पाणीपुरी आणि युक्रेन
पाणीपुरी
आणि युक्रेन
आज सकाळी
सकाळी तेजोमयीच्या घरी पाणीपुरीच्या
बेताची चर्चा सुरु झाली. शंभर पाणीपु-या असलेली दोन पाकिटं, पुदिना, बारिक सेव आणि
खारी बुंदी घेऊन येण्याचं बाबांना आईने सांगितलं. बुंदी आणि सेव अमूकच एका
फरसाणाच्या दुकानातून आणा, दुसरीकडून नाही, अशी आदेशवजा सूचना आईने बाबांना केली.
अगदी
बरोबर..विसरु नका हं..अशा आशयाचे भाव डोळयात आणत, अलेक्झांडर (द डॉगी) ने मान हलवली. पाणीपुरी हे त्याचं आवडतं
खाद्य असल्यानं, आईच्या तोंडून पाणीपुरी शब्द बाहेर पडल्यानंतर तो आई-बाबांच्या
चर्चेत उत्साहात सामील झाला होता..
पाणीपुरीची
इतक्या उत्साहात आई-बाबा चर्चा करतात तेव्हढी युक्रेनची कां बरं करत नाही. असं
तेजोमयीस वाटलं. गेल्या काही दिवसात वृत्तपत्रात आणि टीव्हीच्या वृत्त
वाहिन्यांमध्ये युक्रेन नावाच्या देशावर रशिया नावाच्या देशानं केलेल्या हल्ल्याच्या बातमीस अग्रक्रम होता.
मात्र, यावर ना आईकडून ना बाबांकडून एक चकार शब्द निघाला होता. दोन देशात जणू
लुटपुटीचा खेळ चाललाय..त्यात काय मोठसं असं त्यांना वाटत असावं किंवा आपल्याला काय
त्याचं, असंही वाटत असावं, तेजामयी या विचारचक्रात पुरती गुरफटून गेल्यानं ती आजच्या
पाणिपुरीच्या चर्चेमध्ये सामीलच झाली नाही.
पाणीपुरी
हा तिचा जीव की प्राण असूनही ती काहीच बोलत नसल्याचं लक्षात येताच आई तिला
म्हणाली,
काय झालं
गं..पाणी पु री नको का तुला..तसं असेल तर
सांग बाई, वडा पाव आणायला सांगते बाबांना..आई म्हणाली. वडा-पावाचं नावं कानावर
पडताच अलेक्झांडरने आनंदाने उडीच घेतली.
त्याचा
तो आनंद बघून आई त्याला म्हणाली, ठोंब्या कळलं बरं का मला तुला कशाचा आनंद झालाय
ते, एक तर पाणीपुरी मिळेल किंवा मग वडा पाव...
अलेक्झांडरने
आज्ञाधारकपणे मान हलवली. बाबांना हसू आलं.
अगं, पण
दोन्हीचा बेत केला तर काय हरकत आहे..बाबा आईस म्हणाले.
काय गं
तेजो..बाबांनी तिला विचारलं..
पण बाबा,
वडा-पाव पेक्षा तुम्हाला युक्रेन महत्वाचा वाटत नाही का ? तेजोमयी बाबांकडे बघत म्हणाली
युक्रेन,
नवा पदार्थ आहे का गं...की पिज्जाचं नवं नाव..आई सहज बोलून गेली..
हा
प्रश्न अचानकच आल्याने बाबांनी नकळत विचारलं, काय झालं युक्रेनला..
असं काय
करता बाबा..अहो, युक्रेनमध्ये युध्द सुरु असल्याचं तुम्ही दररोज बातम्यांमध्ये
बघता ना.. कशासाठी तिथे हे युध्द चाललय,असं तुमच्या मनात येत नाही का?
अं होय
होय..बाबा भानावर येत म्हणाले, अच्छा तर ते युक्रेन होय..मला वाटलं..
काय
वाटलं तुम्हास..तेजोमयीनं विचारलं..
तसं नाही
गं पण..असू दे..युध्द सुरु आहे ना असू दे..
अगं बाई,
त्या युध्दाशी तुझा काय संबंध..आईने
तिच्याकडे आश्चर्यानं बघत विचारलं..
आईचं
म्हणणं खरच असल्याचं तेजोमयीच्या लक्षात आलं. आपला काय संबंध? आपल्याला खायला पाणीपुरी मिळते, वडा-पाव, पिज्जा मिळतो. कार्टून नेटवर्क
बघायला मिळते.. कोण कुठल्या युक्रेनमुळे आपल्या या आनंदात विरजण पडलेलं नाही
ना..मग काय करायचय आपल्याला.आई म्हणते ते खरच आहे की... तेजोमयी या विचारात गढून
गेली..ती काहीच बोलत नाही बघून आई पुन्हा म्हणाली..
अगं तुला
बरं नाही का..
बाबाही
तसच म्हणाले..
काही
नाही, काही नाही, मी चांगली आहे हो..पण आई आपण एखाद्या मालिकेतील पात्रांवर किती
मन लावून चर्चा करतोच ना गं.. एखादं भांडकुदळ पात्र असेल तर तुला त्याच्यावर
बोलायचा खास आनंद मिळतो ना..
हं मग..
अगं त्या
भांडकुदळ पात्राचा आपल्याशी काय संबंध.. पुन्हा पुन्हा त्याच्यावर बोलतेस ना
तू..तेजोमयी म्हणाली..
तेजोमयीच्या
बोलण्यातली खोच लक्षात आल्यानं आई काहीच बोलली नाही.तिला तेजोयमीचा आगावूपणा
वाटला.
आईच्या
चेहऱ्यावरील भाव बघून बाबा हसले.
यात हसण्यासारखं
काय, आई किंचित चिडून त्यांना म्हणाली.
अहो, बाईसाहेबांच्या
डोक्यावर बसलेलं युक्रेनचं भूत जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत असे प्रश्न तिला पडतच
राहणार..म्हणून हसू आलं..
हे युक्रेनचं भूत तुमच्या
मानगुटीवर कां बरं बसत नाही.. असं तेजोमयीस म्हणावसं वाटलं.. असं विचारलं तर आईचा
धपाटा नक्कीच मिळेल याची तिला खात्री असल्याने ती गप्पच राहिली.. बाबांनी तिच्या
डोक्यावरुन हात फिरवला..पिशवी घेऊन ते बाहेर पडले..
आता पाणीपुरीचा बेत टळणार
नाही, हा विश्वास पटून अलेक्झांडरने मोठ्ठा नि:श्वास टाकला...
सुरेश वांदिले.
Comments
Post a Comment