आजीचं कपाट
आजीचं कपाट
आजीचं कपाट जादुचं असलं पाहिजे, अशी ठाम समजूत
तेजोमयीची आहे. कारण या कपाटात खूप काही काही आजीनं ठेवलय. त्यात तिचे कपडे, जुन्या
फोटोंचे अलबम, पोथ्या आहेत. महालक्ष्मी व्रत, सारखी वाणात आलेली खूप पुस्तके,
कवड्या, काचेच्या खेळण्याच्या गोळया किंवा कंचे आहेत. एक दोन भोवरे आहेत. खूप खूप
जुन्या वत्रमानपत्रातील कात्रणं आहेत. चुरगळलेली मासिकं आहेत. आजीला कुणी कुणी
लिहिलेली पत्र आहेत. आजीने गोळा केलेली पोस्टाची तिकिटं आहेतं. जुणी नाणी, खेळण्याच्या
पत्याचे कॅट, तिच्या काळातील छोटी छोटी खेळणी, असं बरच काही काही आहे.
अधूनमधून आजी हे कपाट खाली करायची नि परत पुन्हा
लावायची. कपाट आवरताना नि पुन्हा लावताना आजी खूप खुष असायची. त्यावेळी ती गाणी
सुध्दा गुणगुणायची. हे सारं तेजोमयीस फार मजेदार वाटायचं.
आजीने कपाटाची आवराआवर सुरु केली की तिला आणखी
एका गोष्टीसाठी खूप आनंद व्हायचा. कारण ती त्यावेळी आजीजवळ गेली की आजी हमखास काही
ना गोष्ट सांगायची. ती गोष्ट कपाटातील वस्तूंची संबधित असायची.
ही गोष्ट सांगताना आजी रंगून जायची. ती तिच्या
काळात जायची. मग त्या गोष्टीत तिचं बालपण, तिचे सवंगडी यायचे. तिने आपल्या
मैत्रिणींसोबत केलेला दंगा, मस्ती यायची. तिच्या आईबाबांचं तिच्यावरचं खरं खोटं
रागावणं यायचं. तिच्या आईवर सदानकदा खेकसणारी मात्र तिच्यावर खूप प्रेम करणारी
तिची आजी यायची. या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकायला तेजोयमीस गंमत वाटत असे. कारण
प्रत्येक वेळेस या गोष्टीत एखादा नवाच किस्सा किंवा प्रसंग यायचा....
आजीचं तेच तेच ऐकून तुला कंटाळा नाही का गं येत? आईनं तेजोमयीस एकदा विचारलं. यावर तेजोमयी हसली.
यावर, हसतेस कशाला असं आईनं विचारलं.
अगं आजीच्या गोष्टी त्याच त्याच असल्या तरी
प्रत्येक वेळी तिचा किती उत्साह असतो. गोष्ट सांगायला लागली की तिचा चेहरा किती
फुलतो. गोष्ट सांगत सांगत ति जेव्हा तिच्या जुन्या काळात जाते तेव्हा तर ती
स्वत:लाच हरवून बसते. हे सगळं कुणाला तरी सांगितल्यानच शक्य होतं ना आई..
बर बाई..
बर काय बरं..तुला आजीच्या गोष्टींमध्ये रस नाही. बाबांना
वेळ नाही. तेजोमयी म्हणाली.
म्हणजे, तुला म्हणायचं तरी काय? आई किंचित नाराजीच्या सुरात म्हणाली..
अगं आई. तुम्हा
दोघांनाही जर वेळ नसेल आणि आजीच्या आनंदासाठी मी वेळ देऊन त्याच त्याच गोष्टी
ऐकल्या तर बिघडलं कुठं? तेजोयमी आईच्या डोळयात बघून म्हणाली.
बरोबरना रे अलेक्झू..तेजोयमीने अलेक्झांडर (द डॉगी) ला विचारलं. त्याला
तिचं म्हणणं पटलं असावं. त्यानेही होकारार्थी मान हलवून आईकडे बघितलं..
ठोंब्याला पटलय म्हणजे मला सुध्दा ते पटायलाचं
हवं..आई तेजोमयीस म्हणाली. आपणही जमेल तेव्हा आजीच्या गोष्टी ऐकण्याचं आश्वासन
तिने तेजोमयीस दिलं.
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment