मोगरा हरवला
मोगरा हरवला
आजची सकाळ नेहमीसारखी नव्हतीच. तेजोमयीच्या
घराजवळ बरीच झाडे आहेत. त्यावर पहाटेपासून पक्षांचा किलिबिलाट सुरु व्हायचा. त्यात
कोकिळेचेही स्वर असायचे. हा किलबिलाट तेजोमयीचे आई बाबा आणि आजीसाठी आलार्मसारखा
होता. हा आवाज सुरु झाला की सर्वात आधी आजी उठायची, मग आई- बाबा आणि शेवटी
तेजोमयी.
तेजोमयी उशिरा उठत असल्याने तिला
कोकिळेचा आवाज काही ऐकायला मिळायचा नाही. त्यामुळे हा आवाज ऐकण्यासाठी एकदा तरी
लवकर उठव असं तिने अनेकदा आजीस सांगितलं. आजी तेव्हा हो म्हणायची आणि नंतर विसरुन जायची.
त्यामुळे आजी काही तिला उठवायची नाही.
मात्र आज तेजोमयीस सर्वांच्या आधी जाग
आली. तिनेच आजीस उठवलं.
काय गं, काय झालं.. आजिनं डोळे चोळत
विचारलं..
अगं मला कोकिळेचा आवाज ऐकायचाय...तू
काही मला उठवत नाहीस, म्हणून मीच लवकर उठले. तो आवाज तुझ्या कानी पडला की मला सांग
आणि कोकिळा दाखव बघू.
यास आजी हसली. हो गं माय माझे म्हणून
तिने तेजोमयीचा गालगुच्चा घेतला.
मात्र, आज पक्षांचा किलबिलाट
नेहमीसारखा झालाच नाही. सात वाजून गेले तरी कोकिळेचा आवाजही ऐकायला आला नाही..
तेजोमयीने आजीकडे बघितलं. तिलाही
आश्चर्य वाटलंच होतं. आईबाबा आपआपल्या कामात व्यग्र झाले होते.
कुठे गेली असेल गं ही कोकिळा..ती
सुध्दा नेमकी मी, आज सकाळी सर्वांच्या आधी तिला ऐकण्यासाठी उठली असताना..तेजोमयी
हिरमुसली होऊन म्हणाली.
अगं मायमाझे, आता मी कसं सांगणार ही
कोकिळा कुठे गेली ते...माझी मैत्रिण थोडीच आहे ना ती..
असा दोघींचा संवाद सुरु असताना लता
दिदीचं निधन झाल्याचं बाबांनी आकाशवाणीवर ऐकलं आणि ते त्यांनी आजीला गहिवरलेल्या
स्वरांनी सांगितलं.
हे वृत्त ऐकून आजी अक्षरश: हादरलीच.
थरथर कापायला लागली. तिच्या मुखातून जोरात हुंदका आला. डोळयातून घळघळ अश्रू वाहू
लागले. बाबांचे डोळे पाणावले. आता काय बोलावं हे त्यांना कळेना. आईने हातातली सर्व
कामं सोडून दिली आणि कितीतरी वेळ ती टीव्हीवरची माहिती ऐकत राहिली. पण तिची नजर
शून्यातच गेली होती.
घरातलं वातावरण बदलून गेलं. दु:खाची
गडद छाया पसरली. बाहेरचा प्रकाश उदासवाणा जाणवू लागला.
लता दिदिंच्या निधनाचं वृत्त कानी
पडल्यावर सगळयांची दु:खद अवस्था झाली होती,इतकं तेजोमयीच्या लक्षात आलं.
आजीला लता दिदींची खूप गाणी यायची. तिचा
मूड असला की ही गाणी गुणगुणत राहायची. आई घरकाम करताना कानात इअरफोन घालून गीत
संगीताच्या ॲपवरील फक्त लतादिदींचीच गाणी ऐकायची. बाबांनी त्यांच्यासाठी फक्त लता
दिदिंची गाणी एकत्रित केलेला सारेगमापा रेडिया विकत घेतला होता. सकाळ झाली की हा
रेडियो ते सुरु करत. रात्री झोपताना सुध्दा दोन-तीन गाणी ऐकल्याशिवाय ते झोपत नसत.
म्हणजे घरात लतादिदीचे सुर सकाळ पासून गुंजायला लागत. त्यांचं एकतरी गाणं ऐकलं की
दिवस कसा प्रसन्न जातो.असं कितीदा तरी बाबा बोलून जात. लतादिदींची गाणी ऐकत काम
कधी संपलं हे आईलाही कळत नसे..
आपल्या घरातील तीन ज्येष्ठांच्या
जीवनात लता दिदींचं स्थान किती मोठं आहे हे तेजोमयीच्या हळूहळू लक्षात येत होतं. पुढे तिला यात रस वाटू लागला होता.
दिदींना गान सम्राज्ञी, गान कोकिळा
म्हणतात असं तिला आजिने सांगितलं होतं. त्यांचा आवाज तर कानावर पडला होता, मात्र
ज्या कोकिळेची प्रतिमा दिदिंना दिली जाते त्या कोकिळेचा प्रत्यक्ष आवाज ऐकण्याची
तिची इच्छा होती. त्यासाठी सकाळी लवकर उठण्याचा तिने अट्टाहास केला पण आज कोकीळ
गायलाच नाही....
हे जरा विचित्रच नाही का..तेजोमयी
स्वत:लाच म्हणाली.
बराच वेळ घरीच कुणीच एक शब्दही बोलले
नाही. फक्त टीव्हीवरील बातम्यांचा आवाज. त्या बातम्यांकडेही कुणाचं फारस लक्ष
असावं असं वाटत नव्हतं. बाबांना लता दिदीचं मोगरा फुलला हे गाणं खूप आवडायचं.
आताची घरातील स्थिती बघून, त्यांचा प्राणप्रिय मोगरा हरवल्याचं दु:ख आई-बाबा आणि
आजीस झालं असणार,असं तेजोमयीस वाटून गेलं.
शेवटी आजीने शांतता भंग केली....ती ओम
शांती शांती शांती म्हणाली.
बाबा आणि आईही तसेच म्हणाले. यातलं
फारसं न कळत नसूनही तेजोमयीही ओम शांती शांती बोलून गेली.....
०००
तेजोमयीस आठवलं की काल सरस्वती पूजन
झालं. त्यासाठी आईने खास सरस्वती मूर्ती आणून पूजा केली. तेजोमयीस सुध्दा फुलं
व्हायला सांगितलं..
टीव्हीवर बोलताना बरीच थोर थोर मंडळी लतादिदी
म्हणजे प्रत्यक्ष सरस्वती देवीच होत्या असं सांगत होते. ते ऐकून तेजोमयीच्या मनात
एक कल्पना आली. यापुढे आपण सरस्वतीच्या मूर्तीऐवजी आपल्या घरी लता दिदींच्या प्रतिमेची
पूजा करायची....आईबाबा नक्कीच रागवणार नाहीत याची तिला खात्री होती. मात्र आजी काय
करेल हे सांगता येत नव्हतं..
पण तरी सुध्दा तिने आपली कल्पना
सर्वांदेखत मांडली.. आजीने तिच्याकडे चमकून बघितलं. पुन्हा तिच्या डोळयातून अश्रू
वाहू लागले..
अगं, आजी तुला वाईट वाटत असेल तर नाही
करणार मी लतादिदिच्या फोटोची पूजा..तेजोमयी म्हणाली.
आजीने तिला जवळ बोलावलं. तिच्या
डोक्यावरुन प्रेमान हात फिरवत म्हणाली..
मायमाझे, हे जे आम्हाला सुचायला हवं ते
तुला सुचलय ना..म्हणून अश्रू आलेत गं..ती स्वरस्ती देवीच होती प्रत्यक्ष या जगात वावरलेली.
आपण कधीतरी बघितलेली..मग तिचीच पूजा करायला हवी ना..
काय रे..असं आजिने बाबांना विचारलं.. बाबांनी
होकारार्थी मान हलवली..आईने बाबांना लगेच बाजारात जाऊन फोटोवाल्याकडून लतादिदींची एक
प्रतिमा आणण्यास सांगितलं....
सुरेश वांदिले
Comments
Post a Comment