घरचं गोकूळ
घरचं गोकूळ
बाप्पा तुम्हाला कावळे खूप
आवडतात कां हो? तेजोमयीनं विचारलं.
अगं बाई, मला कावळेच कां, सगळे पक्षी आणि प्राणी आवडतात. पण
तुला हा प्रश्न का पडला? बाप्पांनी विचारलं.
कारण तुम्ही आमच्या घरी
येणा-या कावळ्यांवर फार लक्ष ठेऊन असता म्हणून मी विचारत्येय.
कावळ्यावरचं का, माझं लक्ष चिमणीवर असतं, कबुतरांवर असतं, माझ्या लाडक्या उंदरावर असतं. तुमच्या लाडक्या कुत्र्यांवर असतं. तुझ्या
नावडत्या मांजरीवर असतं.आईला ई करायला लावणा-या पालीवर असतं..
बाप्पांनी सांगितलेली नावं
ऐकून तेजोमयीला वाटलं की आपल्या घरी आई-बाबा आणि आपणाशिवाय बरेचजण राहतात
की..तिच्या मनात आलेला विचार तिने बाप्पांना बोलून दाखवला. बाप्पा हसले आणि
म्हणाले..
तुमच्या घरी मुंगी राहते,
तुमच्या डोळयांना दिसणारे आणि न दिसणारे किटक राहतात, झुरळं राहतात. कधी कधी भाजीपाल्यातून आलेली अळीही काही दिवस वास्तव्य करुन
जाते. मच्छरं तर तुमचे सोबतीच झाले आहेत. असं गोकूळ असतं बरं का घरोघरी..
बाप्पा हे चांगलं की वाईट..
चांगलं आणि वाईट सुध्दा...
ते कसं काय?
प्रत्येक जीवाला जगण्याचा
अधिकार आहे, म्हणून चांगलं. पण या गोकुळातली काही मंडळी
तुमच्यासाठी धोकादायक म्हणून वाईट..
मग आता काय करायचं?
कशाला काय करायला हवं. मानव
प्राणी हा सर्वात हुषार. त्याने बुध्दी वापरुन, मच्छर भगाव
अगरबत्ती शोधली. मुंगी भगाव पेन्सिल शोधली. पाल भगाव औषध शोधलं. घरातलं गोकूळ कमी
करण्याचं तुमचे प्रयत्न सुरुच आहेत. ही मंडळी सुध्दा त्यावर मात करण्यासाठी
झुंजतच आहेत वर्षानुवर्षे..म्हणूनच एखाद्या राजाच्या घरी उंदिर, पाल, अळी,
झुरळ असतात आणि तुमच्या घरीही असतात..
गंमतच आहे खरी..
या गमतीतच पृथ्वीचं चैतन्य दडलं आहे तेजोमयी ,बाप्पा उत्तरले.
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment