अलेक्झांडरचा विमा?
अलेक्झांडरचा विमा?
तेजोमयीच्या घरी पहिल्यांदाच एक
अनोळखी गृहस्थ आले. बाबा त्यांना ओळखत असावे. पण आई,तेजोमयी आणि अलेक्झांडर-
द-डॉगीने त्यांना बघण्याचा प्रश्नच नव्हता. पहिल्यांद्याच घरी आलेल्या या
व्यक्तीचं,अलेक्झांडरने त्याच्या पध्दतीने स्वागत केले.मात्र बाबांनी त्याला समजावून
सांगितल्यावर त्याचं गुरगुरण कमी झालं.बाबांनी त्याला आत पाठवलं.त्यांनी आईला
हॉलमध्ये बोलावलं.
घरी आलेल्या गृहस्थांचं नाव होतं,अजित
पांडे.ते आरोग्य विमा एजंट होते.बाबांनी त्यांची आईला ओळख करुन दिली.आईने त्यांना
नमस्कार केला आणि चहा आणते म्हणून आत गेली.थोड्यावेळाने आई चहा घेऊन खोलित आली.आई
एखाद्याला चहापाणी स्वत: देते म्हणजे,त्या व्यक्तीवर गुरगारयचं नाही,भुंकयाचं
नाही,हे अलेक्झांडरला बरोबर कळलं
होतं.त्यामुळे तो आईसोबत हॉलमध्ये आला.पांडे यांच्या पायाभोवती घुटमळून पुन्हा आत
निघून गेला.
प्रारंभी किंचित दचकलेले पांडे
,अलेक्झांडरच्या प्रेमळ बघण्याने विरघळून गेला.फारच गोड आहे हो तुमचा कुत्रा..असं
ते बोलून गेले.
कुत्रा नाही.अलेक्झांडर!बाबा म्हणाले.
आमचा लेक.तेजोमयीचा भाऊ,आई लगेच
म्हणाली.तिला आपली नाराजी लपवता आली नाही.ते श्री पांडे यांच्या लक्षात आलं.
त्यांनी लगेच आई बाबांची क्षमा
मागितली.चहा पिऊन झाल्यावर,आईने कपबशी आत नेऊन ठेवली.बाबांनी तिला हॉलमध्ये येऊन
बसायला सांगितलं.आई पाठोपाठ तेजोमयी आणि अलेक्झांडरही येऊन बसला.
बाबांनी श्री पांडे यांना आरोग्य विमा
काढायला बोलावलं होतं.
ते कशासाठी हो?आईनं विचारलं.
अहो वहिनी,सध्याचं आपलं जीवन कसं
धावपळीचं झालय,कोणताही आजार होऊ शकतो.तब्येतीच्या तक्रारी उदभवू शकतात.त्यासाठी
अचानक रुग्णालयात दाखल व्हावं लागतं.अशावेळी मोठी रक्कम लागते.ती प्रत्येकाकडे
असेलच असं नाही.
मग?
मग,ज्यांनी ज्यांनी आरोग्य विमा काढला
असतो,त्यांना आरोग्य विमा कंपनीकडून
तत्काळ आर्थिक मदत म्हणजे पैशाची मदत केली जाते.
म्हणजे फुकट का काका?तेजोमयीनं विचारलं.
नाही गं ताई,फुकट नाही.त्यासाठी
संबंधित व्यक्तीचा विमा काढलेला असावा लागतो.त्यासाठी त्या व्यक्तीला पैसे भरावे
लागतात.
म्हणजे आपलेच पैसे ती कंपनी देते म्हणायची.मग
कशाला कंपनीला पैसे द्यायचे? आपण बँकेत ठेऊ शकतो ना!आई म्हणाली.
तसं नाही वहिनी,रुग्णालयचा खर्च लाखात
राहू शकतो.तेव्हढी रक्कम काही आपण कंपनीला देत नाही.
मग?
समजा तुम्ही लाख रुपयाचा विमा
काढला,तर तुम्हाला त्यासाठी वर्षाला चार-पाच हजार रुपयेच भरावे लागतात.त्यामुळे मग
तुम्हाला दवाखान्यात लाख रुपये खर्च आला तर कंपनीच तो खर्च करते.
पण जास्त खर्च आाला तर?बाबांनी विचारलं.
कंपनी देत नाही मात्र त्यासाठी थोडा
जास्त रक्कमेचा विमा काढून ठेवायचा असतो.त्यासाठी किंचित जास्त रक्कम भरावी
लागते.हा विमा वर्षभरासाठी असतो.त्या वर्षात दवाखान्यात जावं लागलं तर खर्च मिळतो.
पण काका,समजा दवाखान्यात जाण्याची
पाळीच आली नाही तर?तेजोमयीनं विचारलं.
अगं बाळ,विमा कंपन्या त्याचे काही
पॉईंटस देतात.
पण त्याचा काय उपयोग?आईने विचारलं.
तुम्ही दुसऱ्यावर्षी विमा काढला तर,ते
पॉईंटस त्यात मिळवले जातात.म्हणजे तुम्हाला अधिक रक्कमेचा फायदा मिळू शकतो.मात्र
पुन्हा दुसऱ्यावर्षी तुम्हाला विम्याचा हप्ता म्हणजे ठरलेली रक्कम भरावी लागते.असं
दरवर्षी नूतनीकरण करावं लागतं.
बरं बरं,जाउु द्या.हे फारच तांत्रिक
झालं.तुम्ही आमच्या तिघांचाही पाच लाख रुपयांचा विमा काढा.त्याचा हप्ता सांगा.बाबा
श्री पांडेना म्हणाले.
तिघेच? तेजोयमी,जोराने म्हणाली.
पांडे कांकांनी आश्चर्याने तिच्याकडे
बघितलं.
आईच्या आणि बाबांच्या चेहऱ्यावर
प्रश्नचिन्ह उमटलं.
हा चौथा कोण?पांडे काकांनी विचारलं.
अहो हा आमचा अलेक्झांडर नाही का?आई तू कशी गं विसरलीस?तेजोमयी
म्हणाली.
अगं खरच की!ठोंब्या ठोंब्या सॉरी!कशी बाई
माझ्याकडून चूक झाली.अलेक्झांडरला जवळ घेत आई म्हणाली.आई सॉरी कशासाठी म्हणते हे
त्याला कळेना.आळीपाळीने तो तिघांकडेही बघू लागला.
ठोंब्या..पांडे कांकाच्या तोंडून
निघालं.अलेक्झांडर गर्रकन वळला नि त्यांच्यावर गुरगुरायला लागला.पांडे काका घाबरले.आईने
अलेक्झांडरला शांत केले.
ठोंब्या फक्त
माझ्यासाठी.इतरांसाठी अलेक्झांडर,आई पांडे काकांना समजावत म्हणाले.त्यांनी दीर्घ
श्वास घेतला.तेव्हा कुठे त्यांना बरं वाटलं.
तर हा चौथा अलेक्झांडर माझा लेक.त्याचाही
आरोग्यविमा काढून घ्या.
आँ!
यात काय आँ झालं!
नाही म्हणजे,आमचा विमा हा फक्त
मनुष्यप्राण्यांसाठी आहे.इतरांसाठी नाही.
कां पण?या प्राण्यांना काय आजार होत नाहीत का ?
त्यांना दवाखान्यात नाव्य
लागतं.शस्त्रक्रिया करावी लागते.औषधपाणी करावं लागतं.आई म्हणाली.मग त्यांचा विमा
कां बरं नाही?
कां नाही,हे मी कसं सांगणार वहिनी.पण
नाही.
मग बाबा यांना सांगा आम्हाला विमाच
घ्यायचा नाही म्हणून!तेजोमयी म्हणाली.
अगं पण...
पण नाही नि बिन नाही.आरोग्य विमा
घ्यायचा तर चौघांचाही. नाही तर नाही.आपल्याला मोठा आजार-बिजार झाला तर बघून घेऊ
आपण.म्हणे फक्त मनुष्यप्राण्याचा विमा?आई
चिडून म्हणाली.
यावर बाबांना काहीच प्रत्यूत्तर देता
आलं नाही.पहिलांदा कुणीतरी शेपूटवाल्या मित्रासाठी आरोग्य विमा काढा म्हणणारे
भेटल्याने,पांडे काकांना काय सांगावं नि काय नाही हे कळत नव्हतं.त्यामुळे
थोड्यावेळोन बाबांचा निरोप घेऊन पांडे काका निघून गेले.
हुर्रेयSSS.तेजोमयी म्हणाली आणि तिने उडी मारली.आईही हुर्रेयSSS म्हणाली.काहीतरी खास घडलय हेसमजून अलेक्झांडरने सोफ्यावर उडी घेतली आणि
तिथून खाली उडी मारली.या तिघांच्या आनंदात आपण सामील व्हायचं की नाही व्हायचं,हे न
कळल्याने बाबांनी काही क्षण डोळे मिटून घेतले.
सुरेश वांदिले
000
.png)
Comments
Post a Comment