अंगठीचे रहस्य
अंगठीचे रहस्य
राजपुत्र वनविहारासाठी आला
असताना विश्रांतीसाठी एका तलावानजिक आंब्याच्या झाडाखाली थांबला.तलावात सर्वत्र
कमळ फुलले होते.त्या कमळांमधून काही बदक आणि त्यांची पिल्ल विहार करत होती.काही
बगळे पाण्याजवळ डोळे मिटून उभे होते.इतर पक्षांची जा ये सुरु होती.त्यांच्या
वेगवेगळया आवाजांनी आसमंत भरुन गेला होता.ते सगळेच दृष्य बघताना राजपुत्र हरखून
गेला.
अचानक
तिथे एक साधुपुरुष आला.राजपुत्राचे त्याच्याकडे लक्ष जाताच त्याने त्यांना नमस्कार
केला.साधुने राजपुत्राला आशीर्वाद दिला. त्याचा उजवा हात हातात घेऊन साधुने
राजपुत्राच्या बोटात एक अंगठी घातली आणि त्याचा हात सोडून तो साधु माघारी वळला आणि
बाजूच्या घनदाट वनराजित दिसेनासा झाला.साधुचे असे अचानक येणे आणि अचानक जाणे,राजपुत्राला
कोड्यात टाकून गेले.
साधू
ज्या मार्गाने निघून गेला तिकडे बघत असतानाच राजपुत्राला आपला उजवा हात जड जड वाटू
लागला. साधुने त्याच्या हातात एक अंगठी टाकल्याचं त्यास आठवलं. राजपुत्राने आपली
नजर अंगठीकडे वळवली.
ती अंगठी
चांगलीच जाडजूड होती. ती सोन्याची होती आणि त्यावर काळा खडा होता. त्यावर उडणाऱ्या
नागाचे चित्र होते. दोन्ही नागांची लवलवती जिभ बाहेर होती आणि त्यामुळे ते
भीतीदायक वाटत होते.
ती अंगठी
बघून राजपुत्राला आधी आश्चर्य वाटलं आणि नंतर भीती.
साधुने ही
अंगठी आपल्याच बोटात कां घातली?अंगठीबद्दल काहीही न सांगता तो
कां निघून गेला?या अंगठीच्या काळया खड्यावर असणारे दोन नाग
काय दर्शवतात?यात काही रहस्य आहे का?असे
अनेक प्रश्न त्याला एका पाठोपाठ पडू लागले.
ही अंगठी
काढून तलावात फेकून द्यावी असंह त्यास वाटलं.पण राजपुत्राने हा मोह आवरला.तो तडक
महालाकडे निघाला.महालात पोहचतातच त्याने महाराजांची भेट घेतली.घडलेली सारी हकिकत
सांगितली.हे सांगताना राजपुत्राला धाप लागत होती.महाराजांनी त्याच्या खांद्याला
धरवुन बसवले.सेवकांना पाणी द्यायला सांगितलं.पाणी पिल्यावर राजपुत्रास बरे वाटलं.
हे
बघा,तुम्ही आम्हास ताबतोब जे काही घडलं ते जशच्या तसं सांगितलं ते बरं केलं.असच
वागलं पाहिजे.आईबाबांपासून काहीही लपवायचं नसतं.हा धडा तुम्ही चांगलाच लक्षात
ठेवला..
ते ठीक
आहे हो आबासाहेब,आम्ही तुमच्या शब्दाच्या आणि आज्ञेच्या बाहेर नाही.पण तो साधू
अचानक येतो काय आणि आमच्या बोटात अंगठी टाकून अचानक निघून जातो काय,हे संयशास्पद
वाटत नाही का?
कुमार,
नक्कीच हे संयशास्पद आहे.त्यामुळे कोणतही काम करताना आपण सदैव सावध आणि दक्ष
राहायला हवं..ते तुमच्याकडून झालं नाही.हा दुसरा धडा कसा काय विसरलात बुवा..
क्षमा
असावी आबासाहेब,आमच्याकडून चूक झाली.पुन्हा असे घडणे नाही..
बर बरं
...झालेली चूक मान्य करणं आणि पुन्हा तसं घडू न देण्याचा निर्धार करणं हा तिसरा
धडा तुम्ही चांगला लक्षात ठेवला,याचं कौतुकच आहे...
पण आबासाहेब,माझं कौतुक पुरे झालं..आता पुढे काय?
पुढे काय
काय करायला हवं..याचा जरा विचार करा बघू..
साधूचा
शोध घ्यायला हवा.तो कुठून आला?कशासाठी आला? हे बघायला हवं..
शाब्बास..पुढे..
त्याने
माझ्यावर पाळत ठेवली होती की त्याला मी त्या तलावाच्या ठिकाणी अमुक वेळेस जाणार हे
आपल्यातील कुणी सांगितलं होतं?याचाही शोध घ्यायला..
अगदी
बरोबर..आपल्या विश्वासातील माणसं असा घरभेदीपणा करु शकतात.अशी माणसं धोक्याची
असतात.त्यांचा शोध घेऊन वेळीच त्यांचा बंदोबस्त करायला हवं..तुम्ही पाचवा सुध्दा
धडा चांगलाच गिरवला दिसतो,कुमार..
आणखी काय
काय शोधावं वाटतं तुम्हास.. महाराजांनी राजपुत्रास विचारलं.तो विचारात
पडला.विचारात मग्न असताना त्याचं लक्ष बोटातील अंगठीकडे गेलं..अंगठीवरील काळया
खड्यावरील नागांच्या चित्रांकडे गेलं..त्यांच्याकडे बघत राजपुत्र म्हणाला..
आबासाहेब,त्या
साधुने ही अंगठी त्या साधुने आमच्याच बोटात कां टाकली?हे न सांगताच तो निघून गेला. तेव्हा
या अंगठीचं करायचं काय?ही अंगठी साधीसुधी दिसत
नाही.काळा खडा आणि त्यावर कोरलेले दोन फणा काढलेले नागोबा,यात काही तरी रहस्य
दडलेलं असलं पाहिजे.
अगदी
बरोबर.कुमार,असेच प्रश्न पडले पाहिजेत आपणास.प्रश्न पडतात तेव्हा त्या उत्तराच्या
दिशेनं जाता येतं.त्या दिशेने जाणारे मार्ग कठीण असले तरी ते शोधता येतात.या
शोधमोहिमेत कितीही संकटं आली तरी त्यावर मात करता येतो.ते तसं केलं की बरोबर
रहस्यापर्यंत पोहचता येतं.वा वा वा.कुमार तुम्ही सातवा धडा सुध्दा बरोबर गिरवलेला दिसतो.आता
तुम्ही ताबडतोब कामाला लागलं पाहिजे.
म्हणजे
आबासाहेब,आम्हास कळलं नाही..
एखादा
धडा गिरवून चालत नाही कुमार,त्याप्रमाणे कृती केली तरच उपयोग.रहस्याची उकल आपोआप
कधीच होत नाही.
म्हणजे..
म्हणजे
तुम्ही तलवार घ्या,उमद्या घोड्यावर बसा,चार सैनिक सोबत घ्या नि आता या क्षणी निघा
त्या साधुच्या शोधात.आज उद्या परवा महिन्या- दोनमहिन्यात, वर्षभरात तो साधू नक्कीच
सापडेल तुम्हाला.महाराज म्हणाले..
महाराजांच्या
बोलण्याने राजपुत्राच्या अंगात विरश्री संचारली. त्याने लगेच महाराजांच्या सांगण्यानुसार कुच केले.
०००
राजपुत्र
राजवाड्यातून बाहेर पडताच,महाराजांनी टाळी वाजवली.राजपुत्राच्या हातात अंगठी
घालणारा साधू आतल्या दालनातून बाहेर आला.त्याने महाराजांना वंदन केले.
पण
महाराज हा इतका आटापिटा कशासाठी ?बिचाऱ्या राजपुत्रांना आता
आख्खे राज्य पिंजून काढावे लागेल.त्यासाठी शेकडो मैलाची रपेट करावी लागेल.कां घेत
आहात अशी त्याची परीक्षा?
साधुबोवा,आमच्यापुढे
काही पर्यायच ठेवला नाही राजपुत्राने,अहो खेळण्याचे,बागडण्याचे आणि वनविहारात दंग राहण्याचे दिवस संपले हे कळत नाही
त्यांना.राज्याचा कामकाजाचा किती कंटाळा येतो त्यांना.आपले राज्य किती मोठे आणि
कसे वसले आहे हे सुध्दा त्यांना माहीत नाही.तुमच्या आणि अंगठीच्या शोधात तो राज्य
पिंजून काढेल. त्याला आपले राज्य कळेल.त्याचा आळस जाईल.सदैव सावध आणि दक्ष राहण्यातच
हित कसे दडले आहे हेही कळेल..महाराज म्हणाले..
अंगठीचे रहस्य राजवाड्यात
दडवून, राजपुत्राला बाहेर धाडण्याच्या महाराजांच्या शकलीने साधू दंग झाला..
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment