आजीची खेळणी...
आजीची खेळणी...
बरेच दिवासांनी आजी तेजोमयीच्या घरी आली. तेजोमयीस खूप
आनंद झाला. ती आजीची फार लाडकी. आजीजवळ गोष्टींचा खूप मोठा खजिना. खाऊ आणि हा
खजिना आजी तिच्यासाठीच राखून ठेवायची. आजीने
दारात पाऊल टाकताच, तेजोमयीनं तिला मिठी मारली. आजीने तिचे गालगुच्चे घेतले.
अलेक्झांडर (द डॉगी) घरी आल्यावर आजी पहिल्यांदाच घरी येत होती. त्यामुळे त्याने आजीला
बघितले नव्हते. आजीने घरात पाऊल टाकत असताना त्याने गुरगुरायला सुरुवात केली. तेव्हा
आईने त्याच्याकडे बघून डोळे वटारले. शांत राहा असा इशारा केला. आईचा इषारा त्याला
बरोबर कळतो. तो लगेच शांत झाला. आजीकडून होणारे तेजोमयीचं लाड बघून त्याच्या हे
लक्षात आलंच होतं की, घरी आलेली व्यक्ती खास
आहे. आईने जेव्हा आजीला वाकून नमस्कार केला तेव्हा तर त्याची खात्रीच पटली.
त्यानेही त्याच्या पध्दतीने आजीच्या जवळ जाऊन नमस्कार केला. त्याचं कौतुक करायचं
सोडून आजीने त्याला हाडहूड केलं.
कोण गं हा, इथे काय करतोय. नवा कुत्रा दिसतो तुमचा... आजी
किंचित चढया आवाजात म्हणाली.
अगं आई हा अलेक्झांडर. आमचा शेपुटवाला दोस्त..बाबा
म्हणाले..
माझा मुलगा..आईने पुस्ती जोडली.
आँ...आजीने आश्चर्य व्यक्त केले. तिला काही ते फारसं
आवडलेलं दिसलं नाही. प्रवासातून आल्यामुळे आजी थकली होती. आजीने आधी आंघोळे केली.
मग जेवण.त्यानंतर आजी काही वेळ झोपी गेली.
०००
आजीच्या चेहऱ्यावरचे भाव अलेक्झांडरने बरोबर टिपले
होते. आजीस आपण आवडलेलो नाही, हे त्याच्या लक्षात आलं. आजी झोपली असताना तो आईजवळ
येउुन तिला खुणावू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आईलाही कळतात. आईने त्याला जवळ
घेतले. त्याच्या पाठिवरुन प्रेमाने हात फिरवला.
ठोंब्या, तू कशाला काळजी करतोस. मी आहे ना. आईने
अलेक्झांडरला आश्वस्त केले. या सुरांनी स्वारीचा खिन्नपणा गेला. नेहमीसारखाच तो तेजोमयीसोबत
खेळू लागला.
दुपारी उठल्यावर आजीने तेजोमयीस तिच्या खोलित बोलावलं. तिला
खाऊ द्यायचा होता. तेजोमयीसोबत अलेक्झांडरही गेला. त्याला बघताच आजी तेजोमयीस
रागावली.
अगं हे शेपूट कशासाठी आलय तुझ्या पाठिमागे..
अगं आजी, हे शेपूट नाही, तो आमचा अलेक्झांडर आहे. मी
त्याला प्रेमाने अलेक्झू म्हणते.
हो का, फार लाडावलेला दिसतो तो..सगळे जण त्याच्याच
नावाचा जप करताय मी आल्यापासून..
असं गं काय बोलतेस तू आजी..तो या घराचा चौथा सदस्य
आहे..
आजीला तेजोमयीचं असं सांगणं आवडलं नाही. तिने
बाबांजवळही आपली नाराजी व्यक्त केली. बाबांना काय बोलावं हे कळेना..
आजीला आपण आवडलेलो नाही हे अलेक्झांडरला कळल्याने तो
आजीपासून दूरच राहू लागला. पण आजी मात्र संधी मिळेल तेव्हा कारण शोधून त्याला रागवत
असे. आईला ते अजिबातच आवडत नसे. बाबांना बोलायची हिम्मत नव्हती.
घरी आलेल्या नव्या व्यक्तीस सारेच जण इतके कसे भितात
याचं आश्चर्य अलेक्झांडरला वाटे. आजी घरात असल्याने त्याच्या सगळया हालचालींवर
मर्यादा आल्या. आईच्या कुशित कधीही शिरण्यावर मर्यादा आली. तेजोमयीसोबत खेळण्यात
मर्यादा आल्या. त्यामुळे तो फार दु:खी झाला. त्याचे खाण्यापिण्यात लक्ष लागेना. मान
खाली टाकून तो एका कोपऱ्यात बसून राही.
त्याची ती स्थिती बघून तेजोमयीस फार वाईट वाटलं. आई- बाबा
इतके कां आजीस भीतात हा प्रश्नही तिला पडला. आपणच काहीतरी करायला हवं असं तिने
ठरवलं. तिच्या मनात काही कल्पना आल्या..संधी मिळाली की त्या कल्पना प्रत्यक्षात
उतरवण्याचं तिने ठरवलं.
रात्री जेवण झाल्यावर आजी,तेजोमयीस म्हणाली...
बाळ,
तुझ्यासाठी नव्या नव्या गोष्टींचा खजिना आणलाय मी बर का?
तेजोमयी आनंदून आपणास मिठी मारेल असं आजीला वाटलं. पण
तसं काहीच झालं नाही. तेजोमयीनं साधी प्रतिक्रियाही दिली नाही.
अगं तुला गोष्टी ऐकायच्या नाहीत का? आजीने पुन्हा विचारलं..
नाही..तेजोमयीने थंड प्रतिसाद दिला. कां बरं? आजीनं आश्चर्य व्यक्त केलं.
अगं, तू असं कसं म्हणू शकतेस आजीस. किती प्रेमानं
विचारतेय ती... बाबा रागावत म्हणाले. आई काहीच बोलली नाही पण तेजोमयीने नकार
दिल्याचा तिला मनातून आनंदच झाला.
बाबा, आजीला गोष्टच सांगायची असेल तर माझी एक अट आहे...
गोष्ट सांगणाऱ्याची अट असते, ऐकणाऱ्याची नाही बाळ... बाबा
समजावत म्हणाले.
आजीने गोष्ट सांगण्यास नकार दिला तर..
दिला तर दिला.. मला नाही ऐकायच्या तिच्या
गोष्टी..तेजोमयी आजीकडे न बघता म्हणाली..
बर बाई..सांग बरं तुझी अट..शेवटी आजीच म्हणाली
हे बघ आजी, माझ्यासोबत तुला अलेक्झांडरलाही गोष्ट
सांगावी लागेल.
आँ..ही कसली अट..
मान्य असेल तर ठीक नाही तर मला नाही ऐकायच्या तुझ्या
गोष्टी..तेजोमयी गाल फुगवत म्हणाली.
फार लाडावून ठेवलयस हं तेजूस तू. बाबांकडे बघत आजी
म्हणाली.. बाबा काहीतरी बोलणार तोच तेजोमयीची आई खालच्या स्वरात म्हणाली.. हे बघा
आई, तेजोमयीचे आम्ही जे काही लाड करतो. तेव्हढेच अलेक्झांडरचे करतो. भेदभाव करत
नाही आम्ही दोघांमध्ये..
यावर आजी काहीच बोलली नाही.तिला आईचा रागही आला. पण
तिने तो व्यक्त केला नाही.
अलेक्झांडरवरुन घरात तणाव निर्माण झाला. आई आणि तेजोमयी
एका बाजूला. आजी दुसऱ्या बाजूला. बाबांना त्यांच्या आईला दुखवायचं नसल्याने
त्यांची फार गोची झाली. त्यांनी तेजोमयीची समजूत काढायचा प्रयत्न केला. पण
तेजोमयीनं आपला हट्ट काही सोडला नाही. तिसऱ्या दिवशी सकाळीच तिने बाबांना सांगितलं
की ती आजीसोब बोलणार पण नाही..
तेजोमयीचं हे असं वागणं, बाबांना आवडलं नाही. त्यांनी
तिचे जोरदार कान पिरगाळले. त्या वेदना असह्य होऊन तेजोमयी रडायला लागली.
तिच्या रडण्याचा आवाज ऐकून आजी तिच्या खोलितून
दिवाणखान्यात आली. तेजोमयीच्या रडण्याने अलेक्झांडरला काहीच सुचेना. तो तिच्या
अवतीभवती घुटमळू लागला. तिला स्पर्श करुन त्याच्या पध्दतीने, रडू नकोस हे
सांगण्याचा प्रयत्न करु लागला. आईने तिला जवळ घेतले. तेव्हा तेजोमयी स्फुंदून
स्फुंदून रडू लागली.
हे सगळ चाललय तरी काय, आजीनं बाबांना विचारलं..
अगं तुझ्याशी बोलणार नाही म्हणाली आजपासून..तू म्हणालीस
तेच बरोबर आहे, लाडाने शेफारलीच जरा..
असं काहीबाही बोलू नका.. बाबांना मोठ्या आवाजात आई म्हणाली..
आजीच्या लक्षात सगळा प्रकार आला..हे सगळं आपल्यामुळे
घडतय हे लक्षात आलं. तिने तेजोमयीस आपल्या जवळ घेतलं.तिचेडोळे पुसले. तिने सॉरीही
म्हंटलं. आजीने लगेच अलेक्झांडरलाही जवळ येण्याचा इशारा केला. तो घाबरतच आजीकडे
गेला. आजीने त्याला आपल्या कुशित घेतलं. त्याला प्रेमानं कुरवाळलं.
अरे, जे या पोरीला कळलं ते या म्हातारीस कळलं नाही
बघ..गेल्या वेळेस तेजुटली हे एकच खेळणं होतं माझ्यासाठी.तू दुसरं खेळणं आहेस माझं,
हे लक्षात आलं नाही. माझी दोन दोन खेळणी म्हणजे माझ्याइतकी आनंदी कुणीच नाही..
कळलं का तुला, मी तुला काय सांगतेय ते.. अलेक्झांडच्या
डोळयात बघ आजी म्हणाली.
अलेक्झांडरने होकारार्थी मान हलवली..
आँ..
हो गं आजी. त्याला फक्त बोलता येत नाही..त्याला सारं
कळतं..गोष्ट सुध्दा कळते त्याला..तेजोयमी म्हणाली.
तर हे सगळं महाभारत गोष्टींवरुन झालं म्हणायचं तर..
हो आई. बाबा दबक्या आवाजात म्हणाले.
अरे घाबरतोस कां,स्पष्ट सांगना..
नाही म्हणजे हो आई...
बर बरं...गोष्टीवरुन झालेलं महाभारत मी संपूवन टाकते.
म्हणजे..तेजोमयीनं विचारलं..
अगं, आता तुझ्यासोबत मी इथे असेपर्यंत दोघांनांही गोष्ट
सांगत जाईन की..
असं आजीनं सांगताच तेजोमयी आंनदून गेली, तिने आजीला
मिठी मारली. आईच्या चेहऱ्यावर हसू आलं. सारं काही ठीक झाल्याचं अलेक्झांडरच्या
लक्षात आलं. त्याने टुणदिशी सोफ्यावर आणि सोफ्यावरुन खाली उडी मारुन आपला आनंद
व्यक्त केला...
सुरेश वांदिले
Comments
Post a Comment