पोपट आणि माकडाचे चाळे
पोपट आणि माकडाचे चाळे
वननगरीतील दोन पोपट खूप सुंदर होते. सर्व
पक्षांना त्यांचा हेवा वाटायचा. प्रत्येक पक्षी त्यांच्याकडे येऊन त्यांचं कौतुक
करायचा. या कौतुकाने भारावून गेलेले ते पोपट, कुणालाही सहज दिसतील अशा ठिकाणी बसू
लागले. जाणाऱ्या येणाऱ्या लक्ष जावं आणि त्यांनी आपलं कौतुक करावं, अशी त्यांची
अपेक्षा असे.
जाणाऱ्या येणाऱ्याचं लक्ष वेधावं म्हणून ते शिळ
घालत. जाणाऱ्या व्यक्तीचं त्यांच्याकडे लक्ष जाई. मग त्या दोघांच्या सौदर्यांचं
कौतुक करत. या कौतुकात ते दोन्ही पोपट रमून जात..
या कौतुकाच्या हव्यासापायी ते एकदा एका
शिकाऱ्याच्या तावडीत सापडले. या दोघांच्या शिळीमुळे तो त्यांच्याकडे आकर्षिला
गेला. ते सुंदर पक्षी आपल्या ताब्यात आले आले तर त्यांना विकून आपणास खूप संपत्ती
मिळेल, याची शिकाऱ्याला खात्री पटली.. त्या शिकाऱ्याने
शिताफिने त्या पोपटांना पकडलं. हे सुंदर पोपट विकण्याऐवजी आपल्या राजास दिले तर तो
खूष होऊन मोठी संपत्ती देईलं, असं त्याला नंतर वाटलं. त्यामुळे पोपटांना विकण्याचा
बेत रद्द करुन शिकारी ते सुंदर पोपट घेऊन तो राजाकडे गेला. ते पोपट त्याने राजाला भेट दिले. असे सुंदर पोपट राजाने याआधी कधीच बघितलं नव्हतं.
त्यामुळे राजा खुष झाला आणि शिकाऱ्याला खूप सारी सोन्याची नाणी दिली.
राजाने या दोन सुंदर पोपटांसाठी सोन्याचा पिंजरा
तयार केला. त्यांची खास काळजी घेण्यासाठी चार-पाच सेवकांची
नेमणूक केली. दोन्ही
सुंदर पोपट छोट्या राजकुमारासही खूप आवडले. तो
त्यांच्याशी खेळू लागला. दोन्ही पोपटही त्याच्याशी
बोलू लागले.
पोपटांना सर्व काही वेळेच्यावेळेवर मिळू लागले. त्यांचे कौडकौतुक करण्यात सगळे दरबारीजण रमून
गेले.
काहीही न करता इतकं छान जगता येतं हे बघून दोन्ही
पोपट खूष झाले. पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. एके दिवशी पूर्वीच्याच
शिकाऱ्याने माकडाचं गोजिरवाणे पिल्लू आणलं आणि महाराजांना भेट दिलं. महाराज पुन्हा खूष झाले. त्यांनी खूपसारी सोन्याची नाणी आणि गळयातील
हिऱ्याची माळ शिकाऱ्याला दिली.
माकडाचं ते गोजिरवाणे पिल्लू सर्वांना खूप खूप
आवडलं. हे पिल्लू महालात येताच, पोपटांकडे कुणी फारसं लक्ष देईनासे झालं. राजकुमारही पोपटांना सोडून माकडाच्या पिलासोबतच
खेळू लागला. आपल्याकडे कुणीच लक्ष देत नाही याचं दु:ख दोन
पोपटांपैकी लहान पोपटाला खूप झालं.
तेव्हा मोठा पोपट म्हणाला की, तू असा दु:खी होऊ
नकोस. प्रत्येक दिवस काही सारखा नसतो. हे दिवस जातील
आपले पुन्हा चांगले दिवस येतील. मोठया पोपटाचं म्हणणं काही दिवसांनी खरं ठरलं
कारण ते माकडाचे पिलू काही दिवसांनी खूप कोडकौतुकानं बिघडलं. नको ते चाळे करु लागले .
एक दिवशी त्याने महालातील बागेत जाउुन उच्छादच
मांडला. बागेतील फुलं- फळं यांची त्याने नासधूस केली. राजकुमाराच्या अंगावरही धावून गेला. त्यामुळे राजकुमार खूप घाबरला. त्याने पळत पळत
जाऊन महाराजांना सारे काही सांगितलं.
लाडक्या बागेची नासधूस झाल्याचं कानावर पडताच, महाराजांचा राग अनावर झाला. माकडाच्या पिल्लाला ताबडतोब जंगलात नेऊन
टाकण्याचा त्यांनी आदेश दिला. या आदेशाची अंमलबजावणी
लगेच करण्यात आली. माकडाचे पिल्लू राजवाडयातून जाताच पुन्हा राजकुमार पोपटांसोबत
खेळू लागला. ते बघून महाराणिंना आनंद झाला. पोपटांसाठी पुन्हा चार-पाच सेवकांची
नेमणूक करण्यात आली. त्यांचे हवे नको ते बघण्यात येऊ लागले..पुन्हा जुने दिवस
आल्याचे बघून छोटा पोपट आनंदला आणि मजेत शिळ वाजवू लागला.
सुरेश वांदिले
०००००
Comments
Post a Comment