाबा करु लागले.अलेक्झांडरने इकडे तिकडे डोळे
फिरवले.आपणच काहीतरी करायला हवं असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. तो गर्रदिशी
मागे वळला आणि तेजोमयीच्या खोलित जाऊन त्याने कात्री आणली आणि बाबांच्या समोर
टाकली.
ठोंब्या,याचं काय करायचं?आईनं विचारलं.
अलेक्झांडरने कात्री उचलली आणि बाबांच्या हातात
दिली.
अहो बाबा,या कात्रीचा वापर करा,असं काहीतरी
अलेक्झूला सांगायचय.तेजोमयी म्हणाली.
म्हणजे जाळी कापायची?असंच ना...बाबा म्हणाले.
हो हो... जाळी कापली की ही खारुताई,बाहेर पडू
शकेल...तेजोयमी म्हणाली.
अगदी बरोबर! कापा बघू पटदिशी,आई म्हणाली.बाबांनी मग हलक्या हातांनी
जाळी एका बाजूने कापली.तिथे मोठं भोक तयार झालं.त्या भोकातून बाहेरच्या दोन्ही
खारुताई आत आल्या.त्यातील एकीला आतली खारुताई बिलगली.ती कदाचित आई असावी.दोघींच्या
डोळयातून अश्रू गळले असावे असं तेजोमयीस वाटलं. खारुताईने या तिघांकडे प्रेमाने
बघितलं आणि बाबांनी केलेल्या मोठ्या भोकातून बाहेर पडली.तिला बघून अडकून पडलेली
खारुताईही बाहेर पडली.सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
आपणास जे सुचत नाही ते कसं काय बुवा या
अलेक्झुच्या लक्षात येतं? बाबा अलेक्झांडरला प्रेमाने कुरवाळत म्हणाले.
मग आहेच माझा ठोंब्या हुषार!आई त्याचं लाड करत म्हणाली.पण ठोंब्या कात्री आणून
तू हुषारी दाखवलीस ना आता,उंदिरमामा आत शिरणार नाही हे याची जबाबदारी तुझी.नाहीतर
बघ...
ज्याचं करावं भलं तोच म्हणतो माझं खरं!असं काहीस अलेक्झांडरला म्हणावं वाटलं असणार पण आईपुढे
बोलण्याची त्याची काय टाप!आपण उंदिरमामास अजिबात येऊ देणार नाही असं त्याने
मान आणि शेपूट हलवून आईस कबूल केलं.
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment