अनोळखी आदर्श..
अनोळखी आदर्श..
तेजोमयीच्या वर्गात सरांनी तुमचे आदर्श कोण यावर निबंध
लिहिण्याची स्पर्धा घेतली.
सर्वांनी या स्पर्धेत हिरीरीने भाग घेतला. मुलांनी निंबध उत्तमच लिहिले होते. बहुतेक सर्वांच्या आदर्शात महात्मा गांधी, सचिन तेंडुलकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, महेंद्रसिंग धोनी, पंडित जवाहरलाल नेहरु, मेरी कॉम, पी.व्ही सिंधू, एपिजे अब्दूल कलाम अशासारख्या थोरामोठ्यांची नावे होती. मात्र, तेजोमयीने
आपला आदर्श म्हणून ज्या व्यक्तिस निवडलं होतं, ते वाचून सर विचारातच पडले. कारण
त्यांना सुध्दा ते नाव ठाऊक नव्हतं. त्यांच्या कानावरुन सुध्दा ते गेलं नव्हतं.
सरांच्या पुढे पेच आणि प्रश्न पडला. या निबंधाचं काय
करायचं?किती गुण द्यायचे?ते कशाच्या आधारावर द्यायचे?
त्यांना या विचाराने ताण आला. त्यामुळे त्यांनी तेजोमयीचा निंबध तपासला नाही. दुसऱ्या दिवशी निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करायचा
होता. सर्वमुले सरांची उत्सुकतेने वाट बघत होते. सर वर्गात आले तेव्हा सर्वांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. ते, निकाल कधी जाहीर करतात यांची उत्सुकता सर्वांच्या
चेह-यावरुन स्पष्ट दिसत होती.
मात्र सरांचा चेहरा पडलेला होता. दोन मिनिटे ते काहीच
बोलले नाहीत. सर्व विद्यार्थ्यांना वाटलं की, सरांची तब्येत बरी नसावी म्हणून ते
असे चिंताग्रस्त दिसताहेत. अखेर रंजनाने हिंमत करुन त्यांना विचारलेच. पण, त्यावर
किंचित हसत सरांनी तसं काही नाही म्हणून सांगितलं.
मग सर, निकाल जाहीर कराना, उमेशने विनंती केली.
त्यावर सरांनी, निकाल
घोषित करणं शक्य नसल्याचं सांगितलं. ते ऐकून सर्वांना धक्का बसला.
कां पण सर?विवेक ने विचारलं.
अरे] मला एक निबंध तपासताच आला नाही.
इतका गचाळ होता का सर तो निबंध, रश्मी म्हणाली. त्यावर सर्व वर्ग खो खो हसू
लागला.
सरांनी सर्वांना चूप बसवले. अरे, गचाळ काय म्हणता. निबंध
चांगलाच झालाय. पण त्या निबंधात ज्या व्यक्तिचं वर्णन केलय ते मला ठाउुक नाही ना.
सर, कुणाचा हा निबंध? मयुराने विचारलं.
तेजोमयीचा.सरांनी सांगितलं.
वाटलच होत. तिलाच असं काहीतरी आगावूपणा करावा वाटतो. प्रदीप कुत्सितपणे हसत म्हणाला.
अहो प्रदीपराव. कशाला तिला काहीबाही म्हणता. वेगळा
विचार करणं म्हणजे आगावूपणा नाही ना. कल्याणीने ,तेजोमयीची बाजू घेतली. इतर
मुलांमुलींनी प्रदीपची चांगलीच खरडपट्टी काढली.
तेजोमयीचा निबंध वादंगाचा विषय होईल असं सरांना वाटलं
नव्हतं. पण आपल्या अज्ञानामुळे हे घडलं याचं, त्यांना आणखीनच वाईट वाटलं. ते
खुर्चीवर बसले आणि गटागटा पाणी प्याले.
अहो सर, तुमची तब्येत बरी नसेल तर उद्या निकाल जाहीर
करा ना.तेजस म्हणाला. सर्व मुले हो हो म्हणाली..
पण सर, तुम्हाला माझ्या निबंधातलं काय नाही कळलं ते तरी
सांगा ना.अखेर तेजोमीयने न राहवून विचारलं.
सरांना सांगणं भागच होतं.
अगं तेजो, तू ज्या गर्विता गुलाटीचा आदर्श ठेवतो म्हणतेस,
ही मुलगी खरी आहे की खोटी आहे हे सुध्दा
मला माहीत नाही.
पण सर यात माझा काय दोष?
हो गं, तुझा काही देाष नाही हे खरं. पण जी व्यक्ती मला
माहीत नाही, त्या व्यक्तिवरचा निबंध तपासणार कसा?
सगळयांचे आदर्श कसे माझ्या ओळखीचे म्हणजे बघ, महात्मा
गांधी, सचिन तेंडुलकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, महेंद्र सिंग धोनी, पंडित
जवाहरलाल नेहरु, मेरी कॉम, पी.व्ही सिंधू, एपिजे अब्दूल कलाम असे. सर्वांना ठाउुक
असलेले.तुझा आदर्श मात्र गर्विता गुलाटी.कोण ही गर्विता आणि काय म्हणून तिचा आदर्श
ठेवायचा?सरांनी विचारलं.
तेजोटलीचा आगावूपणा आता चांगलाच अंगलटी येणार असं
प्रदीप कुजबुजला. कल्याणिने त्याला पुन्हा चूप केले. सरांनीही दटावलं.
प्रदीप तिला बोलू दे ना. कशाला तू तिला वाईटसाईट बोलतोस..सर म्हणाले.
तेजोमयी सांगू लागली..
सर, आदर्श थोरामोठ्यांचा घ्यायचा असतो असा काही नियम
नाही ना. एखाद्या सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तिचाही आदर्श घेता येतो
की नाही?
घेता येतो. मात्र,त्या सामान्य व्यक्तिने एखादी असामान्य गोष्ट करायला हवी ना
तेजो.सर म्हणाले.
सर, असं कुणी सांगितलय की असामान्य गोष्टी केलेल्याचाच
आदर्श ठेवायचा म्हणून. तेजोमीने आपला मुद्दा मांडला. यावर सर निरुत्तर झाले.
अगं, या गर्विताने असं केलं तरी काय ज्यामुळे तू एकदम
तिचा आदर्श घ्यायला तयार झालीस? सरांनी विचारलं.
अहो सर, ही जी गर्विता आहे, ती लोकांनी पाण्याची बचत
करण्यासाठी तिच्या पध्दतीने सातत्याने प्रयत्न करतेय. आपण हॉटेलमध्ये आपण जातो,
तेव्हा अनेकदा पूर्ण ग्लास भरलेलं पाणी पीत नाही. ते अर्धच पितो. अर्ध ठेऊन देतो. हे
पाणी फेकून दिल्या जातं. ही बाब गर्विताच्या लक्षात आली. मग ती तिच्या गावातल्या
हॉटेल मालकांना भेटली. त्यांना सांगितलं की तुम्ही अर्धा ग्लासच पाणी ग्राहकांना
द्या. ज्यांना अधिक पाणी लागेल ते मागतील. त्यामुळे पाणी वाया जाणार नाही. पाण्याची
बचत होईल. ग्लासातले अर्धे पाणी वाचवण्याचे लहान फलक तयार करुन ग्राहकांच्या
टेबलवर ठेवण्यासाठी हॉटेल मालकांना दिले. बऱ्याच हॉटेल मालकांना तिचं म्हणण पटलं. तिच्या
सांगण्याप्रमाणेच ते वागू लागले.
यात कोणता पराक्रम गाजवला बाँ? फालतुगिरी आहे ही. विनयने प्रतिक्रिया दिली
अरे, यात कसली आलीय फालतूगिरी. आपल्यापेक्षा दोन तीन वर्षांनी
मोठ्या असणाऱ्या गर्वितास जे सुचलं ते आपल्यापैकी एकाला तरी सुचलं का? एकिकडे लोकांना पाणी प्यायला मिळत नाही दुसरीकडे
पाण्याची नासाडी होतेय हे काय आपणास दिसत नव्हत का? पण नाही दिसलं. गर्विताला ते दिसलं, म्हणून तिचं मोठेपण मला भावलं. तिने तिच्या बाबांच्या
मदतीने आपण किती पाणी वापरतो याची नोंद घेण्यासाठी व्हाय वेस्ट, नावाचं ॲप सुध्दा
तयार केलं. म्हणून मला तिचा आदर्श ठेवून तिच्यासारखं काम करावं असं वाटतंय. सोपं
काम असलं तरी, त्यामुळे पाण्याची बचत होण्यासाठी मोठा हातभार लागू शकतो ना त्यामुळे.
तेजोमयी आपला मुद्दा सविस्तर मांडला.
यावर, सरांनी टाळ्या वाजवल्या. एक दोन मुलं सोडली तर
इतर मुलांनीही टाळ्या वाजवल्या.
सर, असा वेगळा विचार करणाऱ्या तेजोमयाचा निबंध पहिल्या
क्रमाकांचा ठरला पाहिजे,कल्याणी ठासून म्हणाली.
हो हो हो..एक दोन मुलं सोडली तर सर्वांनीच कल्याणीस
पाठिंबा दिला.
या पाठिब्यांने सरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यांचा
ताण क्षणार्धात नाहिसा झाला .तेजोमयीच्या निबंधाला त्यांनी पहिला क्रमांक घोषित
केला.
सुरेश वांदिेले

Comments
Post a Comment