ड्रॅगन सफारी


 

ड्रॅगन सफारी

 

    सुट्टयांमध्ये फुल टू धम्माल करायचीय तेजोमीयन्नं जाहीर करुन टाकलं.

   अगं सुट्या त्याचसाठी असतात.मौज-मस्ती-धम्माल आणि दंगा कराचीय, मात्र जरा आईपासून सांभाळ हं,या सुट्यात तुला कामाला जुंपायची..बाबा हसत हसत म्हणाले.मौज-मस्ती करताना घरातली छोटी छोटी कामं करायला हरकत नाही बरं का,असं सांगायलाही ते विसरले नाहीत..बाबांना छानसी पप्पी देऊन तेजोमयी बाप्पांच्या समोर उभी राहिली,अन् आता धम्माल करण्यासाठी तुम्ही नाही म्हणू नका,असं तिने सांगितलं.

   अगं मी कधी नाही म्हणतो,कां खरं मुलांनी हेच करावं असच मला वाटत ना.पण मी तसं सांगू लागलो ?माझ्या मम्मीसह तुझीही मम्मी मला मोदकच द्यायच्या नाहीत..बाप्पा हसत हसत म्हणाले..

   विनोद नको हो बाप्पा..आपण कशी काय धम्माल करायची ते ठरवू या ना..

   ..के.बाप्पा विचार करु लागले..

   त्यांना  काहीतरी आठवलं नि ते उत्साहानं म्हणाले, धम्माल करण्यासाठी ड्रॅगनला बोलावू काय?

   ड्रॅगनचं नाव कानी पडताच,तेजोमयी चमकलीच.घाबरली सुध्दा..

      ss बापरे बाप ड्रॅगन.त्याच्या सोबत कशी काय धम्माल करणार.तो आपल्या धम्मालीचे बारा वाजणार..तेजोमयी म्हणाली

     एवढं बापरे बाप करायला काय झालं?दिसतं तसं नसतं.ड्रॅगन दिसायला जरी भयावह असला तरी तो प्रेमळही राहू शकतो.तू चित्रांशिवाय प्रत्यक्ष ड्रॅगनला बघितलं आहेस का? बाप्पांनी विचारलं..

   नाही हो बाप्पा.ते आपल्या देशात कुठे राहतात .मी असं ऐकून आहे की ते चीनमध्येच राहतात..खरं आहे का?

   चीनमध्येच राहतात असं नाही तर जगात इतरत्रही राहतात..बाप्पांनी सांगितलं.

000

2

    बाप्पा,हे ड्रॅगन आले तरी कुठून हो?तेजोमयीनं विचारलं.तिला ड्रॅगनची भीतीही वाटत होती नि त्याचबरोबर त्याच्या बद्यल माहितीही जाणून घ्याविशी वाटत होती.तिची उत्सुकता बघून बाप्पांनी तिला ड्रॅगन सफारीवर न्यायचं ठरवलं..

   तेजू तू माझ्या सोबत ड्रॅगन सफारीवरच कां बरं चलत नाहीत.तुला या ड्रॅगनची माहितीही कळेल नि धम्मालही करतायेईल..

   ड्रॅगन सफारीची आयडीया तेजोमयीला पटली नि तिने होकार दिला.मुषक स्वामीही खुष झाले.कारण बरेच दिवस झाले ते कुठेच अशा सफारीवर गेले नव्हते.अशा सफारी म्हणजे नवे ज्ञान ,नवी माहिती अन नवी चविष्ट मेजवाणी मिळण्याचा हुकमी एक्का,हे त्यांना इतक्या दिवसांच्या अनुभवांवरुन चांगलंच कळलं होतं.त्यामुळे ते चारही पायावर तयार झाले.

बाप्पा,मुषक स्वामींवर बसले आणि ,तेजामयी बाप्पांच्या खांद्यावर बसली.मुषक स्वामींनी आकाशात सुरु घेतला.ढगांमधून प्रवास सुरु झाला.या प्रवासातच बाप्पा तिला सांगू लागले..

000

3

    अगं,ड्रॅगनच्या चित्राकडे बारकाईनं बघितलं तर तुझ्या लक्षात येईल की ते सापासारखे दिसतात.तशीच शेपटी,नागासारखे अणुकचिदार दात,वळवळवणारी जिभ,नागमोडी वळण घेणारं शरीर.असचं दिसतं नाही का?आपल्या घरी असलेल्या पालीला मोठ्ठं केलं तर ती सुध्दा ड्रॅगन दिसू लागेल.

    ड्रॅगन म्हणजे साप आणि पालीचा भाऊ असं म्हणायचं का बाप्पा आपण.

    अगं तो त्यांच्याच कुळातला.ड्रॅगनचं महत्वाचं वैशिष्ट म्हणजे तो सारखा आग ओकतो.उडू शकतो,चक्रीवादळ,अतिवृष्टीसाठी कारणीभूत ठरतो असं समजलं जातं.तो नेहमी कोणत्यातरी संपत्तीचं रक्षण करतो.या संपत्तीचं हरण करु इच्छिणाऱ्याशी मुकाबला करुन त्याला ठार करतो.ड्रॅगनला मानवी रुप घेण्याची विद्या प्राप्त झाली असते.काही पुराणकथांमध्ये ड्रगनला बोलता येतं असंही सांगितलं जातं.ड्रॅगन नेहमीच अवाढव्य असतीलच असं नाही तर युरोपातील काही लोककथांमध्ये पालीएवढे ड्रॅगन असल्याचा उल्लेख आहे.चल तुला मी आता काही प्रसिध्द ड्रॅगनशी ओळख करुन देतो.बाप्पा म्हणाले.

    हे ड्रॅगन राहतात कुठे हो बाप्पा ,तेजोमयीने विचारलं.

   स्वर्गातल्या प्राणी संग्रहालयात.

    मग आपण आता स्वर्गात जायचं काय?

   मग तिकडेच चाललोत ना आपण आता..

   थोडयाच वेळात मुषक स्वामी स्वर्गातल्या प्राणी संग्रहालया जवळ येऊन थांबले.बाप्पा खाली उतरले नि तेजोमयीही त्यांच्या खांद्यावरुन खाली उतरली.

000

4

   स्वर्गातलं प्राणी संग्रहालय पृथ्वीवरच्या प्राणीसंग्रहालासारखं बंदिस्त नव्हतं.ते उघडच होतं.विविध प्राणी इकडून तिकडे जात होते.बाप्पा दिसताच त्यांना दंडवतं घालत होते.हे बघून तेजोमयीला मजा वाटत होती.

      तो बघ..प्राणी संग्रहालयातल्या एका प्राण्याकडे बोट दाखवत बाप्पा म्हणाले..

   त्या ड्रॅगनला होतू-पुकू या नावानं ओळखलं जातं.तो न्युझिलंड देशातला.त्याने अनेक प्रवाशांना ठार केलं होतं.

    बाप्पा त्याला जा म्हणावं परत.आपल्याकडे  बोलावू नका..तेजोमयी घाबरुन म्हणाली.बाप्पा हसले आणि त्याला परत पाठवले.दूसऱ्या ड्रॅगनकडे बाप्पांनी तेजोमयीचं लक्ष वेधलं..

    याला तिम्मत नावानं ओळखलं जातो.तो बेबिलोनिया देशाचा बरं का? समुद्र तळाशी राहतो.बेबिलॉन देशाच्या परमेश्वराचा जन्मदाता यालाच समजलं जातं.बाप्पा म्हणाले.तिम्मत बाप्पांच्या जवळ आला नि त्याने बाप्पांच्या पायावर डोके ठेवले.तिम्मत प्रेमळ वाटत होता.त्याला बघून तेजोमयीला भीती वाटली नाही त्यामुळे तेजोमयीने तिम्मतच्या पायावर डोके ठेवले.तेजोमयीला आशीर्वाद देऊन तिम्मत रमत गमत पुढे निघून निघून गेला.

00

5

   स्वर्गातल्या प्राणी संग्रहालयात बरच पुढे गेल्यावर ,एके ठिकाणी बाप्पांनी लर्नियन हायड्रा ये माझ्या राज्या,अशी हाक दिली. तेव्हा त्यांच्या समोर तीन चार ड्रॅगन प्रगटले..या ड्रॅगनला अनेक मुख होते.त्या ड्रॅगनेही बाप्पांना दंडवत घातला.

   हा ड्रॅगन पाण्यात राहतो. ग्रीक देशाच्या या ड्रॅगनचं एखादे मुख कापलं तर ताबडतोब तिथं दुसरं येतं.बाप्पा म्हणाले.लर्नियनही हसला नि त्याने आकाशातल्या पोकळीत सूर मारला.

   थोडं पुढं गेल्यावर  बाप्पांनी वैत्र वैत्र अशी हाक मारली.आकाशात वैत्रानं दर्शन दिलं.हा ड्रॅगन भारतातला.या वैत्रने पुराणकाळात आकाशातील सर्व जल पिऊन टाकलं होतं.त्यानंतर तो एका पर्वताला विळखा घालून आराम करत बसला.देवांचा राजा इंद्राने त्याच्यावर हल्ला करुन त्याला ठार केलं आणि आकाशातील जलाला मुक्त केलं.बाप्पांनी सांगितलं.

    बाप्पा,हा वैत्र मला गिळून टाकणार तर नाहीना..तेजोयमीनं घाबरुन विचारलं.

    अगं तो काही करणार नाही.बघ कसा मलूल झालाय आता.मी बोलावलय म्हणून तो आलाय.

    वैत्रने मोठया कष्टानं बाप्पांना नमस्कार केला आणि तो माघारी वळला.

000

6

    आकाशात एक प्रचंड मोठा ड्रॅगन दिसू लागला.हा ड्रॅगन उत्तर अमेरिकेतला आहे.बाप्पांनी त्याच्याकडे बोट दाखवत माहिती दिली.

    बाप्पा यांचं नावं काय हो,

    क्वेटजालकोटी....हे याचं नावं.हा उडणारा ड्रॅगन आहे.उत्तर अमेरिकेतील काही जमातींना हा या विश्वाचा निर्माता वाटतो.

    तेजोमयीने क्वेटजालकोटीला भक्तिभावाने प्रणिपात केला.त्यानेही शेपटी हलवून तिला आशीर्वाद दिला आणि तो माघारी वळताच  आकाशात नवा ड्रॅगन अवतरला.हा जर्मनिचा फाफनिर.बाप्पांना माहिती दिली.

   हा देवाचा आवडता ड्रॅगन होता.देवानं त्याला सोन्याचं कडंही दिलं होतं.पण हा नंतर खूप स्वार्थी झाला.त्यामुळे देवाच्या मनातून उतरला.बाप्पा म्हणाले.फाफनिर कसुनसा हसला नि तो माघारी वळला.त्यानतर बाप्पांनी गोईन,ग्रॅबक,ग्रॅवीतनीर आणि ग्रॅफवोलूड या ड्रॅगन्सना हाक मारली.हे चारही नार्वे देशातले.त्यांच्या मुक्काम नेहमी यग्राडीसील या जीवनवृक्षाखाली असतो.ते प्रेमळ असतात.अशी माहिती दिली.चारही ड्रॅगन वेगाने बाप्पांकडे आले नि बाप्पांच्या भवताल एक नृत्यकरुन वेगाने माघारी परतले.

    त्यानंतर बाप्पांनी ची लूंग वाँग अशी हाक मारली.आकाशात ची-लूंग-वॉग दिसू लागला.

    ची-लूंग-वाँग हा चीनमधील ड्रॅगन्सचा राजा समजला जातो.हा आगिला आटोक्यात आणण्यात माहीर समजला जातो.बाप्पांनी सांगितलं.

    म्हणजे हा फायर फायटर म्हणायचा.

    अगदी बरोबर.बाप्पा म्हणाले.ची-लूंग-वांग थोडा वेळ आकाशात राहिला आणि नंतर तो अदृष्य झाला.

000

7

    आता कोणत्या ड्रॅगनला बोलवणार बाप्पा..तेजोमयीनं विचारलं.

    आता कुणालाही बोलावणार नाही.पण मला सांग आता तरी तुझी भीती दूर झाली की नाही ते सांग बघू आधी.

    झाली ना..

    अगं आपल्याला बरच काही माहीत नसतं.आपण उगिचच भीत राहतो.खरय नं..

    होय बाप्पा.. तेजोमयी म्हणाली.

   चला तर मग परत पृथ्वीवर बाप्पा म्हणाले.बाप्पा मुषक स्वामी वर बसले नि तेजोमयी बाप्पांच्या खांद्यावर बसली.मुषक स्वामीने पृथ्वीकडे झेप घेतली.

ड्रॅगन सफारीनं तेजोमयी भारावून गेली होती.मातीचा किल्ला करताना तिने त्या किल्ल्याच्या रक्षणासाठी एक ड्रॅगन बनवला.तिला चकलीच्या आकारात ड्रॅगन दिसला.सेव म्हणजे ड्रॅगनची पिल्ल तर नाहीत ना अशी शंका तिला आली.कंरज्याचे आकार तिला तसेच वाटू लागले..बाप्पांनाही तिनं तसं सांगितलं..

   हीच तर खरी धम्माल..मौज नाही का तेजू.. बाप्पा सोंड हलवित म्हणाले.ती हलणारी सोंड तेजोमयीला ड्रॅगनच वाटलं..आणि तीच तिलाच हसू आलं..

 

000000

 

सुरेश वांदिले

वाय 1/15

शासकीय वसाहत ,वांद्रे पूर्व मुंबई 51

9324973947

   

Comments

Popular posts from this blog

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा...(भाग दोन)

आई नापास (भागा एक)

धडा!