अर्धे राज्य द्या!
अर्धे राज्य द्या!
सिंह महाराजांच्या
कोणत्यातरी पूर्वजांना एका उंदराने शिकाऱ्याच्या जाळयातून मुक्त करुन वाचवले
होते.याची कथा उंदरांच्या प्रत्येक पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चविने पोहचवली
जायची.काही पिढीतील उंदरांना त्याचे काही फार कौतुक वाटले नाही.पण सध्याच्या
पिढीतील एका उंदरास या गोष्टीचा फारच अभिमान वाटला.
सिंहमहाराजांना
तेव्हा आपल्या पूर्वजाने वाचवले नसते तर महाराजांचे राज्य नष्ट झाले असते.कुणाच्या
तरी ताब्यात गेले असते.आपल्या पूर्वजाने सिंहमहाराजांचे प्राण वाचवून सिंह कुळावर
मोठेच उपकार केले आहेत,अशी त्याची भावना होती. त्याने ही भावना सध्याच्या काळातील काही
ज्येष्ठ उंदरांना सांगितली.त्यापैकी एक ज्येष्ठ उंदीर हसला. अशी भावना ठेवणं
म्हणजे मूर्खपणाचा कळस असल्याचं तो
म्हणाला.
दुसरा ज्येष्ठ
उंदीर म्हणाला, आपल्या पूर्वजाने उपकार केल्याचा भावनेने, सिंहमहाराजांना नक्कीच वाचवले
नसणार. कुणीही संकटात असेल तर जमेल तेवढी आपण मदत केली पाहिजे,या सद्गुणाचा त्या
पूर्वजाला त्याक्षणी आठवण झाल्यानेच त्याने सिंहमहाराजांना मदत केली असली पाहिजे.
अहो आजोबा,या
सद्गुणाची काय जाण ठेवली सिंहमहाराजांच्या पुढच्या पिढ्यांनी?तरुण उंदिर
म्हणाला.
त्यांनी आपणास
खाल्ले नाही हेच उपकार समज ना!तिसरा ज्येष्ठ उंदीर म्हणाला.
पण आपणास खाणाऱ्या
मांजरीस तरी कुठे त्याने शिक्षा केली?साधे दरडावलं सुध्दा नाही?याचा जाब विचाराला हवा.
त्याने काय होणार?पाचव्या
जेष्ठ उंदराने विचारले.
आपल्या
पूर्वजामुळे सिंहवंशाचे साम्राज्य वाचले.पण सिंहमहाराजांच्या एकाही पिढीने या
उपकाराची जाणीव ठेवली नाही. त्यामुळे आताच्या महाराजांनी त्यांचे अर्धे राज्य
उंदरांच्या नावे करायला हवे. हे आपण महाराजांना ठासून सांगू ना!
यावर ज्येष्ठ
उंदरं हसले.पण तरुण उंदरांना या उंदराचे म्हणणे पटले. त्या सर्वांनी त्याला
पाठिंबा दिला. त्याला आपला राजा म्हणूनही घोषित केले.
उंदरांच्या या
नव्या राजाने कोणत्याही ज्येष्ठांच्या सूज्ञ सांगण्याकडे लक्ष न देता,सिंहमहाराजांच्या
गुहेकडे कुच केले.सोबत त्याचे तरुण साथीदार होते.
असे कसे देत नाही?घेतल्याशिवाय
राहणार नाही अशा घोषणा देत हे उंदीर सिंहमहाराजांच्या गुहेजवळ पोहचले.
या आरडाओरडीमुळे सिंह
महाराज गुहेतून बाहेर आले.
समोर उंदीर टोळी
बघून त्यांना आश्चर्य वाटले.
त्यांनी सर्वात
समोर असलेल्या उंदरास ,हे काय चाललय, असं विचारलं.
तेव्हा उंदराच्या
राजाने, त्याच्या पूर्वजाने सध्याच्या सिंहाच्या पूर्वजास कसे वाचवले,त्यामुळे
सिंहवंश कसा वाचला,त्यामुळे सिंहाचे साम्राज्य कसे अबाधित राहिले,हे सांगितले.
बर मग,तुमचं म्हणण
तरी काय? महाराजांनी विचारलं.
महाराज,आमच्या
पूर्वजाने जे तुमच्या पूर्वजांवर उपकार
केले,त्याची कोणतीही परतफेड आतापर्यंत कुणी केली नाही.
बर मग?आता आम्ही
काय करायला हवे असे तुम्हाला वाटते?सिंह महाराजांनी विचारलं.
महाराज, आमच्या
पूर्वजामुळे तुमचे राज्य अबाधित राहिल्याने,अर्धे राज्य तुम्ही आम्हाला दिले
पाहिजे.उंदरांचा राजा म्हणाला.
सिंह महाराजांना
या बोलण्याचा खरे तर राग आला. पण ते शांतपणे म्हणाले.
उंदीरराव, तुम्ही
म्हणता म्हणून आम्ही, तुमच्या पूर्वजांनी आमच्या पूर्वजांना वाचवले,यावर कां बरे
विश्वास ठेवायचा?
आम्ही खोटे बोलतो
असे म्हणायचे काय महाराज तुम्हाला?
आम्ही कुठे तसं म्हणतो.पण
याचा काहीतरी पुरावा असला पाहिजे की नाही! उद्या कुणीही उठेल आणि आम्हास
सांगू लागेल,आम्ही तुमच्या पूर्वजांना वाचवले,तर तुम्ही अर्धे राज्य द्या! त्या सगळ्यांना काय आम्ही अर्धे राज्य देणार? तुम्ही
पुरावा द्या आणि अर्धे राज्य घ्या.सिंहमहाराज उंदरांच्या राज्याच्या डोळयाला डोळा
भिडवत म्हणाले.
पण महाराज,
तुमच्या पूर्वजाला आमच्या पूर्वजाने वाचवल्याची कथा आजच्या पिढीपर्यंत आली,हाच
नाही का मोठा पुरावा?
हो का?पण आमच्या
पिढीला तर ही कथाच माहीत नाही.सिंह महाराज म्हणाले.
महाराज तुम्ही
खोटंबोलत आहात?
आम्ही खोटं बोलत
असू तर तुम्ही खरं बोलण्याचा पुरावा आणा?आम्हाला खोटं ठरवा नि अर्धे राज्यही
घ्या की!महाराज म्हणाले.
ठीक आहे
महाराज,आम्ही याचा पुरावाच आणतो.बघा,तेव्हा तुम्ही तुमच्या शब्दाला जागले
पाहिजे.उंदरांचा राजा म्हणाला.सिंहमहाराजांनी तशी शपथ घेतली.
उंदराच्या
राजाने महाराजांच्या साक्षिने पुरावा आणण्याची शपथ घेऊन आपल्या तरुण साथीदारांसह
पुरावा आणण्यासाठी कूच केले.अद्यापही त्यांचा हा शोध सुरुच आहे.
सिंह
महाराजांना अद्याप तरी आपले शब्द खरे करण्याचा म्हणजे अर्धे राज्य उंदरांना
देण्याची वेळ आलेली नाही.
सुरेश
वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment