रावणाला मदत करणारे आम्ही..
रावणाला मदत करणारे आम्ही..
देवांचे राजे इंद्र महाराजांना आज पृथ्वीवर
जाण्याची इच्छा झाली. त्यांनी नारदमुनिंना बोलावणं धाडलं. नारदमुनींचं पृथ्वीवर
सारखं जाणं-येणं होतं. त्यांना पृथ्वीची इत्थभूंत माहिती होती. त्यामुळे त्यांना
सोबत घेऊन जाण्याचं इंद्रानं ठरवलं.
इंद्र महाराजांचा निरोप आल्याने धावतपळत नारदमुनी
इंद्राच्या महाली पोहचले. महाराजांसोबत नमस्कार-चमत्कार झाल्यानंतर नारदमुनी
आसनस्थ झाले.
त्यांनी इंद्र महाराजांना विचारलं, महाराज असं
अचानक आपलं बोलवणं का बरं?
काही विशेष काम होतं का? नारदमुनींचा हा प्रश्न इंद्र महाराजांना
अपेक्षितच होता. त्यामुळे त्यांनी लगेच सांगून टाकलं.
नारदमुनी पृथ्वीवर जायचं म्हणतो,बरेच दिवस झाले, तिकडे चक्कर टाकून. तुम्ही सोबत असला की पृथ्वीची भ्रमंती सुलभ
होईल..
फारशी इच्छा नसताना नारदमुनी इंद्र महाराजांसमवेत
पृथ्वीतलाकडे निघाले.
ऐरावतावर मंत्राचे पाणी शिंपडून इंद्र महाराजांनी
त्याला पंख दिले.
इंद्रमहाराज आणि नारदमुनी ऐरावतावर बसले. त्याने आकाशात सूर घेतला. वाऱ्याच्याही वेगाने तो
उडू लागला.काही काळानंतर ऐरावत पृथ्वीतलावरील महाराष्ट्र देशी एका बागेत उतरला.
कुणास संशय येऊ नये म्हणून इंद्र महाराजांनी त्यावर मंत्राचे पाणी फेकून त्याचे
रुपांतर दगडात केले. आता ऐरावत बागेतील शोभेची वस्तू बनला होता.
इंद्रमहाराजांनी स्वत:वर आणि नारदमुनींवर
मंत्राचे पाणी फेकून दोघांनाही अदृष्य केले. आता त्यांना कुणी ओळखण्याची भीती
नव्हती. नारदमुनी आणि इंद्र महाराजांची भ्रमंती सुरु झाली.
आज सगळीकडे ढोल ताशे वाजत होते. लोकांनी नवे
वस्त्र परिधान केले होते. घराघरांवर आंब्याचे तोरण लागले होते.एका काडीला उपटा
लटकवलेला तांब्या, त्याला लावलेले सुंदर भरजरी वस्त्र, त्यावर टाकलेली गाठी,
फुलांचा हार अशा गुढी अनेक घरी लावलेल्या दिसत होत्या. अशा प्रसन्न वातावरणात
घराघरातून स्वादिष्ट अन्न शिजवण्याचा सुगंध येत होता.
या मंगलमय वातावरणाने इंद्र महाराज प्रसन्न झाले.
पृथ्वीची मुलं अजुनही परंपरा आणि रुढी मनापासून पाळतात हे बघून त्यांना आनंद झाला.
ते मनुष्यप्राण्याचं खूप कौतुक करु लागले. मात्र नारदमुनींनी यावर हुं की चू केलं
नाही. याचं इंद्र महाराजांना आश्चर्य वाटलं. त्यांनी नारदमुनींना विचारलं..
नारदा, तुम्हास मनुष्यप्राण्याचं कौतुक वाटत नाही
का?
महाराज, कौतुक वाटण्यासारखं कोणता बरं पराक्रम
घडलाय इथं...
अहो, इतक्या पुरातन रुढी, परंपरा आणि प्रथा किती
आनंदाने, मनोभावे ही मंडळी पार पाडताहेत. देवलोकात सुध्दा जुन्या परंपरा आपण
विसरुन गेलो आहोत... इंद्र महाराज म्हणाले.
महाराज, या परंपरा,प्रथा,रुढी पाळणं चांगलं
असेलही, पण काळ बदलला तसं बदलायला नको का या मनुष्यप्राण्याने.
म्हणजे..तुम्हाला म्हणायचं काय नारदा. तुम्हाला
सर्वत्र खोट काढण्याची सवयच जडली आहे बाँ.ती काही केल्या जात नाही.
तसं नाही महाराज,गुढी कशासाठी उभारायची? तर नव्या चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी. वाईटावर विजय मिळवून श्रीराम अयोध्येस परतले
म्हणून गुढी उभारली जाते..
बरोबर...
बरोबर ना महाराज...पण भव्य प्रमाणात रुढी
पाळण्याचा नादात मनुष्यप्राणी हा सण कशासाठी साजरा करायचा हेच विसरुन गेला.
नारदा जरा स्पष्ट सांगा ना...
अहो महाराज..या मनुष्यप्राण्याने इतकी जंगल तोड
केली, वन्यपशुपक्षांना मारले, जलचरांना मारले, इंधनासाठी पृथ्वीच्या पोटातील कोळसा
जाळला, तेल जाळले..त्यामुळे पृथ्वीची हवा दुषित झाली. पाणी दुषित झाले.पृथ्वीचे
आयुष्यच धोक्यात आले. हे ठाऊक असूनही हा मनुष्यप्राणी काही शहाणा होत नाही. केवळ
बडबड करतो नि पुन्हा पृथ्वीचे वातावरण प्रदुषित करतो. प्रदुषण रुपी रावणाला
चांगलाच धष्टपुष्ट करत आहे हा मनुष्यप्राणी. रावण माजला की संहार होणार
ना..श्रीरामाचे नाव घेऊन रावणाला मदत करण्यासारखीच याची ही वागणूक आणि विपरित
वर्तन.प्रदुषण कमी करण्यासाठी शपथ घेऊन ती गुढी उभारण्याचं सांगून बघा
तुम्ही.तुमच्याकडे बघून आधी खोखो असतील.मग तुच्छतेने बघून तुम्हालाच गप्प
बसवतील..नारदमुनी एका दमात बोलून गेले.
बरेच दूर चालण्याने इंद्र महाराजांना थोडा फार
थकवा जाणवतच होता.पण चालत असताना त्यांच्याजवळून जाणाऱ्या असंख्य गाड्यांनी
सोडलेल्या धुरामुळे त्यांचे डोळे चरचरायला लागले.नाकातून पाणी गळू लागले
होते.श्वास घ्यायला कठीण जाऊ लागलं...आणखी काही काळ इथे राहिलो तर बेशुध्दच पडायचो
अशी भीती वाटून त्यांनी नारदांना,परत फिरायला सांगितलं. थोड्याच वेळात ते दोघेही
ऐरावतला ठेऊन आलेल्या बागेत पोहचले.
तिथे दगड बनलेल्या ऐरावताजवळ पोहचल्यावर, त्याची
अवस्था बघून इंद्र महाराजांना धक्काच बसला. कारण दगड बनलेल्या ऐरावताच्या सोंडेला
तडा गेला होता.
नारदा हे कसं काय झालं?कुणी केलं असेल दु:साहस?
अहो महाराज,प्रदुषणच इतकं झालंय की दगडांना
सुध्दा चिरे जायला लागले बघा हवेतील रसायनांमुळे. पृथ्वी वाचवण्याची गुढी
उभारण्याची वेळ आलीय इंद्र महाराज, पण हे मनुष्यप्राण्यास सांगणार कोण?
इंद्र महारांनी कप्पाळावर हात मारुन घेतला. कुठून
दुर्बध्दी झाली नि पृथ्वीवर आलो असं त्यांना वाटू लागले...
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment