फुकाचे कौतुक
फुकाचे कौतुक
पोपटोबाच्या जेव्हा लक्षात
आलं की आपल्या शरीराचा हिरवांकच रंग किती मोहक आहे, चोचिचा लाल रंग किती सुंदर
आहे. आपले पंख किती डौलदार शिवाय आपल्याला बोलता सुध्दा येतं. पण आपल्या शेजारच्या
फांदिवर राहणाऱ्या कावळोबाकडे यापैकी काहीच नाही. निव्वळ काळकुटला. चोच कशी बेढब
आणि पंख ..छी छी छी..त्या चिमणीचही तसच. आपण या सर्वांपेक्षा देखणे असूनसुध्दा
त्यांना आपलं काहीच कसं कौतुक वाटत नाही?
हा प्रश्न पोपटोबाच्या मनात
खूप दिवसापासून सतत येत राहायचा. पण त्याचं उत्तर काही मिळायच नाही.
उत्तर कुणाकडून हवं तुला?एकदा पोपटोबानेच स्वत:ला
विचारलं.
कुणाकडून म्हणजे? कावळोबा...चिमणटली
यांच्याकडूनच ना.
अरे, त्यांना तुझा प्रश्नच
माहीत नाही.मग कसे बरं ते तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतील.
त्यांना नको का कळायला ते.
वारे वा..त्यांना कां बरं
कळायला हवे ते..आणि ते म्हणजे काय रे?
तेच, माझा छान हिरवा रंग..सुंदर
लाल चोच आणि डौलदार पंख.माझं बोलण.
थोडक्यात काय तर तुला तुझं
कौतुक करुन घ्यायचच त्यांच्याकडून असच ना.
तसच काही नाही पण.
अरे याला म्हणतात, ताक मागायला
जायचं नि भांड लपवायचं.पोपटोबा स्वत:शीच संवाद करता झाला..
त्याच्या या संवादाकडे
शेजारच्या फांदिवर बसलेल्या कावळोबाचं लक्ष गेलं.
हा पोपटोबा वेड्यासारखा एकटाच
कां बर बडबडतोय म्हणून, कावळोबा त्याच्याकडे गेला.
काय झालं म्हणून,त्याला विचारलं.
तसं काही नाही रे पण.पोपटोबा
म्हणाला.
पण काय?कावळोबानं विचारलं..
माझा हिरवा रंग, लालचुटूक
चोच,डौलदार पंख आणि माझं बोलणं.
त्यांचं काय झालं?
काही नाही.पण..
पण..पण काय स्पष्ट बोलना.कावळोबा
त्याला म्हणाला.
तसं नाही रे, पण तुझं कधी
याकडे लक्ष गेलं नाही का?
गेलं की.
मग..
मग काय?
तुला माझं कौतुक करावं वाटलं
नाही का? पोपटोबाने इकडे तिकडे नजर फिरवत कावळोबास विचारलं. कावळोबाच्या ते
लक्षात आलं.
अच्छा, तर तुझं कौतुक
केल्यानं काय बरं होईल? कावळोबानं विचारलं.
याप्रश्नाचं काही पोपटोबास
उत्तर देता आलं नाही..
कावळोबाचं म्हणणं खरच
होतं.निव्वळ कौतुकानं काय बरं होईल माझं?पोपटोबा पुन्हा स्वत:लाच
म्हणाला..
अरे,पुन्हा स्वत:शाची काय
बोलत बसतोस..
माझं काही चुकलं का? असं स्वत:ला विचारत होतो मी.
चुकलं नाही रे मित्रा, पण कसं
आहे, अशा बाह्य रुपाचं कौतुक कशासाठी करायचं?हे रुप आपल्याला आपल्या
आईबाबांमुळे मिळालं. त्यात आपला काहीच पराक्रम नाही.
कावळोबा पोपटोबास म्हणाला. कावळोबाचं
हे बोलणं काही पोपटोबास आवडलं नाही.त्याला त्याचा थोडासा राग आला. कावळोबा बसला
होता त्या झाडाच्या फांदिवरुन उडून तो आपल्या आईबाबांकडे आला. त्याने त्याच्या
आईबाबांना थेट विचारलं, त्याला हिरवाकंच रंग, लाल चोच, डौलदार पंख आणि बोलणं हे
तुमच्यामुळं मिळाल्यानं त्याचं काही कौतुक नाही का?
आई हसली. तिने त्याला जवळ
घेतलं. त्याच्या पंखावरुन तिचा पंख फिरवला..
मग बाबांनीही तेच केलं.ते
म्हणाले,
अरे राज्या, तुला कुणी आज
काही म्हंटल का?
पोपोटोबाने मग कावळोबासोबत
झालेली चर्चा त्यांना कथन केली.
यावर आई हसून म्हणाली.कावळोबा
म्हणाला ते बरोबरच आहे राज्या.बाह्य रुपाचं कौतुक काही कामाचं नसतं.आपल्यापेक्षा
सुंदर सुंदर पक्षी खूप आहेत.त्या सर्वांचं थोडचं कौतुक करत बसणार कुणी.
अरे, कौतुकासाठी आपण काहीतरी
पराक्रम गाजवायला हवा. चांगलं काम करायला हवं.कळलं का?
होय बाबा.मी उगाच नको त्या
गोष्टीचा विचार करत बसलो. दुसऱ्यांकडून भलतीच अपेक्षा करत राहिलो.
तसं केली की अपेक्षाभंग होतो.
मग त्याचं दु:खं होतं. बाबांनी समजावलं..
पोपोटांबा काय ते समजून गेलं.
दुसऱ्या दिवशी त्यांनी डाळींब तोंडून आणलं. फांदिवरील सर्व मित्रांना त्याने
ते खायला आवर्जून बोलावलं.
वा वा वा वा ,प्रत्येक पक्षी
म्हणाला. कित्ती रे आमची काळजी तुला. कुणीतरी म्हणालं.
आम्हाला बुवा कधी इतकं छान फळ
खायलाच मिळालं नाही.आणखी कुणीतरी म्हणालं.
आता मी तुम्हाला दररोज असं
नवं नवं फळं खायला देईन. पोपटोबा मित्रांना म्हणाला.
वा वा पोपटोबा.दुसऱ्यांचा असा
विचार करणाऱ्याचं मन खूप सुंदर असतं.खरच तुझं कौतुक करावं तेवढं कमीच हं..कावळोबा
म्हणाला.
कावळोबाच्या
कौतुकाच्या बोलाने पोपटोबा मोहरुन गेला.आईबाबांच्या सांगण्यातलं महत्वही त्याला
पटलं.
सुरेश
वांदिले

Comments
Post a Comment