कोंबडेरावांची सुटका
कोंबडेरावांची सुटका
कोंबडेराव निवांत बसले होते. सकाळचं
खाणं पिणं झालं होतं. मस्तपैकी इकडून तिकडे, तिकडून इकडे रपेट झाली होती.
पिल्लांसोबत खेळणं झालं होतं. दिवस कसा छान सुरु झाला होता. हवेची झुळूक आली आणि
त्याने कोंबडेरावांच्या डोळ्यावर झोप आली.
कोंबडेराव ज्या झाडाखाली निवांत बसले
होते. त्या झाडावर एक मधमाशाचं पोळ होतं. त्यांना छान अशी गुंगी येत असतानाच
त्यांच्या कानाभोवती गूं गूं करत एक मधमाशी फिरु लागली. या आवाजाने कोंबडेराव जागे
झाले. समोर मधमाशी दिसताच ते ताडकन उभे राहून तिच्या पाठिमागे लागले. ती मधमाशी
जिकडे जाई तिकडे कोंबडेराव झर्रदिशी जात. या पकडापकडीच्या खेळात बिचारी मधमाशी
थकली आणि कोंबडेरावांना म्हणाली,
दादा, तुम्ही असा माझा पाठलाग करु नका,मला दम
लागलाय बघा.उडता उडता माझे प्राण निघून जायचे बघ..
कोंबडेरावांनी तिच्याकडे बघितलं. ती
इवलीशी मधमाशी बघून त्यांना तिची दया आली. आपण उगाचच बिचारीला दमवत होतो असं
त्यांना वाटलं. ते हसले आणि तिला म्हणाले,जा सोडलं तुला...पुन्हा कधी माझ्या
कानाभोवती आवाज काढून माझी झोप उडवू नकोस..
मधमाशीने कोंबडेरावाचे आभार माणून
उडाली नि आपल्या पोळयात जाऊन बसली.
कोंबडेराव कसे दयाळू आहे, हे तिने
पोळ्यातील इतर मधमाशांना समजावून सांगितलं. सर्वांना कोंबडेरावांचा दयाळूपणा फार आवडला.
त्या रात्री जंगलातील एक रानकुत्रा
त्या झाडाखालून जात होता. त्याचं लक्ष कोंबडेरावांकडे गेलं. आयतीच मेजवाणी भेटली
म्हणून त्या रानकुत्र्याच्या तोंडाला पाणी सुटलं.
कोंबडेराव निवांत झोपले होते. रानटी
कुत्रा त्याच्याकडे हळूवार येत होता. त्याची हालचाल मधमाशांनी बरोबर टिपली.
कोंबडेरावांनी दया दाखवून ज्या मधमाशीस सोडून दिलं होतं,तिला धोक्याची जाणीव झाली.
हा रानटी कुत्रा कोंबडेरावावर हल्ला करणार हे तिने बरोबर ताडलं. तिने आपल्या सर्व
मधमाशांना तसं सांगितलं. रानटी कुत्रा आता अगदी कोंबडेरावाच्या जवळ पोहचला होता.
कोंबडेरावांची झोप काही उडाली नव्हती. रानटी कुत्रा कोंबडेरावावर उडी मारणार तोच
पोळयातील मधमाशांनी वेगाने त्याच्यावर हल्ला केला नि त्याला चावायला सुरुवात केली.
या दंशाने तो ओरडू लागला. या ओरडण्याने कोंबडेराव जागे झाले. आपल्या समोरचं दृष्य
बघून आधी ते घाबरले. मात्र,मधमाशांनी रानटी कुत्र्याला त्राही भगवान करुन
सोडल्याचे लक्षात येताच त्यांना हायसं वाटलं. मधमाशांच्या डंखामुळे त्रस्त झालेल्या
रानटी कुत्र्याने थोड्याच वेळात तिथून पळ काढला..
कोंबडेरावांनी पुन्हा पोळयाकडे
झेपावलेल्या मधमाशांचे आभार मानलं. आपण इतरांशी चांगलं वागलं तर इतरही त्याची
परतफेड संकटाच्या समयी करतात. असा धडा कोंबडेरावांना मिळाला. यापुढे कुणाशीही वाईट
वागायचंनाही,असा निर्धार कोंबडेरावांनी केला.
सुरेश वांदिले
.jpg)
Comments
Post a Comment