सद्गुण
सद्गुण
रवी त्याच्या शाळेत स्कूल बसने जात असे. रस्त्यावरील
एका कोपऱ्यावर ही बस थांबायची. तिथपर्यंत रवीची आई त्याला पोहचवून द्यायची. आज
रवीचं लवकर आटोपल्यानं दोघेही नेहमीपेक्षा लवकर बाहेर पडले. बस येण्यासाठी वेळ
असल्यानं आईने रवीस रस्त्यावर लागलेल्या मंदिरात नेलं. दोघांनी देवास नमस्कार
केला. मूर्तीजवळ ठेवलेल्या ताटलीतील प्रसाद आईनं घेतला. दोघेही मंदिराच्या बाहेर
आले. स्कूलबस ज्या ठिकाणी येते तिथे आल्यावर आईने रविच्या हातात प्रसाद देऊन त्यास
म्हणाली,
बाळ ,देवाचा प्रसाद मनापासून सेवन केला की आपण सद्गुणी होतो.
म्हणजे, याचा अर्थ मी सद्गुणी नाही का आई, रविने चटकन
बोलून गेला. या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे न कळून आई गप्प बसली. या अनपेक्षित
प्रश्नानं तिच्या मनात चलबिचल झाली. तिचा चेहरा पडला. एव्हाना स्कूल बस आली होती.
काहीबाही विचारत जाऊ नकोस, असं किंचित
दुखऱ्या स्वरात म्हणून तिने रविला बसमध्ये बसवून दिले.
रविच्या मनात, प्रसाद मनोभावे खाल्ल्यावरच
सद्गुणी होतो, हे आईचं सांगणं, दिवसभर शाळेत रुंजी घालत राहिलं.
आपल्या प्रश्नामुळं आई दुखावल्याचं रविच्या लक्षात आल्यानं त्याचं कशातच लक्ष
लागलं नाही.
शिक्षक जे काही फळ्यावर लिहून देत, ते कृत्रिमपणे
तो उतरवून घेई. मात्र गणिताच्या सरांना रविचं काहीतरी बिनसलं असल्याचं लक्षात आलं.
कारण, त्यांनी एक विनोद वर्गाला सांगितला तेव्हा, रवी सोडून
सर्व वर्ग खोखो हसला. पण रवी मात्र शून्यात नजर घालून बसला होता. गणिताच्या
सरांच्या तीक्ष्ण नजरेनं ही बाब बरोबर हेरली.
वर्ग संपल्यावर त्यांनी रविला आपल्या सोबत घेतलं.
वर्गाच्या बाहेर आल्यावर त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाले,
रवी अरे, तुझी तब्येत बरी नाही का ? असा शून्यात
कां बघत होतास वर्गात. काही बिनसलय का ?
नाही सर, काही बिनसलं नाही, पण. चाचरत रवी म्हणाला
पण काय, मला सांग ना...मी तुला नक्कीच
मदत करीन.. सरांनी रविला धीर दिला.
सर, मी चांगला मुलगा नाही का हो. रवी हुंदका देत म्हणाला.
अरे,
असं कोण म्हणालं तुला. तू हुषार
आणि सद्गुणी मुलगा आहेस. सर त्याला समजावत म्हणाले.
देवाचा प्रसाद खाल्यावरच आपण सद्गुणी होतो का हो
सर...रविने सरांच्या नजरेला नजर भिडवित विचारलं.
या अनपेक्षित व वेगळ्या प्रश्नानं सर किंचितसे गोंधळले.
कारण असे प्रश्न आणि त्यांना उत्तर देण्याची वेळच सहसा येत नसे. रविसारख्या हुषार, चुणचुणित, प्रामाणिक, सह्रदयी
विद्यार्थ्यांनं थेट हा प्रश्न विचारल्यावर, रविचं आजचं शून्यात जाणं
सरांच्या लक्षात आलं. रविच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर दिलं नाही तर त्याच्या
मनातला गोंधळ वाढतच जाईल हे सरांनी ताडलं. सर्वांदेखत त्याला समजावून सांगणं उचित
नव्हतं. त्यामुळे ते रवीसोबत शाळेच्या पटांगणात आले.
या पटांगणाच्या एका टोकाला तीन-चार वडाची झाडं होती.
त्यांच्या अवती भोवती बसण्यासाठी ओटा बांधला होता. रविला एका झाडाभोवती असलेल्या
ओट्याकडे घेऊन सर गेले. दोघेही बसल्यावर त्यांनी थेट मुद्याला हात घातला. सकाळी
शाळेत येताना कुणी काही म्हणालं का, हे रवीस पुन्हा विचारलं.
सांगावं की सांगू नये, हा प्रश्न काही क्षण रविला पडला.
मात्र सरांच्या आश्वासक बोलण्यानं त्यास धीर आला होता. त्याने आज सकाळी शाळेत
येताना आई सोबतचं देवळात जाणं,
देवाचा प्रसाद आईनं देणं, ते देताना हा
प्रसाद सेवन केला की आपण सद्गुणी होतो असं सांगणं, हा सर्व घटनाक्रम त्यांना
सविस्तर सांगितला. सरांच्या सारं काही लक्षात आलं. आई सहज, निर्मळ मनानं
बोलून गेली होती. पण ही बाब रविच्या मनास खूप टोचली होती. कारण तो मुळातच सद्गुणी
होता.
आजारी पडलं की डॉक्टरकडे जाऊन गोळ्या, औषध घेतलं
किंवा त्यांनी इंजेक्शन टोचलं की तब्येत बरी होते. सद्गुणाचं इंजेक्शन काही टोचता
येत नाही. कृत्रिम बाबींनी सद्गुण अंगी बाणवता येत नाहीत. सर, म्हणाले.
मग आई तसं का म्हणाली असेल,सर.
आपली आई देवस्वपरुच असते. चांगलं वागावं, खरं बोलावं, चोरी करु नये, प्राणीमात्रांवर
दया करावी, मोठ्यांचा सन्मान करावा, परिश्रम करावेत, कुणाला दुखवू
नये, हे सगळं सगळयात आधी मुलाला आईच शिकवते. तुझ्या आईने
सुध्दा तुला हीच शिकवण दिली असणार.
होय सर.
आईची ही शिकवण जी मुलं अंगिकारतात ती सद्गुणी होतात.
जसा तू सद्गुणी झालास.
मग आईस तसं का वाटत नाही सर. मी देवाचा प्रसाद
खाल्ल्यावरच सद्गुणी होईल असं का म्हणाली असेल ती... रवी निराश मनाने बोलला.
हे बघ रवी, आईचं सांगणं हे देवाच्या प्रसादासारखं असतं.
देवाचा प्रसाद मनोभावे खायचा असतो तसच आईचं सांगणं मनोभावे ऐकायचं असतं. जी मुलं
तसं करतात ती सद्गुणी होतात. जी मुलं ऐकत नाहीत, त्यांच्यावर एक एक दुर्गुणाचा
पाश पडत जातो. अशी मुलं वाईट संगतीला लागतात. स्वत:चं अहीत करुन बसतात. आई आपल्या
मुलास कधीच वाईट सांगत नाही. देवाचा चिमूटभर प्रसाद आई जेव्हा देते तेव्हा तिची
भावना असते की मुलानं जे काही करावं ते शुध्द मनानं करावं. त्याच्या मनात काही
गोंधळ राहू नये. त्याच्याकडे असणारे सद्गुण दिवसेंदिवस वाढत जावे. कारण या
सद्गुणांनी जीवनात यश मिळवता येते. देवाचा प्रसाद हे प्रतीक झालं. हे प्रतीक
उत्साह आणि उर्जेचं आहे.
पण सर,
मी जर प्रसाद खाल्ला नसता तर..
तर आईस वाईट वाटलं असतं. दु:ख झालं असतं. असं आईस अथवा
कुणासही दुखवणं योग्य नसतं. असं वागणं दुर्गुणाचं लक्षण समजलं जातं.
नाही काय ?
होय सर..रवी म्हणाला...
सकाळी आईच्या सांगण्यानं तो दुखावला होता. पण सरांनी
त्याच्या मनातली शंका दूर केल्यावर त्याला खूप बरं वाटलं. आईला कधी दुखवायचं नसतं
हा आणखी एक सद्गुण बाळगायचा हा मनोमन निर्धार करुन रवीनं केला. सरांच्या पायावर
डोकं ठेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
सुरेश वांदिले
०००

Comments
Post a Comment