निवडणूक आणि मुले
निवडणूक आणि मुले
जो कोणता निवडणुकीच्या निकालांचा दिवस
असेल त्या दिवशी तेजोमयीच्या बाबांची हमखास रजा. ऑफिसला दांडी. सकाळी आठ
वाजल्यापासूनच रिमोट त्यांच्या हाती. मग, या वृत्त वाहिनीवरुन त्या वृत्तवाहिनीवर
जात, निवडणूक निर्णयांची चर्चा ते मनापासून ऐकणार, हे आता नेहमीच झालं होतं.
आईला यात रस आहे किंवा नाही हे काही
कळत नसे. कारण, निवडणूक निकालांच्या आदल्या रात्रीपासून तिचे टोमणे सुरु होतं. म्हणजे
की, गेला उद्याच्या दिवस कामातून. वा, उद्या
ऑफिसच्या बुट्टीसाठीचा अधिकृत दिवस..मज्जाच मज्जा. असं काहीतरी. बाबा यावर काहीच
उत्तर देत नसत. आई बाबांना चिडवतेय, हे आताशा तेजोमयीस कळू लागलं होतं. अलेक्झांडरला
मात्र आई नेमकं कुणासाठी हे बोलतेय हे काही कळत नसे. त्यामुळे आळीपाळीने तिघांकडे तो
बघून छॅंS यांचं
काहीतरीच चालतं बाँ असे काहीसे भाव आणून सोफ्यावर ताणून देत असे.
निकालाच्या दिवशी, बाबा सकाळी आठ
वाजेपासून टीव्ही समोर बसले की,आई मध्येच टीव्हीकडे बघायला यायची. चार-पाच मिनिटं
झाली की निघून जायची. कधी कधी चांगली दहा मिनिटं एखादी चर्चा टक लावून बघायची नि
ऐकायची. याचं तेजोमयीस आश्चर्यही वाटायचं. बाबांना खिजवणाऱ्या आईला नेमकं
त्यावेळेला काय बरं आवडत असेल असा प्रश्न तिला पडायचा. एक दोनदा तिने विचारायचा
प्रयत्न केला तर, काही नाही गं, आपलं असच, असं उत्तर द्यायची. हे, आपलं असच नेमकं
काय असतं,याची उत्सुकता यावेळी तेजोमयीस होती. त्यामुळे परवा निकालाच्या दिवशी
तिही बाबांच्या मांडिला मांडी लावून टीव्ही समोर बसली.
लोकशाही, निवडणुका या विषयी ती थोडंफार
नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शिकली होती. लोकशाहीसाठी आवश्यक असणारे निवडणुकीचे
निकाल बाबांना इतके कां खिळवून ठेवत असतील असं तिला कधी कधी वाटायचं. इतक्या
एकाग्रतेने ते एक दिवसीय क्रिकेटचे सामने सुध्दा बघत नसत.
त्यांच्यासोबत बसून निवडणूक निकालातील बाबांना
खिळवून ठेवणाऱ्या घटकाचा छडा लावायचा असा निर्धारच परवा तेजोमयीनं केला. ती
टीव्हीसमोर बसल्याने, घरातील जी काही नेहमीची छोटी-मोठी कामं करायची असतात तिकडे
तिचं दुर्लक्षं झालं. ती सगळी कामं आईलाच करावी लागली. शिवाय बाबा घरीच असल्याने
त्यांना चहा दे, नाश्ता दे, बिस्किटं दे हेही सुरु होतच. पहिले दोनतीन तास तिला
काही वाटलं नाही. पण दुपारच्या जेवणानंतरही बाबा आणि तेजोमयी टीव्हीला चिटकून बसले
तेव्हा ती अलेक्झांडरला उद्देशून उपरोधिकपणे म्हणाली, ठोंब्या बघ, निकालाचा
परिणाम, एक आळसोबा होतेच घरी, आता दुसरे तयार झाले..
आईने आपल्याला उद्देशून काहीतरी सांगणं
म्हणजे महत्वाचं, अशी समजूत अलेक्झांडरची असल्याने त्याने होकारार्थी मान हलवली.
शेपूट हलवत आईच्या पाठीमागे - समोर करु लागला. मात्र, आईच्या बोलण्याचा कोणताच
परिणाम बाबा आणि तेजोमयीवर झाला नाही.
तेजोमयी पहिल्यांदाच इतक्या तन्मयतेने
निकाल ऐकत होती. वेगवेगळया पक्षांची नावे, त्यांचे नेते, जिंकलेल्या उमेदवारांची
नावं, त्यांना मिळालेली मतं, आकडेवारी, टक्केवारी ,मोठमोठ्या पत्रकारांच्या प्रतिक्रिया,
गोल टेबलाभोवती बसून जोरजारात चाललेली चर्चा, एकमेकांवर ओरडणं, तिरकस बोलणं, कधी
कधी कमी लेखणं, कुणाचं तरी फारच शांत आणि संथपणे बोलणं, कुणाचं अनाकलनीय बोलणं, असं
छान तिच्या नजरेसमोरुन जात होतं. ते खूप भारी होतं. बाबा दर दहा पंधरा मिनिटांनी
दुसऱ्या दुसऱ्या वाहिन्यांवर जात. त्यामुळे वेगवेगळया वाहिन्यांवर चाललेली धम्माल
चर्चा तिला बघायला आणि ऐकायला मिळाली..सुरुवाती सुरुवातीला आलेला कंटाळा कुठल्या
कुठे पळून गेला.तीन चार तासानंतर तर तिला हा पक्ष,तो पक्ष,इतक्या जागा, बहुमत, जाहिरनामा,
लोकांच्या इच्छा आकांक्षा, निवडणुकीतील मुद्दे अशा कितीतरी गोष्टी कळू लागल्या. नागरिकशास्त्रात
जे शिकवलं ते तिला आठवू लागलं. त्याच्याशी संबंध लावताना तिला मजा येऊ लागली.
असले कार्यक्रम बघा, असं आपले आईबाबा
आपणास कां बरं सांगत नाहीत? किंवा मग चला आपण सर्वजण हा कार्यक्रम बघू एकत्र, असं आई-बाबा कां
म्हणत नाही, असे प्रश्न तेजोमयीस पडले. हा प्रश्न विचारला तर आई म्हणेल, आगावूपणा
करु नकोस, अजून तू लहान आहेस, तुला काय कळणार त्यातलं. बाबांना विचारलं तर काही
क्षण आपल्याकडे बघतील, मग हलेकच हसतील. नंतर काहीतरी भलतच सांगतील,हे तेजोमयीस ठाऊक
होतं.त्यामुळे तिने यावर काही विचारल नाही.
संध्याकाळच्या सुमारास सर्व निकाल
लागले. विश्लेषणावर विश्लेषण ऐकून तेजोमयीला शिण आला होता. चांगली सात आठ ती ही
चर्चा ऐकत होती. त्यात मंदिर, जाती, महिला,
विकास, बेरोजगारी, शेतकरी असे बरेच विषय आले होते. तिच्या अचानक लक्षात आलं की
एवढ्या सात-आठ तासात एकदासुध्दा कुणी मुलांचा विचार केला नाही. उल्लेखही केला
नाही. म्हणजे निवडणुकीच्या दृष्टिने मुलांना काहीच महत्व नाही की काय? तेजोमयीला प्रश्न पडला..
याप्रश्नाचं उत्तर नागरिकशास्त्राच्या
सरांना विचारावं की थेट पंतप्रधानांना विचारावं, यावर सध्या तिच्या मनात खल
चाललाय...
सुरेश वांदिले
Comments
Post a Comment